बस्तरचा उल्लेख झाला की मनात प्रथम उभे राहतात, ते नक्षलवाद, संघर्ष आणि असुरक्षिततेची चित्रे. परंतु, या एकांगी प्रतिमेपलीकडे एक वेगळाच बस्तर आहे; निसर्गसंपन्न, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि सामुदायिक जीवनमूल्यांनी भरलेला. बदलत्या परिस्थितीत आज बस्तर एका नव्या वळणावर उभा आहे, जिथे भीतीच्या सावल्या मागे सरकत आहेत आणि विकासाच्या शयता नव्याने आकार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर बस्तरकडे केवळ भूतकाळाच्या चौकटीतून नव्हे, तर भविष्याच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. प्रस्तुत लेखातून बस्तरच्या या परिवर्तनशील प्रवासाचा वेध घेत, त्याच्या विकासाच्या दिशांचा सखोल विचार मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बस्तरकडे आपण खूप काळ एकाच नजरेतून पाहात आलो आहोत; संघर्ष, नक्षलवाद, बंदुका आणि असुरक्षितता. इतया दीर्घ काळापर्यंत हीच प्रतिमा आपल्या समोर ठेवली गेली की बस्तरचा दुसरा चेहरा जो अधिक खोल, प्राचीन आणि जिवंत आहे, तो जवळजवळ लोप पावला आहे. प्रत्यक्षात बस्तर हा केवळ संघर्षाचा भूभाग नाही; तो सभ्यता, स्मृती, श्रम, जंगल, पाणी, कला आणि समुदाय यांचाही प्रदेश आहे. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून भय आणि असुरक्षिततेची रात्र संपली आहे. अशा वेळी मोठा प्रश्न उभा राहतो की, ‘आता पुढे काय?’ आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ‘बस्तरचा पुढचा मार्ग कसा असावा?’
माझ्या मते याचे उत्तर सरळ आहे; बस्तरला विकास हवा. पण असा विकास नव्हे, जो बाहेरून आणून लादला जाईल; तर असा जो इथल्याच मातीमधून उगम पावेल, इथल्या लोकांच्या आकांक्षांमधून घडेल आणि इथल्या समाजाच्या सहभागातून आकार घेईल. बस्तरला कागदोपत्री योजना, फाईल्स किंवा आराखड्यांमधून समजून घेता येणार नाही. बस्तरला समजून घ्यायचे असेल तर त्याच्या गावांमध्ये, लोकपरंपरांमध्ये, निर्णयप्रक्रियेत आणि सामाजिक रचनेत डोकावावे लागेल.
उदाहरणार्थ, मोठ्या डोंगरकडे पाहा. तेथे जेव्हा राजा नव्हता, तेव्हा लोकांनी लिंबूलाच ‘लिमऊ राजा’चे प्रतीक मानले. एका दगडावर बसून, धूप-दीप करून लोक सामूहिक निर्णय घेतात. ही परंपरा आजही जिवंत आहे. ही केवळ एक साधी लोककथा नाही, तर बस्तरच्या सामुदायिक बुद्धिमत्तेचे द्योतक आहे. यावरून स्पष्ट होते की, येथे निर्णय वरून लादले जात नाहीत, तर एकत्र येऊन घेतले जातात. हीच ती मूलभूत गोष्ट आहे, जी बस्तरच्या विकासाचा विचार करताना समजून घेणे आवश्यक आहे.
रोचक बाब म्हणजे ‘बस्तर’ या शब्दातच, त्याच्या विकासप्रवासाचे संकेत दडलेले आहेत. एका मतानुसार ‘बस्तर’ हा शब्द ‘वस्त्र’ या शब्दापासून तयार झाला आहे. जर असे मानले, तर तो केवळ भाषिक योगायोग नसून या भूभागाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक दिशेकडे निर्देश करणारा आहे. बस्तरचे ‘कोसा’ हे केवळ एक कापड नसून त्याची ओळख, त्याचे शिल्प आणि मोठी आर्थिक क्षमता आहे. आज जग पुन्हा नैसर्गिक, हस्तनिर्मित आणि टिकाऊ वस्त्रांकडे वळत असताना, बस्तरचे ‘कोसा’ ही केवळ परंपरा राहात नाही, तर ते रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण, ग्रामीण उद्योग आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधीही ठरू शकते. योग्य डिझाईन, ब्रॅण्डिंग, गुणवत्ता, विपणन आणि ई-कॉमर्सशी जोडल्यास, ’कोसा’ बस्तरच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत स्तंभ होऊ शकतो.
