'Mumbai Against Drugs' Campaign : नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिन १ मे पासून वर्षभर 'मुंबई अगेन्स्ट ड्रग्स' मोहीम
उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत निर्णय, गोरेगाव इथल्या ड्रग्स प्रकरणानंतर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती बैठक
20-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Against Drugs Campaign) मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्स) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने युवा पिढीला बसत असलेला अंमलीपदार्थांचा विळखा प्रकर्षाने जाणवला. या स्थितीत प्रतिबंधात्मक उपाय आणि युवा पिढीच्या जागरुकतेसाठी १ मे महाराष्ट्र दिनापासून नशामुक्त मुंबईसाठी 'मुंबई अगेन्स्ट ड्रग्स' मोहीम राबवणार असल्याची माहिती उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. गोरेगाव इथल्या ड्रग्स प्रकरणानंतर मंत्री लोढा यांनी या कार्यालयात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई भाजप अध्यक्ष आमदार श्री. अमितजी साटम ही उपस्थित होते.(Mumbai Against Drugs Campaign)
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अतिशय बारकाईने गोरेगाव येथील प्रकरणात लक्ष घालत आहेत. मुंबई पोलिसांनीही आपली भूमिका चोख बजावत असून आयोजक आणि काही अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून त्यांना कडक शासन होईलच,पण या घटना परत परत घडू नयेत यासाठी जनजागृती महत्त्वाची आल्यानेच ही बैठक बोलवली असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. आदरणीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन १ मे २०२६ ते १ मे २०२७ या कालावधीत मुंबई अगेन्स्ट ड्रग्स' ही मोहीम वर्षभर राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Mumbai Against Drugs Campaign)
सध्या प्राथमिक तत्वावर उपनगरात ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यानंतर या मोहिमेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनात व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. येत्या काही दिवसात वर्षभरातील कार्यक्रमांचा आराखडा निश्चित केला जाईल. तसेच यासंदर्भात एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कमिटीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात येतील. तसेच महापालिकेचे विद्यमान वॉर्ड अध्यक्ष या कमिटीचे उपाध्यक्ष असतील. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षण अधिकारी अशा १२ सदस्यांची कमिटी असेल. त्याचबरोबर स्थानिक संसद सदस्य, आमदार, नगरसेवक हे लोकप्रतिनिधी या कमिटीचे विशेष निमंत्रित सदस्य असणार आहेत, अशी माहितीही मंत्री लोढा यांनी दिली. सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, गैरसरकारी संस्था अर्थात एनजीओ च्या सहकार्याने ही कमिटी समाजात विविध उपक्रम राबवून तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून रोखण्याचे काम करणार आहे.(Mumbai Against Drugs Campaign)
मुंबई पोलिस गेल्या सोळा महिन्यांपासून ड्रग्स विरोधात कडक मोहीम राबवत आहेत.पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.ही समस्या केवळ पोलिसांच्या कारवाईने सुटणार नसून त्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. प्रशासनाने कितीही अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी काही समाजविघातक प्रवृत्ती समाजात असतात या प्रवृत्तींच्या विरोधात आता सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लढा उभारला जात आहे. असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.(Mumbai Against Drugs Campaign)
या बैठकी दरम्यान मुंबई भाजप अध्यक्ष आमदार श्री. अमितजी साटम म्हणाले की, तरुण पिढीला सावरण्यासाठी त्यांच्याच सोशल मिडिया माध्यमा द्वारे जन जागृती झाली पाहिजे. प्रत्येक समिती कक्षेतील शाळा, कॉलेजेस, मोठ मोठे हॉटेल आणि मॉल या ठिकाणी जिथे तरुण असतील तिथे जागृती करणारे कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. तरुण पिढीला मनोरंजनापासून रोखणे हा पर्याय नाही, तर विधायक आणि सुसंस्कृत पणे अमली पदार्थ विरहित त्यांना आनंद घेण्यासाठी समाजाने प्रवृत्त केले पाहिजे. तरुणांकडूनच जेव्हा अमलीपदार्थाला नकार देण्यात येईल, तेव्हा आपण ही लढाई जिंकलो असे म्हणता येईल, असे साटमजी यांनी सांगितले.(Mumbai Against Drugs Campaign)
या शिवाय उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभजी कटियार यांनी सांगितले की, या गंभीर प्रश्नावर प्रशासन काटेकोरपणे काम करत आहे. बैठकीत करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून अधिक कार्यक्षम पद्धतीने हा विषय हाताळला जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. मंत्री लोढा यांनी बोलावलेल्या बैठकीत अमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, शिक्षण अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ही उपस्थित होते.(Mumbai Against Drugs Campaign)