मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीसाठी जान्हवी कपूरचा खास उपक्रम
02-Apr-2026
Total Views |
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने मानसिक आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मद्यपानाच्या व्यसनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अमाहा (Amaha) या संस्थेसोबत हातमिळवणी करत तिने ‘Off the Rocks’ या जनजागृती मोहिमेची सुरुवात केली आहे. अलीकडेच जान्हवी कपूरने समाजात वाढत चाललेल्या मद्यपानाच्या सवयीवर भाष्य करत सांगितले की, आजच्या सोशल सर्कलमध्ये दारू पिणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, याचे गंभीर परिणाम किती घातक ठरू शकतात, याकडे फारच कमी लोक लक्ष देतात. अनेकदा लोकांना हे कळतच नाही की ही सवय कधी व्यसनात बदलते. प्रत्यक्षात मद्याचे व्यसन ही एक वैद्यकीय स्थिती असून त्याचा परिणाम मेंदू, वर्तन आणि भावनांवर होत असतो.
भारतात मोठ्या प्रमाणावर लोक या समस्येला सामोरे जात असले तरी, याकडे अजूनही योग्य दृष्टीने पाहिले जात नाही. अनेक वेळा ही समस्या दुर्लक्षित केली जाते किंवा केवळ इच्छाशक्तीचा अभाव म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे योग्य वेळी योग्य मदत मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर ‘Off the Rocks’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश लोकांना हे समजावून सांगणे आहे की मद्यपानाचे व्यसन ही एक गंभीर पण उपचारयोग्य मानसिक आरोग्य समस्या आहे आणि त्यासाठी मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे.
याबाबत बोलताना जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) म्हणाली, “दारूबाबतची चर्चा अनेकदा होतच नाही किंवा झाली तरी ती जजमेंटल पद्धतीने होते. त्यामुळे ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही. ‘Off the Rocks’ चा उद्देश ही समस्या गंभीर आहे आणि तिच्यावर उपचार शक्य आहेत, हे लोकांना समजावणे आहे.” या उपक्रमाला बळ देण्यासाठी Amaha सोबत भागीदारी करण्यात आली आहे. ही एक नामांकित मानसिक आरोग्य संस्था असून ती क्लिनिकल आणि विश्वासार्ह उपचार सेवा पुरवते.
या संदर्भात Amaha चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित मलिक म्हणाले, “व्यसन कोणतेही असो, ते एक गंभीर मानसिक आरोग्य स्थिती आहे. मात्र, दुर्दैवाने त्याकडे अनेकदा चुकीच्या पद्धतीने पाहिले जाते. ‘Off the Rocks’ सारख्या उपक्रमांमुळे जागरूकता वाढेल आणि लोकांना योग्य मदत मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”
Amaha चा हा उपक्रम दीर्घकालीन स्वरूपाचा असून, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, लोकांचे अनुभव आणि सोप्या माहितीच्या माध्यमातून मद्यपानाच्या व्यसनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील गैरसमज दूर करणे, लाज आणि भीती कमी करणे आणि लोकांना योग्य उपचारांपर्यंत सहज पोहोच उपलब्ध करून देणे.
Amaha मार्फत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये थेरपी, मानसोपचार आणि सेल्फ-केअर टूल्सचा समावेश आहे. २०० हून अधिक तज्ज्ञांची टीम, मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू येथील केंद्रे तसेच ६०० हून अधिक शहरांपर्यंत पोहोच यामुळे Amaha ने मानसिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. २०२५ मध्ये बेंगळुरूमध्ये विशेष मानसिक आरोग्य रुग्णालय सुरू करून त्यांनी गंभीर समस्यांसाठीही उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.