Brihanmumbai Municipal Corporation : महिला आरक्षण विधेयकावरून पालिका सभागृहात गदारोळ; काळ्या व भगव्या पोशाखातून निषेध

    21-Apr-2026
Total Views |
ritu tawde and kishori pedanekar
 
मुंबई :(Brihanmumbai Municipal Corporation) बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकाचे तीव्र पडसाद उमटले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सोमवारी अर्थसंकल्पीय चर्चेला बाजूला ठेवत या विधेयकावरच दिवसभर चर्चा झाली.
 
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नगरसेवकांनी विरोधकांच्या भूमिकेचा निषेध म्हणून काळे कपडे परिधान करून घोषणा देत सभागृहात प्रवेश घेतला . तर शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. याउलट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक भगव्या वेषात सभागृहात दाखल झाले. दरम्यान, महापौर रितू तावडे यांनीही काळी साडी परिधान करून सभागृहात प्रवेश केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.
 
विधेयकावरून आरोप-प्रत्यारोप
 
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते मंजूर झाले नाही. त्याचे पडसाद मुंबई महापालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) उमटले. सभागृह नेते गणेश खणकर यांनी या विषयावर निवेदन सादर करत विरोधकांवर टीका केली आणि निषेधाचा ठराव मांडला.
 
३३ टक्के महिला आरक्षणासाठी मांडण्यात आलेल्या ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा न दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे सामाजिक समतोल साधण्याची संधी गमावली गेल्याचे त्यांनी नमूद केले.(Brihanmumbai Municipal Corporation)
 
 
विरोधकांची भूमिका
 
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महिला आरक्षणाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचे सांगत, या विधेयकामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. महापौरांनी काळे कपडे परिधान करणे योग्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.
 
इतर सदस्यांची मते
 
भाजपच्या प्रीती सातम, शीतल गंभीर, संगीता शर्मा, तेजिंदर सिंग तिवाना यांच्यासह इतर नगरसेवकांनी या विषयावर आपली भूमिका मांडली. तर शिवसेना (उबाठा) गटाकडून विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, अंकित प्रभू यांनीही सभागृहात भाषणे केली.
या सर्व घडामोडींमुळे महापालिका सभागृहातील वातावरण तापले.
 
आणि अखेर महानगरपालिका सभागृहात नारी शक्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांविरोधात निषेधाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावावर तब्बल सात तास सविस्तर चर्चा करण्यात आली. आज सभागृहाची बैठक अर्थसंकल्पीय अंदाजावरील चर्चेसाठी बोलावण्यात आली होती. मात्र बैठकीच्या सुरुवातीलाच सभागृह नेते गणेश खणकर यांनी निषेधाचा ठराव मांडला, ज्यावर सदस्यांमध्ये जोरदार चर्चा झाली.
 
सात तास चाललेल्या चर्चेनंतर अखेर हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर सभागृहाचे इतर कामकाज सुरू करण्यात आले.(Brihanmumbai Municipal Corporation)