उन्हाळ्याची सुटी अन् ‘मुमुक्षू’शी बट्टी...

    20-Apr-2026
Total Views |
Mumukshu Indian Cultural Board Game Reviving Tradition Among Kids This Summer
 
 
भारतात मुलांच्या हाती असणारे खेळ भारतीय असावे, अर्थात या खेळामध्ये भारतीय संस्कृतीचा गंध असावा, असेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मारलेल्या हाकेला ओ देत साहिलराजे शिर्केया मराठमोळ्या तरुणाने ‘मुमुक्षू’ हा खेळ तयार केला. या खेळाचा सर्वांगाने घेतलेला मागोवा...
 
लतादीदी आणि आशाताई आमच्यापासून दूर कोणत्या स्वप्नामधील गावा गेल्या आहेत, हे आम्हाला समजतच नाही. आमच्या आजी-आजोबांपासून ते आजच्या जेन-झी पिढ्यांना सुटीत गाण्यांच्या भेंड्या खेळण्यासाठी, गाणी शिकताना ज्यांची गाणी उपयोगी पडत असत, त्या दोघीही भगिनी आता दूर गेल्या आहेत. आपण सगळे त्यांच्या स्मृती जागृत ठेवत, त्यांना अभिवादन करत आपण क्रीडाविश्वातील उन्हाळी सुटीवर आधारित हा लेख सुरू करू. उन्हाळ्याची सुटी लागून आता एप्रिलचे तीनेक आठवडेही उलटले. बघताबघता जूनच्या मध्यात परत शाळा उघडतील. तोपर्यंत या सुटीत काय करायचे, याचे बेत मुलांनी त्यांच्या आई-बाबांबरोबर आधीच ठरवलेही असतील. उन्हाळी सुटीचे बेत उन्हामुळे नव्हे, तर युद्धामुळे पुनर्नियोजित करावे लागत आहेत.
 
क्रीडाक्षेत्रातील दिग्गजही आपले विदेश दौरे पुढे ढकलत आहेत. दोनवेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रानेही, दोहा डायमंड लीग स्पर्धेला जाण्याचा बेत पुढे ढकलला आहे. पश्चिम आशिया आणि मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे, दोहा येथे होणारी स्पर्धा जवळपास एका महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील क्रीडापटू जसे आपले परदेश दौरे लांबणीवर टाकत आहेत, तसेच भारतीय पर्यटकही सध्या संभ्रमावस्थेतच आहेत. आखाती देशात होत असलेल्या युद्धामुळे विदेशवारी करण्यात रस घेणारे पर्यटक, दुबई व तत्सम राष्ट्रांना भेटी देत आनंद मानणारे पर्यटक, हे आजकाल अडचणीत अडकलेले दिसतात.
 
आजच्या अनिश्चित आणि असुरक्षित जगात, लोकांना आज विदेशवारी करायलाही नकोसे वाटत असेल. मग अशा वेळी देशांतर्गत पर्यटन कामी येतं, ‘सेव्हन सिस्टर्स’ आपल्या मदतीला येतात. त्यांच्या नैसर्गिक सौंदर्य, विविध संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी पर्यटनाला जायला पर्यटक प्रेरित होतात. काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, नैनिताल, सिक्कीम, दार्जिलिंग, दक्षिण भारतातील थंड हवेची पर्यटनस्थळे अशा ठिकाणी, तसेच गोवा, लोणावळा, खंडाळा, पांचगणी, महाबळेश्वरला पर्यटक गर्दी करतात. विदेशवारीच्या तुलनेत कित्येकपटीने देशांतर्गत पर्यटनस्थळे सुरक्षित आणि परवडणारी असतात. म्हणूनच मग सगळे अशाच ठिकाणी जातात. मग त्याचा फायदा उठवत तेथील हॉटेल्सवाले आपले दर वाढवतात. एवढेच नाही, तर उन्हाळी सुट्यांमध्ये मामाच्या गावाला जाताना इतर बसवाल्यांच्या तुलनेत अत्यंत कमी असली, तरी ‘एसटी’पण आपल्या तिकिटांची हंगामी दरवाढ करून आपल्या उत्पन्नात वाढ करतानाही दिसते. असं असेल, तर मग अनेकजण सहली-पर्यटन रद्द करत घरीच राहणे पसंत करत असतील. मग अशा मंडळींच्या मदतीला कला-क्रीडा क्षेत्र येतं.
 
चित्र, नृत्य, संगीत, नाट्य अशा कला व त्यांची शिबिरे, पोहणे, सायकल शिकणे ज्यांना ते येत असेल ते याच्या सरावाला लागलेही असतील. किंवा क्रिकेट, हॉकी, फुटबॉल या खेळांप्रमाणे अनेक ठिकाणी जिम्नॅस्टिक, मल्लखांब, खो-खो, कबड्डी अशा खेळांपैकी आपल्या पसंतीच्या खेळाच्या शिबिरात प्रवेशही घेतले असतील. वाढत्या उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना, दुपारी घराबाहेर पडायला पालकांनी नकार दिला असेल, त्यामुळे उन्हं उतरेपर्यंत घरच्याघरीच काही बैठे खेळ खेळायचेही मुलांचे ठरले असेल. घरच्याघरी खेळायला बुद्धिबळ, कॅरम, पत्ते, व्यापार, लुडो, सापशिडी यांपैकी भावंडांत एकमत करून, त्यांनी असे बैठे खेळ निवडले असतील.
 
