मुंबई : (Raghav Chadha)राज्यसभा खासदार आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांना मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाने त्यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी खासदार अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. राघव चड्ढा यांना सभागृहात पक्षाच्या वतीने बोलण्याची संधी देऊ नये, असे पत्र पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पाठवले आहे. (Raghav Chadha)
राघव २०२२ पासून पंजाबमधून राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत आहे. पक्षाने या निर्णयाचे कारण सांगितले नाही. राघव हे 'आम आदमी पक्षा'च्या (AAP) स्थापनेपासूनच या पक्षाशी जोडलेले आहेत. २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत 'दिल्ली लोकपाल विधेयका'वर काम करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, त्यांनी बऱ्याच काळापासून पक्षापासून अंतर ठेवले होते आणि 'आप'बद्दल कोणतेही विधान करत नव्हते. (Raghav Chadha)
आम आदमी पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना राज्यसभेत बोलण्यापासून मज्जाव करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यात 'आप'ने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून चड्ढा यांना वगळले होते. अलीकडे राघव चड्ढा यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींवर मौन बाळगले होते. तसेच २०२५ साली दिल्ली निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर चड्ढा यांनी स्वतःला आपच्या धोरणांपासून दूर ठेवले होते. पक्षाचे विषय मांडण्याऐवजी त्यांनी समाजातील इतर वर्गाच्या विषयांना प्राधान्य दिले होते. (Raghav Chadha)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\