गीतासार (भाग ८)

    02-Apr-2026
Total Views |
bhagwat gita
 
कुंती कोण, याची आम्हाला कल्पना आली आहे. आता तिची सवत माद्री कोण, ते पाहू. ‘द्र’ म्हणजे द्रवणे, मनाची तयारी करणे होय. ‘द्र’पासून ‘द्रव’ शब्द उत्पन्न झाला. याच ‘द्र’पासून ‘अद्र’-‘अद्री’ शब्द झाला. ‘अद्री’ म्हणजे द्रवत नाही, असा स्थिर पर्वत. हाच ‘अद्री’ शब्द युरोपात अ‍ॅण्ड्रिज नावाने गेला असून, अमेरिकेतील पर्वतरांगांना अ‍ॅण्ड्रिज असे म्हटले आहे. ‘मा + अद्री’पासून ‘माद्री’ हा शब्द तयार झाला. ‘मा’ म्हणजे नाही आणि ‘अद्री’ म्हणजे मनाची स्थिरता. म्हणजे जे मन साधनेकरिता मृदु म्हणजे सदोदित तयार असते, अशा साधकाच्या मनोवृत्तीलाच व्यास ‘माद्री’ असे नाव ठेवून, तिला पंडुची दुसरी पत्नी दाखवितात. म्हणून पंडुची शरीरभोगाची म्हणजे वृत्तीभोगाची इच्छा होताच, माद्री तयार झाली आणि माद्रीच्या त्या वृत्ती समागमातच पंडुचा अंत झाला, असे दाखविले आहे. अंत म्हणजे पूर्णत्वात विलीन होणे होय. द्रवित अंतःकरणाची माद्री पंडुसोबत समागमाला तयार झाली आणि पंडुच्या शवाबरोबर ती साध्वीही सती गेली. पूर्णासह पूर्ण पूर्णत्व पावले. उपनिषदे म्हणतात -
 
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते|
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः|
 
ऋषी दुर्वासांपासून मंत्रप्राप्ती झाल्यानंतर कच्च्या व अधीर कुंतीरूप साधकाच्या बुद्धीने, तिचे कोण्या पुरुषाशी लग्न होण्याअगोदर मिळालेल्या मंत्राचे सामर्थ्य पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुंती कुमारी होती. ज्या स्त्रीशरीराची वाढ अद्याप पुत्रधारणेकरिता व्हायची आहे, अशा अपूर्ण स्त्रीशरीराला व्यास ‘कुमारी’ असे संबोधतात. ‘कु’ म्हणजे वाईट अपरिपक्व आणि ‘मारी’ म्हणजे अवस्था होय. ‘मा’ म्हणजे नाही आणि ‘अर्’ म्हणजे पुढे सरकणारी प्रगतिशील अवस्था होय. याच ‘अर’ शब्दापासून अर्जुन आणि ‘आर्य’ शब्द उत्पन्न झाला आहे. कुंती कुमारी असताना म्हणजे साधकाची बुद्धी पूर्ण सत्य जाणण्याकरिता अपरिपक्व असतानाच, कुंतीबुद्धीने दुर्वासांनी दिलेल्या मंत्राचा प्रयोग करण्याचे ठरविले. तिने ज्ञानरूप सूर्याचे आवाहन करून, पुत्रप्राप्ती म्हणजे ज्ञानप्राप्तीचा दुर्वास मंत्र उच्चारला आणि तिला कर्ण पुत्र झाला.
 
कर्णोत्पत्ती
 
सूर्य प्रकाश देतो. प्रकाशाला ज्ञानप्रकाश म्हणतात, म्हणजे सूर्य ज्ञानकेंद्र ज्ञानपिता मानला आहे. कर्णजन्मावेळी कुमारी कुंतीने सूर्याचे स्मरण करून, म्हणजे ज्ञानाची अभिलाषा धरून मंत्र उच्चारला आणि तत्काळ कुमारी अवस्थेत असलेल्या म्हणजे साधकाच्या अपरिपक्व असलेल्या कुंतीला पुत्रधारणा झाली. साधकाच्या अपरिपक्व बुद्धीला सूर्यापासून म्हणजे पूर्ण ज्ञानावस्थेपासून ज्ञानाची गर्भधारणा झाली. जन्मल्याबरोबर पुत्राचे नाव ‘कर्ण’ असे ठेवले. ‘कर्ण’ म्हणजे कान. त्या काळात पुस्तके छापण्याची कला आजसारखी अवगत नव्हती. एखाद्या विद्वानाने ताडपत्रीवर ग्रंथ लिहावा आणि त्याचे प्रवचन त्याने श्रोत्यांसमोर करावे, असा त्यावेळी ज्ञानप्रसाराचा परिपाठ होता. श्रोत्यांपैकी सामान्य बुद्धीचे बरेच श्रोते आपण ते ज्ञान ऐकले की, केवळ श्रवण करूनच आपणास ग्रंथातील सर्व ज्ञान झाले, असे खोटेच मानीत असत आणि आजही मानतात. परंतु, अशांना उपनिषदे स्पष्ट सांगतात,
 
नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया बहुना श्रुतेन|
यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनूऽस्वाम्॥
 
