॥ सौंदर्यलहरी भाष्य ॥ (भाग-१८)

    02-Apr-2026
Total Views |
Beauty of Goddess Lalita
 
त्वदीयं सौन्दर्यं तुहिनगिरिकन्ये तुलयितुं
कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि-प्रभृतयः|
यदालोकौत्सुया-दमरललना यान्ति मनसा
तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिश-
सायुज्य-पदवीम्॥१२॥
 
मागील श्लोकात आपण श्रीचक्राचे स्वरूप साकल्याने जाणून घेतले आहे. आता श्रीचक्राची अधिष्ठात्री देवता भगवती जगदंबा, श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या अनुपम सौंदर्यावर भाष्य करणारा हा श्लोक आपण अभ्यासणार आहोत. हा श्लोक देवी भगवतीच्या अनुपमेय सौंदर्याचे आणि त्या सौंदर्याच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या देवांगनांच्या स्थितीचे वर्णन करतो. या श्लोकाचा अर्थ लावताना आचार्य म्हणतात, ‘त्वदीयं सौन्दर्यं तुहिनगिरिकन्ये तुलयितुम्...’ म्हणजे हे हिमालयपुत्री पार्वती! तुझे हे जे अलौकिक सौंदर्य आहे, त्याची तुलना करण्यासाठी किंवा त्याला उपमा देण्यासाठी ‘कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि-प्रभृतयः’ अर्थात ब्रह्मदेवासारखे (विरिञ्चि) श्रेष्ठ कवीदेखील, मोठ्या कष्टाने काहीतरी कल्पना करू पाहतात.
 
येथे ‘कथमपि’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असा की, ज्या ब्रह्मदेवाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, ज्याच्या मुखातून चार वेद प्रकट झाले आणि ज्याची पत्नी स्वतः सरस्वती (विद्येची अधिष्ठात्री) आहे, तो ब्रह्मदेवदेखील तुझे सौंदर्य शब्दांत मांडताना थबकतो. त्यालाही योग्य शब्द सूचत नाहीत. तो केवळ कल्पनेचा प्रयत्न करतो, पण तुझे सौंदर्य कल्पनेच्या पलीकडचे आहे. ‘तुहिनगिरिकन्ये’ या संबोधनातून देवीचे शीतल, शुभ्र आणि पवित्र रूप प्रकट होते; त्याचप्रमाणे ती हिमालयाची कन्या असल्याचेही अधोरेखित होते. तसेच देवीचे स्वरूप हे हिमालयासारखे अचल आणि उदात्त आहे, हे आचार्य ध्वनित करतात. देवीच्या सौंदर्याची तुलना करताना आपल्याला लौकिक जगातील उपमांचाच आधार घ्यावा लागतो; परंतु (जसे चंद्र, कमल इ.) या कोणत्याही उपमा, शब्दालंकार देवीच्या नखाच्या सौंदर्याचीही सर करू शकत नाहीत.
 
श्लोकाच्या उत्तरार्धात आचार्य एका अद्भुत दृश्याचे वर्णन करतात, ‘यदालोकौत्सुया-दमरललना यान्ति मनसा...’ तुझे हे सौंदर्य पाहण्याच्या उत्कंठेपोटी, स्वर्गातील अप्सरा किंवा देवस्त्रिया (अमरललना) आपल्या अंतःकरणात एक अनोखी ओढ अनुभवतात. ही ओढ इतकी तीव्र असते की, त्या केवळ मनानेच अशा एका पदाला प्राप्त होतात, जे पद मिळवणे अत्यंत कठीण आहे. ते पद म्हणजे ‘तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिश-सायुज्य-पदवीम्’. ‘गिरिश’ म्हणजे कैलासपती भगवान शंकर आणि ‘सायुज्य’ म्हणजे त्यांच्याशी पूर्णपणे एकरूप होणे. एखादा महान ऋषी हजारो वर्षे पंचाग्नी साधन किंवा कठोर तपश्चर्या करतो, तेव्हा कुठे त्याला भगवंताशी एकरूप होण्याची ‘सायुज्य मुक्ती’ मिळते. परंतु, या देवस्त्रियांना ती मुक्ती केवळ तुझे सौंदर्य पाहण्याच्या तीव्र इच्छेमुळेच सहज प्राप्त होते. तांत्रिकदृष्ट्या याचा अर्थ असा की, शिवाने देवीला अर्धांगिनी म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे जो शिवाशी एकरूप होतो; त्यालाच देवीच्या सौंदर्याचे दर्शन सर्व अंगांनी घेता येते. अशा प्रकारे, आचार्यांनी देवीच्या सौंदर्याला केवळ ‘देहाचा विषय’ न ठेवता, त्याला ‘मुक्तीचे साधन’ बनवले आहे. हे शब्दार्थ आपल्याला देवीच्या सौंदर्याची व्याप्ती आणि तिची ईश्वरी शक्ती यांच्यातील अद्वैत स्पष्ट करतात.
 
