मुंबई : (Milind Parande) नवनवीन पद्धतींच्या माध्यमातून हिंदूंना जाळ्यात ओढून, त्यांच्या विरुद्ध व्यभिचार व धर्मांतरणाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत विश्व हिंदू परिषदेने या प्रकारांना पूर्णविराम देण्याची मागणी केली आहे. विहिपचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी सांगितले की धर्मांतरण आणि ‘लव्ह जिहाद’ हे देशव्यापी संकटाचे स्वरूप धारण करत आहेत. या प्रवाहाचा सर्वाधिक परिणाम केरळ मधील धार्मिक हिंदू समाजावर झालाय. कम्युनिस्ट-जिहादी आघाडीमुळे हे राज्य ‘लव्ह जिहाद’साठी पोषक ठिकाण बनले असल्याचा आरोप त्यांनी केला. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी राज्यात अवैध धर्मांतरणावर कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. (Milind Parande)
माध्यमांना संबोधताना त्यांनी विशेषतः ‘जिम जिहाद’, ‘कोचिंग जिहाद’, ‘यूपीएससी जिहाद’ अशा संज्ञांचा उल्लेख करत, नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत घडलेल्या कॉर्पोरेट जिहादच्या संदर्भातील घटनेने देशाला हादरवले असल्याचे म्हटले. या कथित घटनांमध्ये काही मुस्लिम महिलांच्या सहभागामुळेही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, इतर काही बहुराष्ट्रीय व आयटी कंपन्यांमध्येही हिंदूविरोधी कृत्यांच्या बातम्या समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात मुस्लिम संघटना व त्यांच्या नेत्यांची भूमिका स्पष्ट न झाल्याने संपूर्ण मुस्लिम समाजावर संशयाची छाया पडत असल्याचे त्यांनी नमूद केले. लवकरच अशा कंपन्यांशी संपर्क साधून हिंदू महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(Milind Parande)
मध्य प्रदेश येथील अनुसूचित जमातीतील एका अल्पवयीन हिंदू मुलीला केरळ येथे नेऊन तिला राजकीय संरक्षण दिल्याची घटना अत्यंत गंभीर व निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. त्या मुलीचे संरक्षण करण्याऐवजी तिचे शोषण करणाऱ्यांना पाठबळ देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी राज्यकर्त्यांवर टीका केली.(Milind Parande)
मंदिरांच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, कम्युनिस्ट सरकारांच्या धोरणांमुळे हिंदू समाज नाराज आहे. मंदिरांच्या निधीचा वापर इतर धार्मिक किंवा तथाकथित सेक्युलर कामांसाठी होऊ देणार नाही, तसेच सरकारकडून मंदिरांवरील नियंत्रण हटवून सर्व धर्मस्थळे सरकारी हस्तक्षेपातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Milind Parande)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक