आपल्याकडे कसे ‘मराठी माणूस’, ‘मराठी भाषा’ वगैरे वगैरे म्हणत काही राजकीय पक्षांनी लोकांना भ्रमित करून ठेवले होते (देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही’ म्हणत, अशा पक्षांना त्यांची जागा दाखवली म्हणा!), तसेच ममता बॅनर्जीही प. बंगालमध्ये बंगाली संस्कृतीच्या नावाखाली तिथल्या लोकांना भ्रमित करताना दिसतात. नुकत्याच त्या म्हणाल्या की, "भाजप सत्तेत आला की, तुम्ही अंडी, मासे आणि मटण खाऊ शकणार नाहीत. भाजप-शासित राज्यात मासळी खाल्ली जात नाही. भाजप मांसाहाराच्या विरोधात आहे.” देशात १९ राज्यांत भाजप सत्तेवर आहे आणि १४ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जींच्या म्हणण्याप्रमाणे, देशातील १९ राज्यांत काय मांस-मटण आणि अंडी खाण्यावर बंदी आली आहे का? या राज्यांत शाकाहारी व्हा; नाहीतर राज्याबाहेर जा, असा नियम आहे का?
त्या असे का म्हणतात; तर अर्थातच, बंगालची आहार संस्कृती ही मासळीशी सौख्य मांडणारी आहे. समुद्रकिनार्याचे सान्निध्य असल्याने प. बंगालच्या अन्नपदार्थांमध्ये मासळीचे स्थान विशेष. प. बंगालमध्येच काय, अगदी आपल्या महाराष्ट्रातही मांसाहार आवडीने केला जातो. पण, अनेक वस्त्यांमध्ये काम करताना एक सत्य जाणवले की, मांसाहार आणि आवड हे नाते आहेच. पण, लोक मासळी-अंडी यांचा समावेश अन्नात करतात, याचे कारण दुसरेही आहे. बरेचदा ताज्या स्वच्छ भाज्या या अंडी आणि सुक्या मासळीपेक्षा महाग असतात. सुकी मासळी, अंडी हे स्वस्त आणि लवकर नाश पावणारे, खराब होणारे नसतात. त्यामुळे अनेक कष्टकरी कुटुंबांत मासळीला आणि अंड्याला हक्काचे स्थान. प. बंगालच्या गरीब वस्तीमध्येही हेच चित्र. ममता बंगाली दीदी आहे आणि ती मुख्यमंत्रीपण आहे; ती म्हणते म्हणजे खरे असेलच, असे मानणारे अनेक अज्ञानी आणि तर्क न करता जगणारे लोक प. बंगालमध्ये आहेत. दुसरीकडे भाजप विकास करेल, भाजप ‘सब जन को साथ लिये’ म्हणत हिंदूंच्या धार्मिक-सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देईल, हे प. बंगालच्या लोकांनाही माहिती आहे. प. बंगालमध्ये भाजपची लोकप्रियता पाहून, ममता सैरभैर झाल्या आणि त्या मांस-मटण आणि अंड्यांबाबत काहीबाही बोलत सुटल्या आहेत. पण, प. बंगालची जनता आता सुज्ञ झाली आहे, त्यामुळे ममता यांनी समजून जावे की, ‘ए ना चॉलबे...’!
प्रेम आणि नैराश्य
३२ वर्षांच्या भानू चंदर रेड्डी याची अमेरिकेतली नोकरी गेली. भविष्य अंधारमय झाले असे मानून, त्याने आत्महत्या केली. भानूच नाही; तर जगून करायचे काय, असे म्हणून त्याच्या पत्नीने बिवी शाझिया सिराज हिने १८व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. बंगळुरुची ही हृदयद्रावक घटना. दोघेही पेशाने इंजिनिअर. दोघांचे एकमेकांवर प्रेम, त्यातून त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. पण, शाझियाने या विवाहाबाबत तिच्या कुटुंबीयांना काहीही सांगितले नव्हते. आंतरधर्मीय विवाहाला विरोध होईल तो टाळण्यासाठी, आणखीन उज्ज्वल भविष्य निर्माण करायचे आणि तेव्हा घरी सांगायचे, असे त्या दोघांनी ठरवले होते. मात्र, त्याआधीच त्यांनी आत्महत्या केली.
या घटनेमध्ये आपली नोकरी गेल्यावर भविष्यात काय होणार? शाझिया नोकरी करते; पण आपल्याला नोकरी नाही, आपण बेकार आहोत, या भावनेने भानू त्रस्त होता. त्याचे मानसिक नैराश्य वाढले इतके की, त्याच्याशी प्रेमविवाह करणार्या शाझियालाही त्याला मनातले सांगावेसे वाटले नाही. खरेतर समाजात नैराश्याला खतपाणी घालणार्या अनेक भिंती उभ्या आहेत. त्यातली एक भिंत, जी माणसाची किंमत त्यांच्या पदावरून, पैशावरून मोजते. नोकरी नसेल, पगार नसेल आणि पद नसेल, तर किंमत शून्य! जगभरात आत्महत्येचे प्रमाण वाढलेे आहे. एखादी इच्छा पूर्ण झाली नाही, तसेच कोणतीही गोष्ट-वाक्य चटकन मनाला लागणे, क्षुल्लक गोष्टीचा संताप येणे अशी मानसिकता बोकाळली आहे. भानूची अमेरिकेतली नोकरी गेली म्हणून सगळे आयुष्य उद्ध्वस्त झाले? भानूच्या आत्महत्येनंतर शाझियानेही आत्महत्या केली. त्यांच्या आयुष्यात जगण्यासाठी काहीच नव्हते? असे का? प्रेम आयुष्य सुंदर बनवते, प्रेम माणसाला जगायला शिकवते असे म्हणतात; पण भानू आणि शाझिया यांसारखे कितीतरी प्रेमीयुगल मात्र निराशेने आत्महत्या करताना दिसतात. ‘प्यार हैं, तो रुखीसुखी रोटी खाके रहेंगे’ हे हिंदी सिनेमातले अजरामर वाक्य तकलादू आहे, हे सांगणार्या या घटना! प्रेम महत्त्वाचे आहेच; पण त्याच्या पूर्णत्वासाठी इतरही घटक आवश्यक आहेत, असे सांगणार्या या घटना. भानू आणि शाझियाच्या आत्महत्यामुळे भौतिकता आणि प्रेम, तसेच वास्तव यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.