‘बस्तर’ शब्दाची आणखी एक लोकव्याख्या ‘बांबू तरी’ (बांबूंच्या खाली किंवा मध्ये वसलेला प्रदेश) अशीही केली जाते. ही व्याख्यादेखील केवळ भाषिक कुतूहल नसून, बस्तरच्या भौगोलिक आणि आर्थिक वास्तवाकडे निर्देश करते. बस्तरमध्ये बांबू सर्वत्र आढळतो; मात्र त्यावर आधारित उद्योग अजूनही पूर्ण क्षमतेने विकसित झालेले नाहीत. आज बांबू हा फक्त टोपल्या किंवा पारंपरिक वस्तूंपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यापासून फर्निचर, घरगुती वस्तू, सजावटी उत्पादने, अगरबत्तीच्या काड्या, पर्यावरणपूरक पॅकेजिंग, बांधकाम साहित्य आणि विविध सूक्ष्म उद्योग उभे करता येतात. त्यामुळे बस्तरमध्ये बांबू हा केवळ वनउत्पादन नसून, एक व्यापक हरित अर्थव्यवस्थेचा पाया ठरू शकतो.
बस्तरची खरी संपत्ती म्हणजे पाणी, जमीन, जंगल आणि हाट-बाजार. ही केवळ संसाधने नसून, येथील जीवनव्यवस्थेचे चार आधारस्तंभ आहेत. आपण अनेकदा हाट-बाजाराला फक्त एक बाजारपेठ समजतो; पण बस्तरमध्ये ‘हाट’ म्हणजे त्यापेक्षा खूप व्यापक संकल्पना आहे. तो आर्थिक व्यवहाराचे केंद्र आहेच, पण तो सामाजिक संवादाचाही मंच आणि सांस्कृतिक स्पंदनाचे केंद्रही आहे. इथेच खरेदी-विक्री होते, इथेच बातम्या फिरतात, इथेच नाती जुळतात आणि समाज स्वतःला पाहतो. अनेक ठिकाणी आजही विश्वास हाच रोख पैशांपेक्षा मोठा व्यवहाराचा आधार आहे. त्यामुळे बस्तरची स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल, तर हाट-बाजारांना सक्षम करणे अत्यावश्यक आहे. उत्तम पायाभूत सुविधा, साठवण व्यवस्था, स्थानिक उत्पादनांसाठी स्वतंत्र जागा, महिला गटांसाठी व्यासपीठ आणि बाजाराशी थेट जोडणी यांद्वारे.
पाण्याच्या दृष्टीनेही बस्तर हा अत्यंत महत्त्वाच्या शयतांनी समृद्ध प्रदेश आहे. हा भाग गोदावरी नदी आणि महानदी यांच्यादरम्यान पसरलेला आहे. दक्षिण बस्तरमध्ये अनेक ठिकाणी जमिनीची रचना अशी आहे की, पाणी खोलवर मुरण्याऐवजी वाहून जाते. याचा अर्थ असा की, येथे जलसंचयनाची प्रचंड क्षमता आहे. ‘सात आगर सात कोरी’ ही जुनी म्हण विनाकारण प्रचलित झालेली नाही; ती त्या जलसंस्कृतीची आठवण आहे, जिथे तलाव, आगर आणि सामुदायिक जलसाठे हे जीवनाचा अविभाज्य भाग होते. बारसूर आणि मोठे डोंगर ही स्थळे आजही या परंपरेची साक्ष देतात. जर आपण या दिशेने पुन्हा गांभीर्याने प्रयत्न केले, तर तलाव, सिंचन आणि मत्स्यपालन या तिन्हींच्या साहाय्याने, बस्तरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळू शकते.
शेतीच्या दृष्टीनेही बस्तरकडे नव्या नजरेतून पाहण्याची गरज आहे. येथे समस्या शेतीच्या अभावाची नसून तिच्या दिशेची आहे. कोदो, कुटकी, नाचणी (रागी) आणि इतर भरड धान्ये ही येथील खरी ताकद आहेत. हीच या माती आणि हवामानाशी सर्वाधिक सुसंगत पिके आहेत. आज संपूर्ण जग पुन्हा ‘मिलेट्स’ अर्थात श्रीधान्यांकडे वळत असताना, बस्तरकडे या क्षत्त्रात तयार संधी उपलब्ध आहे. मात्र, ही संधी केवळ उत्पादनापुरती मर्यादित ठेवून चालणार नाही. जोपर्यंत प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांची सांगड घातली जात नाही, तोपर्यंत शेतकर्यांना त्याचा पूर्ण लाभही मिळणार नाही.
