नाते जपणारा ‘ब्लू व्हेल’

    20-Apr-2026
Total Views |

Blue whale upwelling relationship reveals how ocean nutrient cycles directly influence whale feeding, migration, and survival patterns.

 
पर्यावरणीय परिसंस्थेत घडणारी प्रत्येक घटना किंवा प्रत्येक जीव हा एकमेकांवर अवलंबून असतो. जगातील सर्वांत मोठा सस्तन प्राणी म्हणजेच ब्लू व्हेलदेखील त्याला अपवाद नाही. ‘अपवेलिंग’ या सागरी परिसंस्थेतील घटनेचा प्रभाव ब्लू व्हेलवर कसा पडतो, ते विशद करणारा हा लेख...
 
सागराच्या अथांग विश्वात अधिवास करणारा जगातील सर्वांत मोठा सस्तन प्राणी म्हणजे ब्लू व्हेल. जमिनीवर किंवा सागरात राहणार्‍या प्रत्येक जीवाचे त्या अधिवासात घडणार्‍या घटनांसोबत किंवा जीवांसोबत सहसंबंधाचे नाते आहे. एकमेकांच्या क्रियांवर त्यांची हालचाल, प्रजनन आणि खाद्य हे अवलंबून आहे. निळ्या देवमाशाचे म्हणजेच ब्लू व्हेलचेदेखील असेच काहीसे आहे. सागरी परिसंस्थेत राहताना ब्लू व्हेल मासा हा या परिसंस्थेसोबत कशा पद्धतीने सहसंबंधाचे नाते जोपासून असतो, हे नुकतेच मला मध्य कॅलिफोर्नियाच्या सागरी परिक्षेत्रात अधिवास करणार्‍या ब्लू व्हेलसंदर्भात जाणून घेतल्यावर समजले. त्याविषयी माहिती देण्याचा केलेला हा प्रयत्न.
 
किनारी ‘अपवेलिंग’ ही महासागरातील एक शास्त्रीय घटना आहे. यामध्ये वार्‍यामुळे समुद्राच्या तळाशी असलेले थंड, घनता जास्त असलेले आणि पोषकद्रव्यांनी युक्त असलेले समृद्ध पाणी सागराच्या पृष्ठभागावर येते. या प्रक्रियेदरम्यान पृष्ठभागावरील कमी पोषकद्रव्ययुक्त पाणी त्या भागातून दूर सरकते आणि त्याची जागा पोषकद्रव्ययुक्त पाणी घेते. या प्रक्रियेमुळे समुद्रातील प्राथमिक उत्पादकता वाढते, जसे की ‘फायटोप्लँटन’ची वाढ होते. ‘फायटोप्लँटन’ हे सूक्ष्म वनस्पतीसारखे जीव आहेत, जे महासागराच्या वरच्या थरात तरंगतात. हे जलचर अन्नसाखळीचे प्राथमिक उत्पादक आहेत. जे सूर्यप्रकाश, कार्बन डायऑसाईड आणि पोषक तत्त्वांचा वापर करून प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आता या प्रकाशसंश्लेषणासाठी ‘लोरोफिल’ नावाचे जैविक द्रव्य आवश्यक असते. कमी तापमान असलेल्या भागात ‘लोरोफिल’चे प्रमाण जास्त असते.
 
आता ‘अपवेलिंग’ या घटनेचे आणि व्हेल यांचे सहसंबधाचे नाते आहे. कारण, ‘अपवेलिंग’मुळे पोषक घटकांनी समृद्ध पाणी समुद्राच्या पृष्ठभागावर येते. या पोषक घटकांमुळे ‘फायटोप्लँटन’ची झपाट्याने वाढ होते. हे ‘फायटोप्लँटन’ पुढे क्रिल आणि लहान माशांचे अन्न बनतात. ब्लू व्हेलचे प्रमुख खाद्य, हे क्रिल आहेत. व्हेल मासे ‘अपवेलिंग’च्या चक्रानुसार हालचाली करतात. ‘अपवेलिंग’चा काळ जेवढा मोठा असेल, तेवढे व्हेल माशांचे आरोग्य (Body Condition) सुधारते. पोषक अन्नाच्या उपलब्धतेमुळे व्हेल माशांना स्थलांतर आणि प्रजननासाठी लागणारी ऊर्जा मिळते. एकंदरीत व्हेल माशांसाठी ‘अपवेलिंग’ हे फायद्याचे ठरते.
मध्य कॅलिफोर्निया सागरी परिक्षेत्रात अधिवास करणार्‍या ब्लू व्हेल माशाच्या आवाजांची नोंद करण्याकरिता संशोधकांनी ‘पॅसिव्ह अकॉस्टिक मॉनिटरिंग’(PAM) या पद्धतीचा वापर केला. हे संशोधन ‘मॉन्टेरी’ या खाडीक्षेत्रात करण्यात आले.



blue whale upwelling relationship (3)
 
‘पॅसिव्ह अकॉस्टिक मॉनिटरिंग’ (PAM) हे वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी रेकॉर्डिंग उपकरणे (हायड्रोफोन्स/मायक्रोफोन) वापरून नैसर्गिक आवाज टिपण्याचे तंत्र आहे. ही ‘निष्क्रिय’ म्हणजेच ‘नॉन-इनवेसिव्ह’ पद्धत आहे. कारण हे उपकरण कोणताही आवाज निर्माण न करता, केवळ पर्यावरणातील ध्वनी टिपते. प्राण्यांना त्रास न देता किंवा त्यांच्या नैसर्गिक वर्तनात हस्तक्षेप न करता, हे उपकरण माहिती गोळा करते. तसेच मानवी हस्तक्षेपाशिवाय दीर्घकाळासाठी ध्वनी रेकॉर्ड करते. अत्यंत खराब हवामानातही ते काम करू शकते, जिथे दृश्य निरीक्षण अशय असते. या उपकरणाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी दहा-८० हर्ट्झ (Hz) हून कमी वारंवारतेचा ब्लू व्हेल माशाचा आवाज नोंदवला. तसेच २०१५ ते २०२४ या कालावधीत त्यांनी ब्लू व्हेलसोबतच फिन व्हेल्सचे आवाजही मोठ्या प्रमाणावर नोंदवले. व्हेलच्या आवाजासंबंधीच्या संशोधनामधील ‘अकॉस्टिक व्हेटर सेन्सिंग (AVS) हे ध्वनिलहरींचे मोजमाप करण्यासंबंधीचे एक प्रगत तंत्रज्ञान आहे. पारंपरिक सेन्सर (हायड्रोफोन्स किंवा मायक्रोफोन्स) फक्त ध्वनीचा दाब (­Acoustic Pressure) मोजतात, तर अतड ध्वनीचा दाब आणि कणांचा वेग (Particle Velocity) या दोन्ही गोष्टी एकाचवेळी मोजते. विशेषतः २०-४० कू या कमी वारंवारतेतील निळ्या देवमाशाच्या आणि फिन व्हेल्सच्या आवाजांचा अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते.
 
क्रिलसारखे कंटकचर्मी जीव म्हणजेच ‘क्रस्टेशियन जलचर’ हे ब्लू व्हेलचे प्रमुख अन्नस्रोत आहेत. ब्लू व्हेल दररोज चार ते आठ टन क्रिल खातो. ‘अपवेलिंग’च्या उत्पादकतेमुळे क्रिल हे एका ठिकाणी एकटवतात. त्यामुळे व्हेल मासेही त्याठिकाणी एकटवतात. ''Oceanic giants dance to atmospheric rhythms: Ephemeral winddriven resource tracking by blue whales'' हे २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेले संशोधन आहे. या संशोधनानुसार ब्लू व्हेल हे वार्‍यामुळे तयार होणार्‍या महासागरीय प्रवाहांचा मागोवा घेऊन क्रिलपर्यंत पोहोचतात. पाण्याखालील हायड्रोफोन आणि ट्रॅकिंग टॅगच्या साहाय्याने शास्त्रज्ञांनी पाहिले की, व्हेल हे ‘अपवेलिंग’च्या पोषक पाण्याच्या प्रवाहांमध्ये राहण्यासाठी आपली हालचाल बदलतात. यामुळे त्यांची ऊर्जा वाचते आणि स्थलांतरादरम्यान कमी श्रमात जास्त अन्न मिळते. मात्र, अन्नाच्या शोधात ते व्यस्त जहाजमार्गही ओलांडतात. त्यामुळे समुद्रव्यवस्थापन आवश्यक असल्याचे अधोरेखित होते.


blue whale upwelling relationship (2)
 
''Animal-borne metrics enable acoustic detection of blue whale migration'' या संशोधनामध्ये ब्लू व्हेलच्या आवाजांच्या पद्धतीतील बदल समजावून सांगितले आहेत. उन्हाळ्यातील खाद्यसत्रीत ते रात्री जास्त आवाज देतात. कारण दिवसा ते क्रिल खाण्यात व्यस्त असतात. परंतु, दक्षिणेकडील प्रजननस्थळी स्थलांतर करताना ते दिवसा जास्त आवाज देतात. या दैनंदिन आवाजांच्या पद्धतीवरून संशोधक आता त्यांचे स्थलांतर कधी सुरू होते, हे ओळखू शकतात. यामुळे स्थलांतराच्या काळात मोठ्या मालवाहू जहाजांचा वेग कमी करण्यास मदत होते.
 
 ''A­coustic signature reveals blue whales tune life-history transitions to oceanographic conditions''  या २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात व्हेलच्या आवांजाचा अभ्यास सहा वर्षे करण्यात आला. या सहा वर्षांत असे दिसून आले की, समुद्री परिस्थितीनुसार ब्लू व्हेल खाद्यस्थळ आणि प्रजननस्थळ यांतील स्थलांतर चार महिन्यांपर्यंत उशिरा करू शकतात. जर क्रिल भरपूर आणि जास्त काळ उपलब्ध असतील, तर ते खाद्यस्थळी अधिक काळ राहतात. त्यांच्या हालचालींचे वेळापत्रक समुद्रातील उत्पादकतेवर अवलंबून असते. ही लवचिकता बदलत्या जागतिक पर्यावरणात त्यांना टिकून राहण्यास मदत करते. तसेच ती समुद्राच्या आरोग्याचे नैसर्गिक संकेतक आहे. याच संशोधनातून जहाजांच्या धडकेचा धोका समजून घेण्यासही मदत होते. एकूणच निळ्या देवमाशांबद्दल आणि त्यांच्या स्थलांतरावर परिणाम करणार्‍या घटकांचे एकमेकांशी सहसंबंधाचे नाते आहे.
 
 
प्रदीप चोगले
 
(लेखक ‘वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट’ या संस्थेत सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)