५५ हजार, २०० नवे स्टार्टअप्स, २.२३ लाखांची एकूण संख्या आणि २३ लाखांहून अधिक रोजगार ही निव्वळ आकडेवारी नाही, तर ती भारताच्या बदलत्या आर्थिक स्वभावाची साक्ष ठरली आहे. प्रश्न फक्त वाढीचा नाही; तर तो हा आहे की, ही वाढ आपण किती दूर नेऊ शकतो?
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे, हे आता सांगण्याची फारशी गरज उरलेली नाही. पण हा बदल कसा घडत आहे, हे समजून घेणे म्हणूनच अधिक महत्त्वाचे ठरते. कारण प्रत्येक मोठ्या बदलामागे काही शांत प्रक्रिया असतात, ज्या दिसत नाहीत, पण परिणाम मात्र ठळकपणे दिसत राहतो. स्टार्टअप्सची ही वाढ तशीच आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५५ हजार, २०० स्टार्टअप्सना अधिकृत मान्यता मिळाली. ‘स्टार्टअप इंडिया’अंतर्गत एकूण संख्या २.२३ लाखांवर पोहोचली आणि २३.३६ लाखांहून अधिक थेट रोजगार निर्माण झाले. हे आकडे भारताच्या आर्थिक मानसिकतेत झालेल्या बदलाचे प्रतिबिंब ठरले आहेत.
आपण सहसा आकडे पाहतो आणि त्यातूनच निष्कर्ष काढतो. मोठे आकडे म्हणजे मोठे यश. परंतु येथे थांबणे धोकादायक असते. कारण आकडे हे नेहमीच परिणाम असतात, बदलाचे कारण नाहीत. हे ५५ हजार, २०० स्टार्टअप्स अचानक निर्माण झालेले नाहीत. त्यामागे गेल्या दशकभरात तयार करण्यात आलेली पायाभूत रचना आहे. डिजिटल इंडिया, जगाच्या तुलनेत स्वस्त असणारी इंटरनेट सेवा, ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली मोबाईल कनेटिव्हिटी आणि वित्तीय समावेशन या सगळ्यांनी मिळून कल्पना रुजण्यास जागा मिळेल, अशी संधी निर्माण केली. याच पार्श्वभूमीवर ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या उपक्रमांनी या प्रक्रियेला वेग दिला. धोरणात्मक स्पष्टता, करसवलती, निधी आणि इनयुबेशन या सगळ्यांनी एकत्र येऊन उद्योजकतेला दिशा दिली. त्यामुळे आजचे आकडे हे एका मोठ्या प्रक्रियेचे फलित आहेत.
या संपूर्ण कथेत सर्वांत महत्त्वाचा घटक कोणता, तर तो आहे मानसिकता. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात नोकरी मिळवणे, हीच यशाची ढोबळमानाने व्याख्या होती. सरकारी नोकरी किंवा मोठ्या कंपनीतील कायमस्वरूपी नोकरी, हीच सुरक्षिततेची ओळख मानली जात असे. तथापि, आजचा तरुण वेगळा विचार करतो आहे. तो विचारतो, ‘मी काय निर्माण करू शकतो?’ हा बदल सहजासहजी घडून आलेला नाही. अपयशाची भीती कमी झाली आहे. जोखीम घेण्याची तयारी वाढली आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, समाजानेही उद्योजकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. ही मानसिक क्रांती कोणत्याही आकड्यांपेक्षा मोठी आहे. कारण, आकड्यांमध्ये बदल होत राहातात, मानसिकता मात्र कायम राहते.
२३.३६ लाख रोजगार हा आकडा महत्त्वाचा आहे. स्टार्टअप्समुळे निर्माण होणारे रोजगार रुढार्थाने स्थिर नसतात, ते गतिशील असतात. ते व्यक्तीला सतत शिकायला, बदलायला आणि स्वतःला सुधारायला भाग पाडतात. पूर्वी नोकरी म्हणजे स्थिरता होती; आज नोकरी म्हणजे संधी आहे. पूर्वी अनुभव महत्त्वाचा होता; आज कौशल्य महत्त्वाचे झाले आहे. ही बदललेली व्याख्या प्रारंभी अस्थिर वाटू शकते, पण दीर्घकालीन दृष्टीने ती अधिक सक्षम अर्थव्यवस्था तयार करते. कारण ती व्यक्तीला निष्क्रिय न ठेवता, सक्रिय ठेवते. भारताची खरी ताकद आहे, ती समस्यांचे वेगळ्या पद्धतीने निराकरण करण्याची क्षमता. स्टार्टअप्समुळे ही क्षमता अधिक ठळक झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत होत असलेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे, भौगोलिक विस्तार. स्टार्टअप्स आता बंगळुरु, मुंबई किंवा दिल्लीपुरतेच मर्यादित नाहीत. पुणे, नाशिक, नागपूर, इंदोर, जयपूर, कोइंबतूर ही नवी केंद्रे उभी राहात आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे, संधी आता मोजया शहरांपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती देशभर मिळत आहे.
