सारसबाग की शाहीनबाग?

    02-Apr-2026
Total Views |
Sarasbaug Controversy
 
पेशवाईच्या काळात पुणे ही हिंदवी स्वराज्याची राजधानी होती. पेशव्यांनी पुण्यात अनेक वास्तू उभारल्या वा विकसित केल्या. त्यात सारसबाग व त्यातील तळ्यातील गणपती मंदिराचा समावेश होतो. त्या बागेतील मोकळ्या जागेत नमाज पठणासाठी हजारो मुस्लिमांना परवानगी देणे, हा हिंदूंच्या भावनांचा सरळसरळ अपमानच! याबाबत महापालिका प्रशासन हतबल असेल, तर मग शनिवारवाड्यातही नमाज पढण्यास अनुमती द्यावी!
 
नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पुण्यात मुस्लिमांची दादागिरी व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करण्याची हिंमत दिसून आली. गेल्या रविवारी ‘बासी ईद’ साजरी करण्यात आली. ती साजरी करण्यासाठी सारसबागेत हजारो मुस्लीम जमले, तेव्हा काही हिंदू संघटनांनी त्यास आक्षेप घेतला. पोलिसांनी तेव्हा हिंदूंना सारसबागेतील गणपती मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यामुळे वाद निर्माण झाला. सुदैवाने हिंसाचार झाला नसला, तरी सारसबागेत मुस्लिमांना धार्मिक सण साजरा करण्यापासून रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले, हे उघड आहे. सारसबागेसारख्या निखळ हिंदू स्थळावरील मुस्लिमांचा जमाव पाहून ही सारसबाग आहे की शाहीनबाग, असाच प्रश्न कोणालाही पडला असेल.
 
पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानतात. ते विद्येचे माहेरघरही आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य अनेक वर्षे पुण्यात होते. त्यांचा लालमहाल ही तर ऐतिहासिक वास्तू. पुढे पेशवाईच्या काळात तर पुणे हीच मराठी सत्तेची राजधानी होती. पेशव्यांनी पुण्यात आपले सत्ताकेंद्र स्थापन केले आणि त्या शहराचा बराच विकास केला. पर्वती, तुळशीबाग, विविध पेठा, सारसबाग यांसारख्या वास्तू वसविल्या. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाड्यासारखी वास्तू तेथे उभी केली. पर्वती या टेकडीचा विकास केला (आज पर्वतीला झोपड्यांचा गराडा पडला आहे आणि त्यात कोण राहतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही). नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीच्या पायथ्याशी सारसबाग बांधली आणि तेथील तळ्यात स्वयंभू गणपतीचे मंदिर उभे केले. पुण्यालगतच्या अष्टविनायक मंदिरांचाही जीर्णोद्धार केला. त्यात थेऊरच्या चिंतामणी मंदिराचा प्रामुख्याने समावेश होतो. तेथेच थोरल्या माधवराव पेशव्यांचा मृत्यूही झाला.
 
सारसबागेत एकट्यादुकट्या मुस्लिमाकडून संध्याकाळच्या वेळी नमाज पढण्याचे दृश्य हे नेहमीचे झाले आहे. पण, सारसबागेत नुकत्याच झालेल्या घटनेमुळे आता या समाजाची भीड चेपली आहे, असे दिसते. पुण्याभोवतालच्या अनेक गावांमध्ये मुस्लिमांची वस्ती वाढत चालली आहे. कोंढवा हे त्याचे ठळक उदाहरण. काही वर्षांपूर्वी तेथून काही दहशतवादी मुस्लिमांना शस्त्रास्त्रांसह अटकही करण्यात आली होती. राज्यातील सर्व प्रमुख शहरांच्या प्रवेशद्वारांजवळ मुस्लिमांनी आपल्या वस्त्या उभ्या केल्या आहेत. पुण्यातील कोंढवा असो की, मुंबईतील मानखुर्द-गोवंडी-कुर्ला किंवा मुंब्रा-कळवा असो, तेथे मुस्लीम लोकसंख्या पद्धतशीरपणे वाढविली जात आहे. ही काही नैसर्गिक वाढ नाही. ते ठरवून झालेले अतिक्रमण आहे. रेल्वेमार्गांलगत मुस्लिमांच्या झोपड्या उभ्या राहतात, त्या उगाच नव्हे. अलीकडेच उत्तराखंडमधील हलद्वनी रेल्वेमार्गाला लागून असलेल्या शेकडो एकर जागेवरील अतिक्रमण उठविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गतवर्षीच अहमदाबादमधील चांदोला तलावाभोवतीची शेकडो एकर जमीनही अशीच बांगलादेशींच्या वस्त्यांपासून मुक्त करण्यात आली आहे. केदारनाथ, अमरनाथ येथे हिंदू यात्रेकरूंना पाठीवर घेऊन जाण्याची कामे किंवा घोडे भाड्याने देण्याच्या व्यवसायावर मुस्लिमांनीच कब्जा केला आहे. या गोष्टी एकेकट्या पाहिल्यास त्याचे महत्त्व जाणवणार नाही; पण त्याकडे व्यापक सामरिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्याचे महत्त्व जाणवते. पश्चिम बंगालमधील ‘चिकन नेक’चे उदाहरण तर प्रसिद्धच आहे. पण, हिंदू समाज अर्थातच आत्ममग्नतेच्या ग्लानीत असल्याने त्याला याचे महत्त्वच कळलेले नाही.
 