या श्लोकाचा भावार्थ आणि त्यातील लपलेला गूढार्थ उलगडताना, आपल्याला सौंदर्याची एक नवीन व्याख्या समजते. सामान्यतः सौंदर्य हे आसक्ती किंवा मोहाचे कारण असते; परंतु सौंदर्य लहरीमध्ये देवीचे सौंदर्य हे ज्ञानाचे आणि मोक्षाचे द्वार आहे. आचार्यांचा गुढ संकेत असा आहे की, ब्रह्मदेव जेव्हा देवीचे वर्णन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो एका मर्यादेत असतो; कारण तो सृष्टीचा रचयिता आहे आणि देवी ही सृष्टीचे मूळ कारण (आदिशक्ती) आहे. कार्य हे कधीच कारणाचे पूर्णतः वर्णन करू शकत नाही. सृष्टी ही मायेचा विलास आहे आणि मायापती शिवाची शक्ती ही अनिर्वचनीय आहे. त्यामुळेच, वेद ‘नेति-नेति’ (हे नाही, ते नाही) म्हणून जिथे शांत होतात, तिथून ललिता महात्रिपुरसुंदरीचे साम्राज्य सुरू होते. यातील पहिला गूढार्थ आहे की, परमतत्त्व हे तर्काच्या किंवा साहित्याच्या पलीकडचे आहे.
 
या श्लोकातील सर्वांत रहस्यमय भाग म्हणजे, अप्सरांना आणि देवललनांना मिळणारी ‘सायुज्य पदवी.’ येथे ‘सायुज्य’ शब्दाचा एक मानवी अर्थ आणि एक आध्यात्मिक अर्थ आहे. मानवी अर्थ असा की, या देवस्त्रियांना वाटते की, जर आपण भगवान शंकर झालो असतो, तर आपण देवीच्या या लावण्याला निरंतर जवळून पाहू शकलो असतो. ही केवळ असुया नसून ती सौंदर्याप्रति असलेली परमावधीची भक्ती आहे. आध्यात्मिक गूढार्थ असा आहे की, सौंदर्य हे स्वतःमध्ये इतके पूर्ण असते की, जेव्हा प्रेक्षक त्या सौंदर्यात पूर्णपणे तल्लीन होतो, तेव्हा प्रेक्षक (पाहणारा) आणि दृश्य (पाहिले जाणारे) यांच्यातील अंतर नष्ट होते. हीच अद्वैत स्थिती होय. देवस्त्रिया जेव्हा देवीचे सौंदर्य पाहतात, तेव्हा त्या स्वतःचे अस्तित्व विसरतात. स्वतःला विसरणे आणि केवळ त्या परमात्म तत्त्वात लीन होणे, हीच खरी समाधी आहे. ही समाधी ऋषींना कडक तपाने मिळते, पण सौंदर्याच्या उपासकाला ती ’प्रेमातून’ आणि ’भक्तीतून’ मिळते.
 