बैठ्या खेळांना प्राधान्य देणार्‍यांसाठी नोकरी-व्यवसायानिमित्त पूर्वी विदेशात जाऊन आलेल्या एका ‘बंबईका बाबू’ने, एक अनोखा स्वदेशी खेळ आणला आहे. काय आहे तो खेळ? जाणून घेऊ. म्हणजे मग तो मित्रमंडळींनाही सूचवता येईल. त्या खेळाचं नावं आहे ‘मुमुक्षू!’ हं... थांबा जरा. ‘मुमुक्षू’ हे नाव घेतल्यावर आपण अध्यात्माचा ऊहापोह करणार आहोत की काय? असच तुमच्या मनात येईल. पण, ते तसं नाहीये. ‘मुमुक्षू’ हा सापशिडीच्या जातकुळीतला एक बैठा खेळ आहे. भारतीय संस्कृतीवर आधारित एक खेळ आहे. या खेळाच्या माध्यमातून आजच्या पिढीला कोणत्या प्रदेशात कशी संस्कृती आहे, त्यांचा पेहेराव कसा आहे हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
मुंबापुरीचा एक युवक आपली विदेशातील नोकरी सोडून, आपल्या भारतमातेसाठी काहीतरी करायचे, असं ठरवतो. भारतीय इतिहास आणि सभ्यतेवर आधारित ‘मुमुक्षू’ हा ‘लाईफ सिम्युलेशन गेम’ म्हणजे, वास्तववादी जीवनाची अनुभूती देणारा आणि मुलांना खेळात नकळत गुंगवून टाकणारा असा खेळ तो सादर करत आहे. त्या ‘बंबईका बाबू’चे नाव आहे साहिलराजे शिर्के. भूराजनीतिचा अभ्यासक व अनोख्या क्षेत्रात धडाडीने कार्यरत असलेला उद्योजक असलेल्या साहिल याला, विविध विषयांमध्ये रुची आहे. त्याने रशियातील स्टावरोपोल येथे झालेल्या उद्यमशील उद्योजकांच्या ‘ब्रिस’ शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून, तो एका मुंबईस्थित टेक स्टार्टअपचा संस्थापकही आहे. तसाच त्याला धर्म व वेदान्तातही रस आहे.
 
‘मुमुक्षू’ हा भारतीय संस्कृती, इतिहास आणि जीवनशैलीवर आधारित खेळ. हा असा एक खेळ आहे, ज्याची पाळेमुळे ‘चार पुरुषार्थां’मध्ये खोलवर रुजलेली आहेत. या खेळामध्ये, एक आदर्श जीवन जगण्यासाठी तुम्ही स्पर्धा करता; त्याचवेळी तुम्ही गृहस्थधर्म, ऋण, माया यांसारख्या संकल्पनांबद्दलही जाणून घेता. ‘मुमुक्षू’त मुंबईपासून जागतिक स्तरापर्यंतच्या प्रवासात, विविध ठिकाणची शक्तिपीठे, ऐतिहासिक स्थळे यांची ओळख होते. भारतीय सभ्यता, संस्कृती, इतिहास आणि मोक्षाच्या मार्गावर आधारित ‘मुमुक्षू’मध्ये खेळाडू भारतातील विविध प्रदेश, तेथील मंदिरे, शक्तिपीठे आणि ऐतिहासिक स्थळे शोधून गुण मिळवतात. या खेळाद्वारे, मुले आणि तरुण केवळ संस्कृती, पर्यटन आणि इतिहासाबद्दलच शिकत नाहीत, तर जीवनमूल्ये, कर्म आणि चार मानवी ध्येये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देखील समजून घेतात. ‘मुमुक्षू’ खेळ निर्णयक्षमता, संसाधनांचे व्यवस्थापन आणि नैतिक मूल्यांचा स्वीकार कसा करायचा, हेदेखील शिकवतो. कुटुंबांमध्ये आणि शाळांमध्ये हा खेळ खेळल्याने, ज्ञान आणि मनोरंजन दोन्ही मिळते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘इंडियन नॉलेज सिस्टम’ वर नेहमी भर राहिलेला आहे. ‘इंडियन नॉलेज सिस्टम’ म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञान, विज्ञान, कला, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा अभ्यास होय. वेद, उपनिषदे, पुराणे आणि आयुर्वेद, गणित, स्थापत्यशास्त्र यांसारखे उपवेद. याचा वैज्ञानिक दृष्टिकोन बघता त्या केवळ पौराणिक कथा नसून, या प्रणालीमध्ये अनुभव, निरीक्षण आणि प्रयोगांवर आधारित ज्ञान असते. शालेय अभ्यासक्रमात केंद्र सरकारद्वारे शाळा आणि उच्च शिक्षणात ‘इंडियन नॉलेज सिस्टम’सारखे विषय अनिवार्य केले जात आहेत.
 
