कां हे नष्ट करिती निंदा...?

    19-Apr-2026
Total Views |

नुकत्याच संपन्न झालेल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेतील लेखात शरद पवारांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा दावा करून, संप्रदायाविषयी जनतेची दिशाभूल करून, एकप्रकारे दुहीची बीजे पेरण्याचा निष्फळ प्रयत्न केला. वारकरी संप्रदायातूनही पवारांच्या या विधानावर साहजिकच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानिमित्ताने संत साहित्याचे अभ्यासक रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांनी पवारांच्या वारकरी संप्रदायाविषयीच्या या ‌‘फेक नॅरेटिव्ह‌’ची केलेली ही पोलखोल...

कां हे नष्ट करिती निंदा...?
जगद्गुरू तुकोबारायांचा एक अतिशय संवेदनशील अभंग आहे. त्यात त्यांनी वरील प्रश्न विचारला आहे. त्याला कारण असे... ‌‘कि येथ वडील जे जे करिती| तया नाम धर्म ठेविती| येर अनुष्ठिती सामान्य सकळ॥‌’ या न्यायाने आम्ही विष्णुदास परंपरेने आमचा भक्तिमार्ग शांतपणे चालवत असतानाही, समाजातील काही विचारसरणीने नष्ट-दुष्ट दुराचारी असे लोक विनाकारण आमच्या मागे लागून आमची निंदा का बरं करतात? आमचा त्यांचा काय संबंध?... तुकोबाराय म्हणतात, मुळात आम्ही कोणाकडूनही कधीच अपेक्षा करत नाही. कोणी आम्हाला मदत करावी ही तर सोडा, कोणी आमची स्तुतिसुमने गावीत हीसुद्धा आमची अपेक्षा नाही. आम्ही भले आणि आमचा वारकरी संप्रदाय भला! पण, तरीही जाणीवपूर्वक का बरं काही लोक सतत आणि सतत आमची निंदानालस्ती करण्यास प्रवृत्त होतात? ...तेव्हा उद्विग्नपणे तुकोबारायांच्या मुखातील हे उद्गार आहेत की,

नाहीं आम्ही विष्णुदास| करीत आस कोणाची॥
कां हे नष्ट करिती निंदा| नेणों सदा आमुची॥


ही अभंगवाणी आठवण्याचे कारण म्हणजे, नुकतेच देशाचे ‌‘जाणते‌’ नेते थोरले शरद पवारसाहेब यांनी एका लेखाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणी लोकांची घुसखोरी झाल्याचे म्हटले. त्यांनी अगदी संप्रदायातील महिला प्रबोधनकारांनासुद्धा प्रतिगामी ठरवत, एकूणच वारकरी संप्रदायाला जाणीवपूर्वक ‌‘निष्फळ‌’ करण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रयत्न केलाय मात्र, तो ‌‘निष्फळ‌’ आहे हे मुद्दाम सुरुवातीलाच सांगितलेले बरे!) वरवर पाहता जरी ही एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने केलेली टीका-टिप्पणी किंवा वादग्रस्त वक्तव्य असे वाटत असले किंवा पवारांनी एखाद्या घटनेवरून संप्रदायाला लक्ष्य केले आहे असे वाटत असले, तरी असे काहीही नसून, ज्या वैचारिक चळवळीचे आपण अनेक दशके नेतृत्व केले, त्या पुरोगामित्वाच्या नावाखाली चालवलेल्या विद्रोही/नास्तिक चळवळीची होत असलेली वाताहत पाहून साहेब अतिशय अस्वस्थ असल्याने, हे अत्यंत नैराश्यापोटी त्यांनी केलेले लेखन आहे.

आस्तिक आणि नास्तिक अर्थात या जगतात ईश्वराचे अस्तित्व मान्य करणारा आणि न करणारा. दोन्ही समाज हजारो वर्षांपासून आपापल्या पद्धतीने आपले मत कसे योग्य आहे, याचा प्रचार-प्रसार करताना दिसतात. मुळात सूक्ष्म निरीक्षण केले, तर बहुतांश लोकांना ईश्वराचे अस्तित्व मान्य आहे. त्यामुळे ते त्या पद्धतीने आचरण करतात. व्यास, वाल्मीकी, ज्ञानोबाराय, तुकोबारायादी सकल साधुसंतांपासून ते छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज हे सर्व आदर्श लोकांच्या डोळ्यांसमोर असल्याने त्यांना वेगळा प्रचार-प्रसार करावा लागला नाही. मात्र, हजारो वर्षांपासून आजपर्यंत कायमच ज्यांचे अस्तित्व नगण्य राहिले आहे, त्या नास्तिकवाद्यांना कायम ते टिकवून ठेवण्यासाठी प्रचार-प्रसार करण्यासाठी झगडावे लागले. ‌‘चार्वाक‌’ हा यांचा आदर्श राहिलेला आहे आणि अलीकडे ‌‘विवेकवाद‌’ किंवा ‌‘अंधश्रद्धा निर्मूलन‌’ या नावाखाली केवळ हिंदूधमय देव-देवतांचा अपमान करणारी मात्र आता लोकांच्या फारशी लक्षातही नाहीत; अशी तुरळक नावे सोडली, तर यांचे अस्तित्व शून्य आहे.

