Atal Setu : मुंबईतून पुणे द्रुतगती मार्गाकडे जाणे वेगवान

अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला गती

Total Views |
atal setu news
 
मुंबई : (Atal Setu)  स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग या महत्त्वाच्या जोडणी प्रकल्पात ठोस प्रगती नोंदवत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिरकरणाने कामांना लक्षणीय वेग दिला आहे. ‘मुंबई 3.0’च्या संकल्पनेला गती देत हा मार्ग प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल, लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम करेल आणि प्रादेशिक आर्थिक हालचालींना नवे बळ देईल. हा प्रकल्प फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे.
 
७.३५ किमी लांबीचा आणि सहा मार्गिका असणारा अटल सेतू (Atal Setu) आणि मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग यांदरम्यान एक महत्त्वाचा दुवा उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणी काम पूर्ण झाले असून १४१ ठिकाणी पियर्स उभारण्यात आले आहेत. ८८ ठिकाणी पियर कॅप्सची कामे पूर्ण झाली आहेत, तर ८३० पैकी ६५३ प्रीकास्ट गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. पळस्पे परिसरात स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही सुरू असून, यामुळे द्रुतगती मार्गाशी सुरळीत व अखंड वाहतूक जोडणी सुनिश्चित होणार आहे. चिर्ले आणि पळस्पे मार्गे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही या मार्गातून सुलभ प्रवेश मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा कॉरिडॉर मुंबई, नवी मुंबई आणि पुणे यांना एकाच जलद वाहतूक पट्ट्यात जोडणारा महत्त्वाचा कणा ठरेल.(Atal Setu)
 
“या नव्या रस्त्यांमुळे मुंबईकरांना अटल सेतूमार्गे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर सिग्नलविरहित, अखंड प्रवासाची सुविधा मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत, मुंबई आणि पुणे दरम्यानचा दैनंदिन प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल. मुंबई वा पुण्यात राहून काम किंवा शिक्षणासाठी प्रवास अधिक सोपा होईल.”
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए (Atal Setu)

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.