‘सर्वश्रेष्ठ भक्त’ अशी ज्यांची ख्याती आहे, अशा मारुतीरायांची आज जयंती. वास्तविकपणे बघता शक्ती आणि बुद्धी यांचे प्रमाण व्यस्तच असते, असे म्हणतात. मारुतीरायांचे चरित्र याला अपवाद असेच. मारुतीरायांच्या ठायी असलेले बल तर अद्वितीय आहेच, शिवाय ते ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ देखील आहेत. त्यांच्यातील विविध गुणांची सध्याच्या काळात मानवाला समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आवश्यकता असून, त्यांच्यातील गुणांचा आज असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा...
बुद्धिर्बलं यशो धैर्यं निर्भयत्वं अरोगता|
अजाड्यं वापटुत्वं च हनुमत्स्मरणाद्भवेत्॥|
भारतीय संस्कृतीत हनुमंताच्या उपासनेचे फळ सांगताना, या अत्यंत अर्थपूर्ण श्लोकाचा आधार घेतला जातो. हनुमंताच्या स्मरणाने मनुष्याला बुद्धी, बळ, यश, धैर्य, निर्भयता, निरोगीपणा, उत्साह आणि वक्तृत्व कौशल्य प्राप्त होते. या श्लोकात ‘बळ’ या शब्दाच्या आधी ‘बुद्धी’ हा शब्द जाणीवपूर्वक आला आहे. कारण बुद्धीविना आणि विवेकाविना असलेले बळ हे विनाशाकडेच नेते, तर बळाविना असलेली बुद्धी निष्क्रिय ठरते. विद्वत्ता कृतीत उतरण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जेला विधायक वळण देण्यासाठी प्रगल्भ बुद्धीची.
चैत्र पौर्णिमेच्या मंगल दिनी माता अंजनीच्या पोटी जन्मलेला ‘अंजनीसुत’ म्हणजेच, साक्षात रुद्राचा अवतार असलेली एक महाशक्ती होती. उगवत्या सूर्याला एखादे लालभडक गोड फळ समजून, ते गिळण्यासाठी आकाशात झेप घेणार्या या बालकाची अमर्याद ऊर्जा, ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर आणि प्रभू श्रीरामांच्या संपर्कात आल्यावर कशी विवेकी व प्रगल्भ होते याचाच प्रवास म्हणजे हनुमंताचे जीवन. म्हणूनच, हनुमान जयंतीचा उत्सव केवळ बाह्य उपचारांपुरता किंवा पौराणिक कथांच्या स्मरणापुरता मर्यादित न राहता, त्यामागील बुद्धी आणि शक्तीच्या मुळाचा वेध घेणारी ती एक सखोल वैचारिक यात्रा ठरायला हवी. या शोधात जेव्हा आपण रामायणाची पाने उलटतो, तेव्हा तिथे या ‘बुद्धी आणि बळाच्या’ परिपक्व संगमाचे एक अत्यंत विलोभनीय उदाहरण समोर येते. ते म्हणजे ‘अहिरावण वध’ आणि त्यासाठी हनुमंताने धारण केलेले ‘पंचमुखी’ रूप. लंकेच्या युद्धकाळात रावणाला आपला पराभव समीप असल्याची जाणीव होऊ लागली, तेव्हा त्याने पाताळलोकातील मायावी राक्षस ‘अहिरावण’ याची मदत मागितली.
अहिरावणाने अत्यंत कपटाने विभीषणाचे रूप धारण करून, रामाच्या छावणीत प्रवेश केला आणि प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांचे अपहरण करून त्यांना पाताळलोकात नेले. देवीसमोर त्यांचा नरबळी देण्याचा त्याचा क्रूर उद्देश होता. ही भीषण घटना कळताच हनुमंत तत्काळ पाताळलोकात पोहोचले. तिथे केवळ आंधळेपणाने आणि रागाने युद्ध करण्याऐवजी, हनुमंतांनी आपल्या सूक्ष्म बुद्धीचा वापर केला. आपल्या चातुर्याने त्यांनी शोधून काढले की, अहिरावणाचा वध करण्यासाठी पाच वेगवेगळ्या दिशांना प्रज्वलित केलेले पाच दिवे एकाच वेळी विझवणे आवश्यक आहे. शत्रूचे रहस्य उलगडणे आणि अचूक उपायाचा शोध घेणे, हा त्यांच्या प्रगल्भ बुद्धीचाच भाग होता. पण, हे पाच दिवे एकाचवेळी विझवण्याचे अशक्यप्राय आव्हान कसे पेलायचे? यावर योजलेल्या उपायातच इथेच त्यांच्या अफाट शक्तीचे दर्शन घडते.
यासाठी हनुमंतांनी आपले विराट आणि अलौकिक ‘पंचमुखी’ (वानर, सिंह, गरुड, वराह आणि अश्व) रूप धारण केले आणि आपल्या एकाच फुंकरीने, पाचही दिशांचे दिवे एकाचवेळी विझवून अहिरावणाचा वध केला. त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांची सुटका करून, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा रणांगणात आणले. संकटाचे मूळ शोधण्यासाठी लागणारी अचूक बुद्धी आणि ते समूळ नष्ट करण्यासाठी लागणारे अफाट बळ यांचा हा असाधारण आणि तार्किक समन्वय केवळ हनुमंतांकडेच दिसतो.