‘मुमुक्षू’ हा देखील चार आश्रमांत विभाजित असलेला हा खेळ आहे. प्रारंभी फासा टाकल्यावर समजा दोन आकडा आला, तर आपण खेळात दाखवल्याप्रमाणे ‘स्टार्ट’पासून दोन घरे पुढे ‘मंगळुरु’वर जातो. त्याचं एक ‘लोकेशन कार्ड’ दिलं जातं. त्यात लिहिल्याप्रमाणे तुम्हाला जीवनात काय करायचं आहे, ते विचारलं जातं. आपल्याला पैसे कमवायचे आहेत की ‘ग्रेस पॉईंट्स’ घ्यायचे आहेत. येथे ‘कृपा’ या शब्दात आपल्याला कर्म करायला भाग पाडलं जातं. त्या कर्माने आपण यशस्वी होणार आहोत की, नाही ते डावांत शिकवलं जातं. यात वैयक्तिक फायदे, कौटुंबिक जबाबदार्‍या, स्वतःचा आध्यात्मिक प्रवास, समाजाप्रति आपले कर्तव्य, देशाप्रति आपले कर्तव्य; माणसाच्या कर्मांचे असे पाच प्रकार आले आहेत. या खेळात तीर्थक्षेत्रे आहेत. शक्तिपीठे, ज्योतिर्लिंगे अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळी स्थळं दिसतात. यात आपण आपले इष्ट दैवत ठरवतो, जसे की आपण शिवजी निवडले, तर त्यांचे त्र्यंबकेश्वर वगैरे निवडतो आणि त्याचे पाकीट उघडतो. या खेळात त्या खेळाडूला त्या ठिकाणांचे ज्ञानही मिळत आणि एक प्रकारचं पर्यटनही होतं.
 
आपला देश, संस्कृती पुस्तकातील पाठांमधून समजण्यापेक्षा तेच जर आपण खेळाच्या माध्यमातून जाणून घेतलं, तर त्याचं आकलन तुलनेने लवकर होते. हा अनुभव लक्षात घेऊनच साहिलने या खेळाचा ध्यास घेतला. चिनी पौराणिक कथेवर आधारित ‘ब्लॅक मिथ : वुकाँग’ हा व्हिडिओ गेम जगभरात लोकप्रिय झाला होता. मग आपला इतिहास, आपली संस्कृती इतरांपेक्षा काकणभर सरसच आहे; तर मग आपलेपण तसे खेळ ‘इंडियन नॉलेज सिस्टम’सारख्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत का बरं पोहोचणार नाहीत? आज आपली मुलं पाश्चात्य संस्कृतीवर आधारित खेळांच्या आहारी तर जात नाहीत ना? आज अमेरिकन मुलं शाळेतच गोळीबार करताना आपण बघत आहोत. तशा प्रकारचे व्हिडिओ गेम पाहून, पाहूनच त्यांच्यावर आज तसेच संस्कार घडत आहेत का? पालकांनीही आपण मुलांच्या ताब्यात कसे व्हिडिओ गेम देत आहोत, हे जाणलं पाहिजे.
 
ही उन्हाळ्याची सुटी आपण आपल्या मुलांबरोबर कशी घालवत आहोत, हे जर ठरवले नसेल आणि अगदी ठरवलंही असेलही, तरीही या मुंबईच्या साहिलशी संपर्क साधून त्यांच्याकडून ‘मुमुक्षू’ खेळ विस्तृतपणे जाणून घेतला पाहिजे. आजच्या डिजिटल युगात ‘चतुर्विध’ म्हणजे चार प्रकारचे प्रवाह, त्यातील माया मानवाला संसारात गुंतवून ठेवते. धर्म, स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष या अवस्थांना ‘चतुर्विध’ म्हटले जाते. हे असले अत्यंत तांत्रिक व लिष्ट वाटणारे विषय जर एखाद्याने नुसते वाचले-ऐकले, तरी अनेकजण त्या भारतीय संकल्पनांपासून दूर पळून जातील. याच वयात जर आपण पुराण ऐकत बसलो, तर म्हातारपणी ज्या मार्गाला लागायचे, त्यावर आपण आत्ताच चालू लागलं तर असे जरतरचे विचार टाळून खेळाचा आनंद उपभोगायचा असेल, तर सोपा-सुटसुटीत खेळ ‘मुमुक्षू’शी बट्टी करून बघावी. कारण, हा खेळ कौशल्याचा, सोपा, दिलचस्प, मनोरंजक आणि सुसंस्कृत खेळाडू घडवायला मदतनीस असाच आहे.


 
(अधिक माहितीसाठी संपर्क : साहिलराजे शिर्के
ईमेल - [email protected]
व्हॉट्सअ‍ॅप - ९९६९५२००१५)

- श्रीपाद पेंडसे

(लेखक माजी खेलकूद आयामप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.) ९४२२०३१७०४