या मंडळींची अगोदरच अल्पसंख्याकता आणि अपुरी शक्ती यामुळे बहुतांश ईश्वरनिष्ठ असलेल्या समाजाला ईश्वर नाही, असे सांगणे फार कठीण होते. मग ते काय करतात, त्यातील सर्वसामान्य लोक ज्यांना त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर उपाय सापडत नाहीत किंवा ज्यांना ईश्वरनिष्ठ समाजामध्ये दुर्दैवाने दुजाभावाची, सापत्नपणाची वागणूक मिळाली असेल, अशांना बरोबर लक्ष्य करतात. त्यांना सहानुभूती दाखवत, वरून ‌‘पुरोगामित्वा‌’चा बुरखा पांघरून त्या लोकांना विद्रोह, बंड केल्याने तुमचे प्रश्न सुटतील, असे भासवून त्याआडून नास्तिकवादापासून ते अतिशय वाईट अशा नक्षलवादापर्यंतच्या विचारसरणीवर आणून, अक्षरशः भ्रमित करण्याचे पाप करतात. ते समाजाला नास्तिकतेच्या वाटेवर जबरदस्तीने आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. पण, एवढे करूनही थोडेफारच लोक याला बळी पडतात. त्यामुळे त्यांना म्हणावे तसे ईप्सित साध्य होत नसल्याने ते सतत नैराश्यग्रस्त असतात.

आता इथे दुसरा प्रकार सुरू होतो, तो म्हणजे यांच्या प्रयत्नांना यश का येत नाही? तर, वारकरी संप्रदायासारखी ‌‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी‌’ समाजाला विवेकाची शिकवण देते. ‌‘उठा उठा साधुसंत साधा आपुले हित| गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंता॥‌’ हे सांगताना माणूस म्हणून तुमचे पहिले कर्तव्य भगवद्भक्ती आहे. दुसरे, तुमच्या वाट्याला आलेल्या उदरनिर्वाह कर्माप्रमाणे वाटचाल करीत, तुम्हाला तुमचे खरे हित संसार-पैसा-प्रॉपट यात नसून एकदाच मिळालेल्या या मानव जन्माचा उपयोग चराचरामध्ये ईश्वर अस्तित्वाचा साक्षात्कार व्हावा. अंततः ‌‘विठ्ठल जळी-स्थळी भरला‌’ ही वृत्ती होऊन तुम्ही सर्व मनुष्यमात्रच काय ‌‘भुतां परस्परे जडो मैत्र जीवांचे|‌’ इथपर्यंत नेण्याचा इतका उदात्त विचार अर्थात, ‌‘विवेक‌’ समाजाच्या मनात निर्माण करणारा वारकरी संप्रदाय हा या डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या कामातील सध्याच्या घडीचा सर्वात मोठा अडथळा आहे. कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यासाठी समाजाला वारकरी संप्रदाय हा मानसिकदृष्ट्या सक्षम करतो. अगदी याचाच परिपाक म्हणून मागे केलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जटिल प्रश्न असणारा, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची तपासणी केली असता, यात वारकरी शेतकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले होते. म्हणजे वारकरी संप्रदाय हा जशी भक्ती शिकवतो, तसा सांप्रत काळात सगळा समाज ज्या मनःस्वास्थ्यासाठी, सुखा-समाधानासाठी तळमळतो आहे, ते सुख-समाधान आहे त्या परिस्थितीत शोधण्याचा मंत्र वारकरी संप्रदाय देतो. त्यामुळे समाजाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या समाजघातकी नास्तिकवाद्यांना या संप्रदायाचा फार मोठा दुःस्वास वाटतो.