आजच्या या अत्यंत गतिमान आणि अस्वस्थ काळात, हनुमंताचे हे चरित्र खर्या अर्थाने आपला ‘दीपस्तंभ’ आहे. तरुणाईची अफाट ऊर्जा आणि तंत्रज्ञानाची गती हे आजचे मोठेच बळ आहे. पण केवळ सुसाट वेग असून चालत नाही; त्याला विवेकाचे आणि योग्य दिशेचे सुकाणू लागतेच!
संकटाचे स्वरूप ओळखून कधी माशीसारखे सूक्ष्म होऊन परिस्थिती हाताळणे, तर कधी पर्वतासारखे विशाल होऊन प्रहार करणे ही लवचिकता आजच्या काळात यशाची खरी संजीवनी ठरते. लंका जाळूनही किंवा द्रोणागिरी उचलूनही ज्याला स्वतःच्या कर्तृत्वाचा साधा अहंकारही शिवला नाही, तो मारुतीराया आजच्या आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचा सर्वांत मोठा आणि खरा महामेरू आहे! याच बुद्धी आणि बळाच्या समन्वयाचा विचार करून, समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात गावोगावी मारुतीरायाची स्थापना केली होती. तत्कालीन समाजात बलोपासनेचा आणि कर्तृत्वाचा जागर करणारी समर्थांची ही दृष्टी, आज पुन्हा अंगीकारण्याची वेळ आली आहे. कारण, हनुमंताचे सामर्थ्य आणि समर्थांचा हाच विचार आजच्या पिढीला अस्वस्थतेतून बाहेर काढणारा खरा मार्ग आहे.
पण, एवढी अफाट शक्ती, हा प्रगल्भ विवेक आणि हा अढळ संयम हनुमंताकडे येतो कुठून, याचे उत्तर त्यांच्या अखंड रामनाम जपात दडलेले आहे. हनुमंतासाठी ‘राम’ हे केवळ दोन अक्षरी नाव किंवा कोरडा उच्चार नसून, ती एक अशी संजीवनी ऊर्जा आहे, जी त्यांना स्वतःच्या मर्यादित अस्तित्वाच्या पलीकडे घेऊन जाते. जेव्हा एखादा साधक आपली बुद्धी, मन आणि प्राण अशा एखाद्या परमतत्त्वात पूर्णपणे विलीन करतो, तेव्हा त्याच्यातील सुप्त ऊर्जा आपोआपच अमर्याद, पण विधायक रूप धारण करते. ‘मी’पणाचा किंवा अहंकाराचा लवलेशही न ठेवता, स्वतःला एका व्यापक आणि निस्वार्थी उद्दिष्टाला वाहून घेण्याची हीच अजोड समर्पण वृत्ती हनुमंताला एका वेगळ्याच आध्यात्मिक आणि वैचारिक उंचीवर नेऊन ठेवते.
याच अलौकिक ऊर्जेचा आणि ध्येयासक्तीचा प्रत्यय आपल्याला गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’मध्ये येतो. सीताशोधार्थ समुद्र ओलांडताना, वाटेत विश्रांतीची विनंती करणार्या मैनाक पर्वताला नम्रपणे नकार देत हनुमंत म्हणतात, "रामकाज कीन्हें बिनु मोहि कहाँ बिश्राम?” (अर्थात, प्रभूचे कार्य पूर्ण केल्याविना मला विश्रांती कुठे?) स्वतःच्या सुखाचा त्याग करून एका उदात्त ध्येयाशी एकरूप झाल्यामुळेच, ही अखंड कार्यमग्न अवस्था त्यांना प्राप्त होते आणि त्यांची प्रत्येक कृती सार्थ ठरते. हनुमान जयंतीचा हा दिवस केवळ एका देवतेचा उत्सव नसून, तो आपल्याच अस्तित्वाची नव्याने ओळख करून देणारा एक सांगावा आहे. ही शक्ती आणि हा विवेक शोधण्यासाठी आपल्याला बाहेर कुठेही वणवण करण्याची गरज नाही; तर तो अथांग साठा आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनात सुप्तावस्थेत दडलेला आहे.
जशी मारुतीरायाला जाम्बुवंताने त्यांच्या खर्या शक्तीची जाणीव करून दिली, तशीच ही जयंती आपल्यातील विसरलेल्या सामर्थ्याला जागृत करणारी ठरावी. या मंगल मुहूर्तावर आपण केवळ हात जोडून उभे न राहता, आपल्यातील बुद्धी आणि शक्ती यांना एकाच धाग्यात गुंफण्याचा दृढ संकल्प करूया. नुसतीच शक्ती असेल, तर तो विद्ध्वंस ठरू शकतो आणि नुसतीच बुद्धी असेल, तर तो केवळ कोरडा तर्क उरतो! पण जेव्हा आपल्या बुद्धीला विवेकाची आणि शक्तीला एका उदात्त भक्तीची जोड मिळेल, तेव्हाच खर्या अर्थाने आपले जीवन अधिक बलशाली, अर्थपूर्ण आणि लोकोपयोगी होईल. जय हनुमान!
- आसावरी पाटणकर