Humanoid Robots Marathon China (Image Credit : hongkongfp.com)
आखाती देशांमध्ये धुमसणार्या संघर्षाचे लोळ सर्वदूर पसरले आणि जगालादेखील या युद्धाची झळ सोसावी लागली. युद्धाचा वणवा दिवसेंदिवस वाढत असताना सार्यांचेच लक्ष सुरू असलेल्या वाटाघाटी, महासत्तांच्या भूमिकेकडे लागले आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम होणार आहेतच; मात्र त्याचबरोबर बदलणार्या भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उदयाला येणार्या नव्या महासत्तांकडेदेखील जगाचे लक्ष आहे. चीनसारख्या बलाढ्य राष्ट्राने या युद्धात ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ हीच भूमिका घेतल्याचे निर्दशनास येते. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर चीनची सुरू असलेली मुलखावेगळी कामगिरी थक्क करणारी आहेच; मात्र त्याचबरोबर तंत्रज्ञानातील विकासाला प्राधान्य न देणार्या राष्ट्राला एक गंभीर इशाराही आहे.
बीजिंग येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये केवळ मानवी धावपटूच नव्हते, तर अत्याधुनिक ‘ह्युमनॉईड रोबोट्स’ (मानवासारखे दिसणारे यंत्रमानव)देखील सहभागी झाले होते. आश्चर्याची बाब म्हणजे, या रोबोट्सनी अनेक सरावलेल्या मानवी धावपटूंना मागे टाकत विजयाचा नवा विक्रमही रचला. १०० गटांमधून ३०० हून अधिक रोबोट्स या मॅरेथॉनमध्ये धावले आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील गरुडभरारी सगळ्यांनी अनुभवली. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या रोबोट्सच्या पायांची रचना मानवी स्नायूंप्रमाणेच लवचिक ठेवण्यात आली होती, ज्यामुळे ते खडबडीत रस्त्यावरही समतोल राखू शकले. या रोबोट्समध्ये बसवण्यात आलेले सेन्सर्स आणि ‘रिअल-टाईम डेटा प्रोसेसिंग’मुळे त्यांना वळणे घेणे, मानवी धावपटूंच्या तुलनेत आपला वेग नियंत्रित करणे सोपे गेले. जेव्हा हे रोबोट्स मानवी धावपटूंच्या खांद्याला खांदा लावून धावत होते, तेव्हा मानवी क्षमता आणि यंत्रमानवाची अचूकता यांच्यातील संघर्ष लोकांना बघायला मिळाला. या शर्यतीत चिनी स्मार्टफोन ब्रॅण्ड ‘केपी’ने विकसित केलेला यंत्रमानव विजयी झाला. त्याने ही शर्यत ५० मिनिटे, २६ सेकंदांमध्ये पूर्ण केली. या नव्या विक्रमाने गेल्या महिन्यात लिस्बन येथे युगांडाचा धावपटू जेकब किप्लिमो याने रचलेल्या विक्रमावर मात केली.
यावर भाष्य करताना एक चिनी अभियांत्रिकी म्हणाले की, ही प्रगती कदाचित आपल्याला फारशी अर्थपूर्ण वाटणार नाही. मात्र, काळाच्या ओघात औद्योगिक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण वेगाने शय होईल. बीजिंग हाफ मॅरेथॉनमधील या यशामुळे, रोबोटिसच्या व्यापारीकरणाला मोठीच चालना मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थिती, शोध आणि बचावकार्य आणि लष्करी हालचालींमध्ये वेगवान रोबोट्सचा वापर फायदेशीर ठरू शकतो. जिथे म्हणून माणसाच्या वावरण्याला धोका संभावतो, तिथे यंत्रमानवांच्या माध्यमातून काम करवून घेतले जाऊ शकते.
अशा प्रयोगांमधून व्यावसायिकतेचं गणित बांधणार्या या देशातील विद्यार्थ्यांच्या मनामध्येदेखील, यामुळे कुतूहल जागृत झाले आहे. या मॅरेथॉनमध्ये धावणार्या यंत्रमानवांना बघून उपस्थित असलेल्या ११ वर्षांच्या मुलाने निश्चय केला की, तो भविष्यात विद्यापीठाचे शिक्षण घेताना ‘रोबोटिक्स’च्या अभ्यासक्रमासाठी प्रयत्नशील राहील. तरुण मुला-मुलींच्या मनाच्या अवकाशात जर एखाद्या गोष्टीने घर केले की, आपसूकच त्यांना त्याविषयीची गोडी लागते.
चीनसारख्या राष्ट्राने आज हे प्रगतीचे शिखर बघण्यासाठी दोन ते तीन दशकांपूर्वी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आदी गोष्टींमध्ये गुंतवणूक केली होती. काळाच्या ओघात, भविष्याची दिशा ओळखून चीनने इतर महासत्तांना लाजवेल, अशी कामगिरी करून दाखवली आहे. एका बाजूला सत्तेच्या खेळात अग्रेसर राहताना, दुसर्या बाजूला इतर आघाड्यांनादेखील तितयाच शिताफीने हाताळण्याचे काम चीनने केलेे आहेत. बीजिंग हाफ मॅरेथॉनमधील ‘ह्युमनॉईड रोबोट्स’ची ही कामगिरी मानवी बुद्धिमत्तेचा विजय आहे. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनामुळे, सातत्याने बदलणार्या भूराजकीय परिस्थितीमुळे आयटी क्षेत्रात काम करणार्या लोकांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे. डिजिटल विश्वात वावरताना समोर आलेली माहिती खरी आहे की खोटी, यावरसुद्धा शंका घेण्याचा काळ येऊन ठेपला आहे. या आणि अशा असंख्य आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, दुधारी तलवार असलेल्या तंत्रज्ञानाचा विचार करणे अगत्याचे आहे.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.