आणखी एक गूढ अर्थ शिव-शक्ती ऐक्याशी संबंधित आहे. शाक्त दर्शनानुसार, शिव हे केवळ ‘प्रकाश’ (चैतन्य) आहेत आणि शक्ती ही त्या प्रकाशाचा ‘विमर्श’ (आरसा किंवा अभिव्यक्ती) आहे. शिवाला स्वतःच्या सौंदर्याचे ज्ञान हे शक्तीच्या माध्यमातूनच होते. म्हणूनच, जो शिवाशी एकरूप होतो, त्यालाच त्या विश्वात्मक सौंदर्याची अनुभूती येते. आचार्य येथे सूचवत आहेत की, देवीचे रूप हे केवळ डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नसून ती ‘अनुभवण्याची’ गोष्ट आहे. जेव्हा भक्ती पराकोटीला पोहोचते, तेव्हा साधकाच्या मनात विश्वातील इतर सर्व विषय संपतात आणि केवळ भगवतीचे रूप उरते. अशी एकाग्रता साधकाला नकळतपणे शिवाच्या पदापर्यंत घेऊन जाते. थोडक्यात, हे स्तोत्र केवळ सौंदर्याचे गुणगान नाही, तर सौंदर्याच्या माध्यमातून जीवात्मा आणि परमात्मा यांचे मिलन घडवून आणणारे एक साधन आहे. देवीच्या लावण्याचे हे ध्यान साधकाला सहजपणे भवसागराच्या पार नेते, हाच या १२व्या श्लोकाचा परम गूढार्थ आहे.
 
सामान्य साधकांसाठी या श्लोकाचा अर्थ अधिक गहन आहे. सौंदर्यासक्त होणे, ही गोष्ट तुमच्या आत्मोन्नतीचा मार्ग प्रशस्त करू शकते. देवीच्या परम सौंदर्याचे वर्णन श्री ललिता सहस्रनामात विस्तृत स्वरुपात आले आहे. स्त्री सौंदर्याचा मूर्तिमंत मापदंड म्हणजे श्री ललिता देवी आहे. मग तिच्या स्वरूपाची साधना करणार्‍या स्त्रीच्या मनात तिच्याबद्दल असुया निर्माण होऊ शकते. परंतु ईश्वरी तत्त्वाची साधना करताना तुम्ही त्या तत्त्वात इतके एकरूप होऊन जाता की, तुम्ही स्वतः जणू ईश्वराच्या स्वरूपाचे प्रतिबिंब होता. त्यामुळे भागवतीची साधना करणार्‍या स्त्रिया या कायम अत्यंत तेजस्वी, मोहक आणि दैवी भासतात. त्यांची आत्मोन्नती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होऊन गेलेली असते. अशा स्त्रीकडे कोणत्याही सामान्य पुरुषाने पाहिले, तर त्याचे विकार जागृत न होता, त्याच्या मनात तिच्या स्वरूपाबद्दल आदर निर्माण होतो. भगवतीची आराधना केल्याने, स्त्रियांना आत्मिक सामर्थ्य आणि दैवी सौंदर्य प्राप्त होते.
 
सामान्यतः पुरुष हा स्खलनशील असतो. सुंदर स्त्री पाहिल्यावर त्याच्या मनात तिच्या सौंदर्याचा उपभोग घेण्याची लालसा निर्माण होते. परंतु, भगवतीची साधना करणारा जेव्हा तिच्या सुंदर स्वरूपाचे विवेचन वाचतो, त्यावेळी त्याच्या मनात विकार उत्पन्न होत नाहीत, तर तो या सौंदर्याचे वर्णन वाचून सौंदर्यासक्त होतो; त्याच्या वृत्तीत बदल घडतो. इतकेच नाही, तर देवीच्या सौंदर्याचे हे अनुपम वर्णन पुरुष साधकाला अधिक सघन आणि प्रदीर्घ ध्यान करण्यास प्रेरित करते. या श्लोकामध्ये जरी देवकन्या किंवा अप्सरांनी ध्यानमग्न होऊन सायुज्य मुक्ती साधली असा उल्लेख असला, तरी तो पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारच्या साधकांना लागू आहे. देवीच्या सौंदर्याचे चिंतन, मनन हे आत्मोन्नतीचे साधन असून प्रत्येक जीवाचे ध्येय असणारा मोक्ष हेच या साधनेचे अंतिम गन्तव्य आहे, यावर हा श्लोक शिक्कामोर्तब करत आहे.

- सुजीत भोगले