बस्तर हा केवळ संसाधनांचा भूभाग नाही, तर कौशल्यांची एक समृद्ध संस्कृती आहे. येथे कोसा, बांबू शिल्प, धातुकाम, लाकूड व चामड्याचे पारंपरिक हस्तकौशल्य यांची परंपरा आहे. येथे हात केवळ श्रम करत नाहीत, तर सृजनही करतात. गरज या गोष्टीची आहे की, या कौशल्यांना केवळ ‘हुनर’ म्हणून मर्यादित न ठेवता, त्यांना उद्योग, डिझाईन, प्रशिक्षण आणि बाजारपेठेशी जोडले जावे. हाच तो मार्ग आहे, ज्यावर बस्तरचे भविष्य केवळ शेती किंवा जंगलावर अवलंबून न राहता, ग्रामीण सर्जनशील अर्थव्यवस्थेवरही भक्कमपणे उभे राहू शकते.
मग प्रश्न असा उभा राहतो की, इतया मोठ्या शयता असूनही आपण अजून पूर्ण वेगाने पुढे का जाऊ शकलो नाही? कदाचित याचे कारण असे की, आपण अनेकदा संसाधनांकडे पाहिले, पण लोकांच्या सहभागाला पुरेसे महत्त्व दिले नाही. आपण योजना आखल्या, पण प्रत्येक वेळी लोक त्याचे निर्मातेही बनतील, याची खात्री केली नाही. आपण पायाभूत रचना उभारल्या, पण त्यामध्ये स्थानिक समाजाचे स्वामित्व किती आहे हे नेहमी पाहिले नाही. आणि बस्तरमध्ये हाच फरक सर्वांत निर्णायक ठरतो.
बस्तरमध्ये काम करायचे असेल, तर बस्तरच्या पद्धतीनेच काम करावे लागेल. येथे बसावे लागेल, ऐकावे लागेल, समजून घ्यावे लागेल. येथे गावाला लाभार्थी म्हणून नव्हे, तर भागीदार म्हणून मान्यता द्यावी लागेल. ग्रामसभा, पारंपरिक संस्था, महिला गट, युवक, वनसमित्या आणि स्थानिक उत्पादक गट यांना विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. बस्तरमध्ये प्रशासनाची भूमिका तेव्हाच प्रभावी ठरेल, जेव्हा ते केवळ अंमलबजावणी करणारे यंत्र राहणार नाही, तर विश्वासाचे सेतू बनेल.
आता बस्तरसाठी फक्त ‘परिस्थिती सुधारत आहे,’ असे म्हणणे पुरेसे नाही. खरा प्रश्न असा आहे की, बस्तर आर्थिकदृष्ट्या सक्षम, सामाजिकदृष्ट्या आत्मविश्वासी आणि सांस्कृतिकदृष्ट्या सन्मानित अशा दिशेने वाटचाल करत आहे का? शाश्वत शांतता केवळ सुरक्षेमुळे येत नाही. ती तेव्हा येते, जेव्हा समाजाला वाटते की व्यवस्थेत त्याचा सहभाग आहे, निर्णयप्रक्रियेत त्याचा आवाज आहे आणि विकासात त्याचा सन्मान आहे. त्यामुळे बस्तरला आता केवळ शांतच नव्हे, तर सक्षम बनवणेही गरजेचे आहे.
बस्तर सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. तो पूर्णपणे अंधारातून बाहेर आलेला नाही, पण आता तो फक्त अंधाराची कहाणीही राहिलेला नाही. हाच तो काळ आहे, जेव्हा आपण अत्यंत सावधपणे ठरवले पाहिजे की, बस्तरचा पुढचा टप्पा कोणता असावा. आपल्याला केवळ काय उभारायचे आहे हेच पाहायचे नाही; तर ते कसे उभारायचे, कोणासोबत उभारायचे आणि कोणत्या अटींवर उभारायचे, हेही ठरवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
जर बस्तरची खरी ताकद एका वायात सांगायची झाली, तर ती अशी की, येथे विकासाची जमीन तयार आहे; फक्त तिला बस्तरच्या भाषेत वाचण्याची गरज आहे आणि बस्तरची भाषा काय, ती म्हणजे पाण्याची भाषा, जंगलाची भाषा, हाट-बाजाराची भाषा, कोसाची भाषा, बांबूची भाषा आणि सर्वांत महत्त्वाची म्हणजे समुदायाची भाषा!
तारण प्रकाश सिन्हा
(लेखक छत्तीसगढ राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.)
(अनुवाद : ओंकार मुळ्ये)