Akhil Bharatiya Vidyarthi Parishad : महिला आरक्षणास इंडी आघाडीचा विरोध; अभाविपकडून संताप व्यक्त

जेएनयूत तीव्र आंदोलन, जाळला प्रतिकात्मक पुतळा!

    21-Apr-2026
Total Views |
Akhil bhartiy vidyarthi parishad
 
मुंबई : (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जेएनयू येथील युनिटने सोमवारी कॅम्पसमधील साबरमती ढाबा येथे डाव्या पक्षांविरोधात आणि ‘अँटी-वुमन इंडी आघाडी’विरोधात जोरदार आंदोलन केले. महिलांच्या आरक्षण विधेयकाला विरोध केल्याचा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी डाव्या संघटना आणि काँग्रेसच्या ‘महिलाविरोधी’ राजकारणाविरोधात घोषणा देत त्यांचा दुटप्पीपणा उघड केल्याचा दावा केला.
 
काँग्रेस, डावे पक्ष आणि त्यांच्या विद्यार्थी संघटनांवर महिलांच्या हक्कांचे दमन करण्याचा आणि राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हे पक्ष स्वतःला प्रगतिशील म्हणून सादर करतात, मात्र महिलांना सशक्त करण्याची किंवा निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्याची वेळ आली की, ते पितृसत्ताक आणि जुनी विचारसरणी पुढे करून अडथळे निर्माण करतात, असा आरोप अभाविपकडून करण्यात आला.
 
जेएनयू कॅम्पसमध्येही डाव्या संघटना महिलांच्या प्रश्नांचा वापर केवळ शैक्षणिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी करतात, तर त्यांच्या स्वतःच्या संघटनांमध्ये महिलांचा आवाज दाबला जातो, असा आरोप करण्यात आला. महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत अजूनही पुरुषांचे वर्चस्व असल्याचेही सांगण्यात आले, त्याचबरोबर इंडी आघाडीतील पक्ष महिलांना केवळ ‘वोटबँक’ म्हणून वापरत असल्याचा दावा अभाविपने केलाय.(Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
 
हेही वाचा :  Hindu Sammelan : हिंदू संमेलनात महिला सक्षमीकरणाचा जागर!
 
अभाविप (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) जेएनयूचे अध्यक्ष मयंक पांचाल यांनी सांगितले की, डावे पक्ष आणि काँग्रेस यांनी अनेक वर्षे महिलांच्या हक्कांवरील चर्चा ‘बंदिस्त’ ठेवली. महिलांना मुख्य प्रवाहातील राजकारण आणि सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचू न देण्याचा हा जाणीवपूर्वक कट होता, असा आरोप त्यांनी केला. महिलांच्या आरक्षणासारख्या ऐतिहासिक सुधारणांना उशीर लावण्यामागे या पक्षांची ‘महिलाविरोधी’ मानसिकता असल्याचे त्यांनी म्हटले.
 
अभाविप जेएनयूचे सचिव प्रवीण कुमार पियुष यांनी सांगितले की, साबरमती ढाब्यावर केलेल्या आंदोलनाचा उद्देश इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांचा ‘खरा चेहरा’ उघड करणे हा होता. महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली हे पक्ष भ्रम आणि खोटेपणा पसरवत असून प्रत्यक्षात त्यांची व्यवस्था महिलांच्या प्रगतीत अडथळा आणते, असा आरोप त्यांनी केला. जेएनयू अशा ‘महिलाविरोधी’ विचारसरणीला कधीही स्वीकारणार नाही आणि महिलांच्या सन्मान व हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.(Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)