हा बदल भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असाच. कारण तो प्रादेशिक असमतोल कमी करतो आणि सर्वसमावेशक वाढ घडवतो. महाराष्ट्र या प्रक्रियेत अग्रस्थानी आहे. औद्योगिक वारसा, शिक्षण व्यवस्था आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण या तिन्हींचा संगम येथे दिसून येतो. पुणे विशेष उल्लेखनीय ठरते. आयटी, ऑटोमोबाईल आणि शिक्षण या क्षेत्रांमुळे येथे नवकल्पनांना अधिक वाव मिळतो. त्याचवेळी, ही संधी कायम ठेवण्यासाठी सातत्यही तितकेच आवश्यक आहे. धोरणांमध्ये स्थिरता आणि अंमलबजावणीतील वेग या दोन गोष्टी निर्णायक ठरतात.
गेल्या काही वर्षांत ‘युनिकॉर्न’ हा शब्द खूप चर्चेत आला. अब्ज डॉलर मूल्यांकन मिळवणार्या कंपन्यांना विशेष महत्त्व दिले गेले. मात्र, भारतासाठी अधिक महत्त्वाचे आहे ते म्हणजे, याचे व्यापक परिणाम. एक कंपनी किती मोठी आहे, यापेक्षा ती किती लोकांच्या जीवनात बदल घडवते, हे अधिक महत्त्वाचे आहे. भारतातील स्टार्टअप्सची खरी ताकद हीच आहे. ते निव्वळ संपत्ती निर्माण करत नाहीत, तर ते संधीही निर्माण करतात. या संपूर्ण प्रवासात सरकारची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरते. सरकार मार्ग मोकळा करू शकते, अडथळे दूर करू शकते आणि प्रारंभिक आधार देऊ शकते. मात्र, प्रवास हा उद्योजकांनीच करायचा आहे. ही समज कायम ठेवली, तरच हा वेग कायम राहील; अन्यथा तो अवलंबित्वाकडे जाईल. भारताचा या क्षेत्रातील आजपर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा असाच आहे. पण, पुढचा टप्पा अधिक कठीण आहे. वाढ साध्य करणे ही एक गोष्ट आहे; ती टिकवणे ही दुसरी आणि तीच आव्हानात्मक बाब असते.
जगातील मोठ्या अर्थव्यवस्था या फक्त आकाराने मोठ्या नसतात; त्या नवकल्पनांनी चालतात. अमेरिका तंत्रज्ञानामुळे, चीन उत्पादनामुळे आणि युरोप संशोधनामुळे पुढे आहे. भारताला या स्पर्धेत स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर स्टार्टअप्स हा पर्याय नसून ती गरज ठरते. म्हणूनच २.२३ लाख स्टार्टअप्स आणि २३ लाख रोजगार ही आकडेवारी वेगळी पाहता येत नाही. ती भारताच्या जागतिक स्पर्धेत पुढे जाण्याच्या क्षमतेशी जोडली गेलेली आहे. अर्थव्यवस्थेचा आकार वाढवणे आणि तिची गुणवत्ता सुधारणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भारताने पहिला टप्पा पार केला असून, आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. येथे नवकल्पना देशाची ओळख ठरवतील. ५५ हजार, २०० हा आकडा महत्त्वाचा आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचा आहे तो आत्मविश्वास. हा आत्मविश्वास टिकवला, तर भारत फक्त स्टार्टअप हबपुरता मर्यादित राहणार नाही; तो जागतिक नवकल्पनांचा केंद्रबिंदू बनेल. आणि म्हणूनच, हा क्षण म्हणजे नवभारताच्या आत्मविश्वासाचा प्रारंभ आहे.