‘भाप्रसे ’ शहरी आरोग्य महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांची समाजाच्या आरोग्यसेवेसंदर्भातली सामाजिक बांधिलकी शब्दातीत आहे. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
प्राथमिक शाळेत शिकत असताना नागरिकशास्त्राच्या पुस्तकात सुनील भोकरे यांच्या वाचनात ‘प्रशासकीय अधिकारी’, ‘सचिव’ हे शब्द आले. प्रशासकीय अधिकारी, त्यांचे कार्य याबाबत त्यांनी बालसुलभ उत्सुकतेने माहिती घेतली. त्यांना कळले की, सरकार, प्रशासन, संविधान यांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका ही महत्त्वाची असते. अधिकाराचा वापर करून तो समाजाच्या प्रगतीमध्ये अमूल्य योगदान देऊ शकतो. तो एक क्षण, त्या क्षणापासून त्यांनी त्यांचे ध्येय निश्चित केले की, त्यांना भारतीय प्रशासनसेवेतील, ‘आयएएस’ अधिकारी व्हायचे आहे. पण, ते कशासाठी; तर समाजहिताचे निर्णय आणि योजना अमलात आणण्यासाठी! डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, ‘बीडीओ’, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते ‘इंडियन रेल्वे ट्राफिक सर्व्हिस’ ते ‘आयएएस’ अधिकारी अशी त्यांची उत्तुंग शैक्षणिक आणि कार्यशील झेप. आज ते ‘भाप्रसे’ शहरी आरोग्य महाराष्ट्र राज्याचे आयुक्त आहेत.
‘विद्या विनयेन शोभते’ याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे डॉ. सुनील भोकरे. मृदुभाषी आणि विवेकशील चिंतन करीत संपर्कात आलेल्या गरजूंच्या समस्या सोडवणे, त्यांना योग्य मार्ग दाखवणे, यासाठी सातत्यपूर्ण काम करणारे डॉ. सुनील हे ‘भाप्रसे’ शहरी आरोग्य महाराष्ट्र राज्याचे आयुक्त आहेत. त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा थेट कळसच उभा राहिला नाही; तर त्यांनी आरोग्य क्षेत्रात अनेक वर्षे काम करत त्या सेवेचा पाया रचला. गोरगरीब, शोषित, वंचित समाजाचे आरोग्याचे प्रश्न मानवी मूल्यांना स्मरून सोडवले. बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात कामाचा त्यांना दांडगा अनुभव. उमेदीच्या काळात शिक्षणाचा खर्च भागवता यावा आणि अभ्यास करायला वेळ मिळावा, म्हणून त्यांनी मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेसोबतही काम केले. ही संस्था देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आरोग्यसेवेसंदर्भात काम करायची. वंचितांपेक्षाही वंचित, शोषित असलेल्या भगिनींच्या आरोग्याचे प्रश्न सोडवणे, त्यांना किमान मानवतेच्या कक्षातले जीवनमान प्राप्त व्हावे, म्हणून या संस्थेसोबत सुनील यांनी काम केले. त्यांना तिथे उमजले की, सगळे प्रश्न शेवटी आर्थिक विवंचनेतून उत्पन्न होतात. आरोग्याचा प्रश्नही त्यातलाच. या एकमेकांत गुंतलेल्या समस्या आहेत. त्यांनी यासंदर्भात अभ्यास केला. ‘कोविड’ काळात ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘नोडल अधिकारी’ म्हणून कार्यरत होते. ग्रामीण भागात ‘कोरोना’मुळे हाहाकार उडाला होता. अशावेळी डॉ. सुनील यांनी शहरामध्ये प्रशासनाच्या साथीने ‘कोरोना’विरोधात लढा दिला. पुढे मुख्यमंत्री साहाय्यता कक्षामध्ये काम करतानाचा अनुभव तर आरोग्यसेवेसंदर्भात आणखीनच समृद्धी देणारा होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आरोग्याचे प्रश्न घेऊन येणारे लोक, त्यांच्या समस्या आणि त्या समस्यांचे निवारण प्रशासकीय अधिकारातून करणे, यात डॉ. सुनील यशस्वी ठरले. हे सगळे सहज झाले का? तर नाहीच. यापाठी डॉ. सुनील यांचे प्रचंड कष्ट, जिद्द आणि त्यांच्या कुटुंबाच्या संस्काराचे योगदान आहे. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ...
निसर्गाची देण ही सगळ्यांसाठी असते. आपल्याकडे जे आहे, ते गोरगरीब-गरजूंना आधी द्यावे. मग त्यांना देऊन जे उरेल, ते आपले. पीकपाण्यावर पक्ष्यांचा हक्क पहिला, त्यानंतर आपला, अशी उदात्त विचारसरणी असलेले वारकरी-परंपरेचे अधिष्ठान प्राप्त झालेले भोकरे कुटुंब. याच कुटुंबाचे वारसदार डॉ. सुनील शिवराम भोकरे. भोकरे कुटुंब मूळचे वालूर गाव, सेलू तालुका, परभणीचे. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असे म्हणत, वारकरी-परंपरा जपणारे भोकरे कुटुंब. शिवराम आणि अंजनाबाई यांचे सुपुत्र सुनील. शिवराम हे शेतकरी, तर अंजनाबाई गृहिणी. घरात आर्थिक सुबत्ता नव्हती. पण, धार्मिक आणि सांस्कृतिक सुबत्ता होती. आजी जनाबाई या अतिशय प्रगत विचारांच्या होत्या. नातवाने शिकलेच पाहिजे, ही तिची इच्छा. चुलते नारायण भोकरे यांची त्यांना आर्थिक मदत लाभली. तसे सुनील हे जात्याच हुशार होते. अभ्यासासाठी वह्या-पुस्तक मिळाली की बस! त्यामुळेच कधी अनवाणी शाळेत जावे लागले किंवा इतर कोणती सुविधा मिळाली नाही, तरी त्यांना कधीही दुःख झाले नाही. प्रचंड मेहनतीने ते ‘आयएएस’ अधिकारी झाले.
पण, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने नोकरी करता-करता ‘आयएएस’ अधिकारी होणे सोपे नव्हते. अनेकदा त्यात अपयशही आले. पण, त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न सुरूच ठेवून त्यांनी यश मिळवले. या सगळ्या काळात त्यांनी गरजूंना आरोग्य उपचारासाठी सहकार्य, मार्गदर्शन करणे, तसेच युवकांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून उच्चशिक्षण घ्यावे, यासाठी ते कार्य करतात. या सगळ्यामध्ये त्यांच्या कुटुंबाची त्यांना उत्तम साथ लाभली. पद-प्रतिष्ठा ही जनसेवेसाठीची गुरुकिल्ली आहे, असे मानणारे डॉ. सुनील म्हणतात, “समाजाच्या शेवटच्या घटकाच्या, शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी नियोजन आणि काम करायचे आहे. समाज आणि देश यांच्यासंदर्भातील कल्याणात्मक कामासाठी आयुष्यभर काम करायचे आहे.” ‘शेतकऱ्याचा मुलगा ते महाराष्ट्र राज्य शहरी आरोग्य आयुक्त’ असा लक्षणीय प्रवास करणारे डॉ. सुनील भोकरे हे केवळ आरोग्याचे डॉक्टर नाहीत, तर समाजाचे डॉक्टर आहेत.
9594969638