पुणेच नव्हे, तर आता राज्यातील अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांजवळ मुस्लीम वस्त्या, प्रामुख्याने मजारी उभ्या राहताना दिसतात. तसेच अनेक सार्वजनिक स्थळांवर या समाजाची गर्दी दिसते. मुंबई असो की, अन्य शहरे; त्यातील सार्वजनिक उद्याने, सागरकिनारे वा अशाच सार्वजनिक ठिकाणी सुटीच्या दिवशी मुस्लीम समाजाची गर्दी होताना दिसते. गिरगाव चौपाटी असो की, मरीन ड्राईव्ह तेथे सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने मुस्लीम फिरताना दिसतात. कायद्याने त्यांना त्यापासून रोखता येत नाही, हे खरे. पण, आपल्या मोठ्या कुटुंबकबिल्यासह फिरणार्‍या मुस्लिमांची ही दृश्ये हिंदूंच्या मनात एकप्रकारचे दडपण निर्माण करतात आणि या स्थळी आधीच अल्पसंख्येत फिरणारे हिंदू अशा सार्वजनिक ठिकाणी जाणेच मग सोडून देतात.
 
महाराष्ट्रातील शिवकालीन गड-किल्ले हा मराठ्यांच्या, म्हणजेच शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या सत्तेचा गौरवशाली वारसा आहे. पण, या गड-किल्ल्यांकडे पूर्वीच्या राज्य सरकारांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे त्यावर बेकायदा बांधकामांचे पीक उगवले आहे. ही बेकायदा बांधकामे प्रामुख्याने मशिदी, मजारी आणि दर्गे यांची आहेत. त्यांच्या जोडीला मुस्लिमांच्या वस्त्याही आहेत. राज्यातील कोणताही किल्ला या अतिक्रमणांपासून अलिप्त राहिलेला नाही. विशाळगड, पन्हाळा, प्रतापगड यांसारख्या अनेक प्रमुख गडांवर मशिदी आणि दर्गे उभे राहिले. विशाळगडावर तर एक अख्खे मुस्लीम गावच उभे राहिले आहे. शिवछत्रपतींच्या गडांवर मशिदी आणि मजारी कशा उभ्या राहू शकतात? प्रतापगडावर अफझलखानाच्या कबरीला लागून बरेच बेकायदा बांधकाम मुस्लिमांनी केले होते. त्यात मशिदी आणि दर्गे यांचा समावेश होता.
 
सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे सारे बेकायदा बांधकाम पाडून टाकले. पण, अन्य किल्ल्यांचे काय? आता तर ऐन पुण्यातील सारसबागेसारख्या जागेवर मुस्लीम नमाज पठण करू लागले आहेत. लगतच्या पर्वतीवरही त्यांचा चंचुप्रवेश झाला आहे. राज्यात आणि पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना हे घडत असेल, तर लोकांनी कुठे दाद मागायची? पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात आवाज उठविला असला, तरी ही जबाबदारी प्रामुख्याने राज्य सरकारची आणि स्थानिक आमदारांची आहे. हिंदूंमध्ये आपल्या अधिकारांबाबत जागृती होत असली, तरी हे अधिकार टिकवून धरण्यासाठी त्यांना प्रसंगी आक्रमक धोरण स्वीकारण्याची गरज आहे, अन्यथा, सारसबागेचे रूपांतर शाहीनबागेत कधी होईल, ते कळणारही नाही!
 
- राहुल बोरगांवकर