शैवालाचे झाले खत !

    20-Apr-2026
Total Views |
Seaweed Fertilizer Sustainable Farming
 
किनार्‍यावर वाहून येणार्‍या समुद्री शैवालापासून खतनिर्माण करण्याचा प्रयोग आणि त्यावर संशोधन करण्याचे काम रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने केले आहे. त्याविषयी माहिती देणारा हा लेख...
 
भारताला सुमारे ७ हजार, ५०० किमी लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची सुमारे ७२० किमी लांबीची किनारपट्टी विशेष महत्त्वाची आहे. या किनारपट्टीतील कोकण विभाग हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असून जैवविविधतेचा खजिना मानला जातो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या किनारपट्टीत विविध प्रकारचे सागरी जीव, प्रवाळ, तसेच समुद्री वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. यात समुद्री शैवाल मुबलक प्रमाणात आढळतात. याच सुमद्री शैवालांपासून केलेली खतनिर्मिती रोजगाराचा, रासायनिक खतांचा एक शाश्वत पर्याय ठरला आहे.
 
आर्थिक महत्त्व
 
समुद्री शैवाल शेती ही किनारपट्टी भागातील लोकांसाठी रोजगाराचा उत्तम स्रोत ठरू शकते. कमी गुंतवणूक, जलद उत्पादन आणि निर्यातक्षम बाजारपेठ या सर्व कारणांमुळे हा उद्योग भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो.
 
शेती व जैवखत
 
शैवालांपासून तयार केलेले जैवखत जमिनीची सुपीकता वाढवते. हे रासायनिक खतांना पर्याय म्हणून शाश्वत शेतीसाठी उपयुक्त आहे. कोकण किनारपट्टी हा ‘ब्ल्यू इकोनॉमीचा महत्त्वाचा भाग आहे. येथे समुद्री संसाधनांचा शाश्वत वापर करून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करता येते. विशेषतः समुद्री शैवाल संकलन व त्यावर आधारित उद्योग ग्रामीण व किनारी भागातील रोजगार वाढवू शकतात. कोकण किनारपट्टीतील समुद्री शैवाल हे केवळ नैसर्गिक संपत्ती नसून शाश्वत विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि स्थानिक समाज यांच्या सहभागातून अशा उपक्रमांना चालना मिळाल्यास पर्यावरण संरक्षणाबरोबरच आर्थिक विकासालाही गती मिळू शकते. अशा प्रकारचे संशोधन व कृती आराखडे भविष्यात पर्यावरणपूरक भारत घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.
 
रासायनिक खतांच्या तुलनेत कोकणातील उपलब्ध संसाधने वापरून असा पहिलाच प्रकल्प हाती घेतला गेला. कोकणातील समुद्रकिनार्‍यावर साचणारा घनकचरा या माध्यमातून कमी करता येऊ शकतो. सोबतच, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. बरेचदा मासेमारी करताना जाळ्यामधून असे समुद्री शैवाल खूप जास्त प्रमाणात मच्छीमार बांधवांना मिळतात. त्यांचे संकलन करून एक जोड व्यवसाय म्हणून त्यांना नफा मिळू शकतो. याचाच अभ्यास करून ‘ब्रिटिश काऊन्सिल’ आणि ‘मुंबई विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सोशल अ‍ॅशन प्लॅन’ कार्यक्रमात प्रकल्प सादर करण्यात आला. या प्रकल्पाला ८० हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. यापुढील काळात कोकणातल्या समुद्रकिनार्‍याजवळ राहणार्‍या समुदायांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून जैविक खतनिर्मिती करून त्यांची विक्री आणि त्यातून अर्थार्जन नक्कीच होऊ शकते. हे शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रा. शरद आपटे, प्रा. डॉ. विराज चाबके आणि मी स्वतः (परेश गुरव) यावर संशोधन करून या प्रकल्पाचा आराखडा तयार केला. यासाठी रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनार्‍याची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या आराखड्यानुसार स्थानिक संसाधनांचा अभ्यास करून संकलन केले, जे भविष्यात इतर किनारी भागांसाठीही आदर्श ठरू शकते. पुढच्या काही वर्षांत रत्नागिरीतील इतर समुद्रकिनार्‍यांवरती अशा पद्धतीचे छोटे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यांनी सादर केलेला समुद्री शैवाल संकलन आणि जैवखत निर्मिती हा प्रकल्प पर्यावरण संरक्षण व ग्रामीण विकास यांचा उत्तम संगम दर्शवतो.
 