म्हणजे आत्मज्ञान केवळ प्रवचने देऊन किंवा ऐकून अथवा केवळ बुद्धीचा तर्कविलास दाखवून मिळत नसते; तर त्याकरिता साधकाला कठोर आत्मसाधना व चिंतन करावे लागते. मगच आत्मज्ञान होत असते. कर्ण सर्व पांडवांमध्ये अर्जुनाचा विशेष द्वेष आणि विरोध करीत असे. कारण अर्जुन खरे ब्रह्मज्ञान प्राप्त करणारा साधक होता आणि कर्ण केवळ कानाने ऐकलेली माहिती म्हणजेच पूर्ण ज्ञान, असे मानणार्‍यांपैकी होता. शब्दपांडित्य करणारे दिखाऊ लोक अशा प्रकारे खर्‍या ज्ञानी पुरुषांचा द्वेष आणि विरोध करतात. असे दिखाऊ ज्ञानी असे मानतात की, त्यांच्या आत्मज्ञानाचे शरसंधान केवळ वादविवाद आणि तर्क-वितर्कापर्यंतच मर्यादित आहे. सभांमध्ये आपले तार्किक शब्द-अवडंबर दाखवून स्वतःला खर्‍या ज्ञानी माणसाहून श्रेष्ठ दाखवितात; कारण अशा प्रकारे शब्दजाळ पसरविणार्‍या ढोंग्यांनाच सामान्य जनता खरे ज्ञानी मानते. विद्वानांच्या सभेत असे दिखाऊ पंडित विजय मिळवितात; म्हणून महाभारतामध्ये असे दाखविले आहे की, कित्येक वेळा कर्णासमोर अर्जुनाला समोरासमोर युद्ध करणे कठीण जात असे.
 
ज्ञानाची प्राप्ती करू इच्छिणारी कुंती त्यावेळेस कुमारी म्हणजे अपरिपक्व साधनाबुद्धीची होती. तिला वाटले की, ज्ञानाची प्राप्ती केवळ कर्णाने म्हणजे कानाने श्रवण करूनच करता येते. त्या अपूर्ण कल्पनेने तिने ज्ञानाचे म्हणजे सूर्याचे ध्यान केले आणि तिला केवळ श्रवणातच ज्ञान आहे, अशी मानणारी वृत्तीरूप कर्णाची पुत्रप्राप्ती झाली. कुमारी अवस्थेत पुत्रप्राप्ती होणे, समाजाच्या दृष्टीने पाप असल्यामुळे तसल्या अपुर्‍या खोट्या ज्ञानरूप पुत्राचा जन्म झाल्याबरोबरच कुंतीने त्याचा परत गंगेत, म्हणजे ज्ञानगंगेत त्याग केला. खर्‍या कुंतीरूप साधकाला तिचे अज्ञान कळले होते की, केवळ कर्ण श्रवणानेच ज्ञान होत नसते आणि म्हणून कुंतीने कर्णरूप अज्ञानाचे पुनर्ज्ञानप्राप्तीकरिता ज्ञानगंगेत समर्पण केले.
 
कुंतीद्वारे कर्णाचे गंगेतील समर्पण असे आहे. हा कर्ण म्हणजे केवळ श्रवणानेच ज्ञानप्राप्ती होते, अशी साधकातील अज्ञानवृत्ती त्या ज्ञानगंगेत वाहत जाते. त्या कथित ज्ञानगंगेच्या काठी राहून त्यातील मत्स्य म्हणजे ज्ञानरूप खाद्य धरणार्‍या अधिरथ नामक सूताने त्या वाहात असलेल्या सुकुमार, वरून गोंडस दिसणार्‍या कर्णरूपी बालकाचा ज्ञानपुत्र म्हणून स्वीकार केला आणि त्याला स्वतःचा पुत्र मानून त्याचा योग्य सांभाळ केला. ‘राधा’ म्हणजे आनंद. साधकातील असली केवळ श्रवणातच ज्ञान मानणारी अज्ञानी वृत्ती होय. बरेच साधक केवळ श्रवणातच आध्यात्मिक आनंद मानतात. असल्या अज्ञानी साधकांना व्यास सूतपत्नी ‘राधा’ म्हणतात. ‘सू’ म्हणजे प्रवेश करणे आणि ‘सूत’ म्हणजे ज्ञानात प्रवेश करणारी साधकाची वृत्ती. असल्या वृत्तीरूप राधेला प्रत्यक्ष पुत्र म्हणजे ज्ञानाचा आनंद न झाल्यामुळे त्या वृत्तीच्या पतीने म्हणजे अधिरथ नामक सूताने कथित ज्ञानगंगेत वाहात येणार्‍या कर्णरूप गोंडस बालकाला गंगेतून काढून, आपल्या वृत्तीरूप पत्नी राधेला त्याचा सांभाळ करण्यास दिले. केवळ श्रवणातच ज्ञान मानून त्यात आनंद मानणार्‍या राधेला ज्ञानसंतती नसल्याने तिने कर्णालाच आपला पुत्र मानून त्याचा सांभाळ केला. अधिरथाचाही व्यास-अर्थ भिन्न आहे. ‘अधि’ म्हणजे स्वाधीन आणि रथ म्हणजे जीवनाचा रथ. ज्याला आपल्या जीवनात ज्ञानप्राप्ती करण्याकरिता सूत म्हणजे साधना करून पुढे जावयाचे आहे, अशा साधकातील वृत्तीस्थैर्याला व्यास ‘सूत अधिरथ’ असे म्हणतात.
 
- योगिराज हरकरे