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागात साहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
 
समुद्री शैवाल म्हणजे काय?
 
समुद्रात वाढणार्‍या वनस्पतीसदृश जीवांना समुद्री शैवाल (Seaweeds) असे म्हणतात. हे प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात. हिरवे शैवाल (Green algae), तपकिरी शैवाल (Brown algae), लाल शैवाल (Red algae). हे शैवाल साधारणपणे खडक, शिंपले किंवा इतर आधारांना ‘होल्डफास्ट’ नावाच्या संरचनेने चिकटून वाढतात. म्हणजेच यांच्या वाढीसाठी एखाद्या गोष्टीला पकडून ठेवणे फार गरजेचे असते, जसे की दगड, प्रवाळदीप.
 
कोकण किनारपट्टीवर विशेषत : खडकाळ भागात हे शैवाल विपुल प्रमाणात वाढताना दिसतात. किनार्‍यावर नैसर्गिकरित्या येणारे समुद्री शैवाल ही एक मौल्यवान नैसर्गिक संपत्ती आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये समुद्री शैवाल मोठ्या प्रमाणावर आढळतात. ऑटोबर ते जानेवारी दरम्यानच्या काळात समुद्री शैवालांचे ढीगच्या ढीग कोकणातल्या समुद्रकिनार्‍यावर वाहून येतात. याच कचर्‍यातून पर्यावरणपूरक जैविक खतनिर्मिती करता येऊ शकते, हे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सिद्ध करून दाखवले आहे. समुद्री शैवालामध्ये नत्र, स्फुरद, पालाश या घटकांचे मुबलक प्रमाण असते. हेच लक्षात घेऊन त्यावर संशोधन करून त्यांनी कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक जैविक खत यशस्वीरित्या तयार केले.
 
जैविक खतनिर्मितीच्या पायर्‍या
 
संकलन - यामध्ये समुद्री शैवालांचे संकलन केले जाते. यात प्रामुख्याने sargassum या समुद्री शैवालाचा वापर करण्यात आला. समुद्रकिनार्‍यावरती भरतीच्या वेळी येऊन पडलेल्या समुद्री शैवालांचे ढीग गोळा करण्यात आले.
 
विभाजन - विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये संकलित केलेल्या शैवालांना स्वच्छ करून घेण्यात आले. त्यानंतर स्वच्छ केलेल्या या शैवालांना अगदी बारिक करून पुढील प्रक्रियेसाठी हवाबंद खोलीत ठेवण्यात आले.
 
किण्वन - या प्रक्रियेमध्ये गोड द्रावण फार महत्त्वाचे काम करते. यासाठी गुळाचा वापर करण्यात आला. बारिक केलेल्या शैवालाच्या एकूण वजनाच्या ३० टक्के पाण्याचा भाग वापरून केवळ दहा टक्के गुळाचा वापर करण्यात आला. यामध्ये २१ दिवसांचा कालावधी किण्वन (फर्मेंटेशन) होण्यासाठी लागतो. यानंतर द्रव स्वरूपात जैविक खत तयार होते.
 
गाळण- तयार झालेल्या या जैविक खताचा चोथा गाळून वेगळा केला जातो आणि तयार होते, पर्यावरणपूरक जैविक खत.
 
महाराष्ट्रात शैवाल शेतीची क्षमता
 
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी स्वच्छ पाणी, योग्य तापमान आणि खडकाळ किनारे हे सर्व शैवाल शेतीसाठी आदर्श घटक आहेत. योग्य प्रशिक्षण आणि सरकारी मदत मिळाल्यास येथील युवक शैवाल शेतीतून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.