आपल्या या सर्व लोकांची गलितगात्र अवस्था पाहून हतबल असणारे ‌‘जाणते‌’ साहेब आता मात्र चळवळीच्या प्रचंड अपयशामुळे वैफल्यग्रस्ततेतून ही टीका-टिप्पणी करत आहेत. काही बोटांवर मोजण्याएवढ्या पुरोगामित्वाच्या झालरीतून नास्तिकवादाचा जहरी प्रचार-प्रसार करणारे लेखक-लेखिका, साहित्यिक तयार झाले. साहित्य संमेलनातून फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्यात सगळे आपल्या डाव्या विचारांचे लोक पेरले; पण त्यातूनही सकल समाज काय आस्तिकतेचा उजव्या विचारसरणीचा त्याग करण्याच्या मानसिकतेत येईना. उलट, साहित्यिकांच्या सर्वोच्च संस्था आता यांच्या हातातून निसटून उजव्या विचारसरणीच्या लोकांकडे जाताना उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय हतबल असणारे साहेब दुसरे काहीच करू शकत नाहीत. असे अनेक डावे नास्तिक विचारांचे गड गेल्या अनेक वर्षांत उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, ‌‘जाणते‌’ असल्यामुळे आता निर्वाणीचा उपाय म्हणून ‌‘किसी का काम खराब नहीं कर सके, तो उसका नाम खराब करों‌’ ही नीती वापरत, संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे, अशी राळ त्यांनी उठवली आहे. याचे खरेतर एका दृष्टीने हसू येते. पण, एका दृष्टीने वाईटही वाटते की, ‌‘खळांची व्यंकटी सांडावी‌’ म्हणून वारकरी संप्रदाय प्रयत्न करतोय, ते ‌‘खळ‌’ आपल्या राजकीय आणि मनुष्यजन्माच्या शेवटच्या टप्प्यातसुद्धा आपला खळपणा सोडायला तयार नाहीत. मात्र, संप्रदाय खूप पराकोटीचा आशावादी आहे. आता या सर्व घडलेल्या प्रसंगातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची उकल करण्याचा प्रयत्न करुया.

वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे का? वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली असेल, तर ती पुरोगाम्यांची झाली आहे. ‌‘धर्मजागृती‌’चा संदेश देणाऱ्यांची म्हणता येणार नाही. कारण, ‌‘घुसखोरी‌’ या अर्थाने म्हणालात, तर जबरदस्तीने काही लोक नक्कीच संतवाङ्मयांचे आपल्या सोयीनुसार अर्थ लावून, वारकरी संप्रदाय कसा सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, तो कसा निधम आहे, हिंदू धर्माचा-संप्रदायाचा काही संबंध नाही, असे खोटे विमर्श, ‌‘फेक नॅरेटिव्ह‌’ तयार करणारी पुरोगामित्वाचा मुखवटा घालून काही मंडळी घुसली आहेत, हे मात्र खरे. त्या अशा पुरोगामी घुसखोरांची यादी तयारच आहे, ती यथावकाश आम्ही प्रसिद्ध करूच.

वारकरी संप्रदाय हिंदू धर्माधिष्ठितच ः वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मात जे अनेकविध उपासना पंथ आहेत, त्यातील वैष्णवांचा पंथ आहे. या पंथाचे ‌‘प्रस्थानत्रयी‌’ मानले जाणारे ग्रंथ 1) ज्ञानेश्वरी (‌‘भगवद्गीता‌’ विवेचन) 2) तुकाराम गाथा (चहू वेदांचे केलेले विवरण) 3) एकनाथी भागवत (श्रीमद्भागवत एकादश स्कंध) हे तीनही हिंदू धर्मातील श्रेष्ठ ग्रंथाधारानेच अगदी तुकोबारायांनी, ‌‘पाहिली पुराणे| धांडोळली दर्शने॥‌’ असेच म्हटले आहे. कुठेही इतर धर्माच्या ग्रंथांचे नावही घेतले नाही. रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पंच-पर्वकाळ, एकादशी, सोमवार ही अखंड व्रते कोणत्या धर्मानुसार आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठितच आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

सर्वधर्मसमभाव ऐवजी ‌‘सर्वधर्मममभाव‌’ : गोष्ट अशी की, ‌‘सर्वधर्मसमभाव‌’ ही संकल्पनाच वारकरी संप्रदायाला मान्य नाही. मात्र, ‌‘सर्वधर्मममभाव‌’ मानणारा संप्रदाय आहे. ‌‘यारे यारे लहान थोर| याती भलते नारी नर॥‌’ हे म्हणत असताना विठ्ठलभक्तीसाठी कोणालाही अडवले नाही, सर्वांचे स्वागत केले आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, कबीर, मोमीन, लतीफ मुसलमान हे विठ्ठलभक्त झाले म्हणून वारकरी संप्रदाय निधम झाला. हा तर्क नव्हे, कुतर्क आहे. उलट, कबीर महाराज मुस्लिमांना उद्देशून म्हणतात, ‌‘मुल्ला होकर बांग पुकारे युं क्या साहिब बहिरा हैं|‌’ (मोठमोठ्याने बांग कशाला देता, आपला देव काय बहिरा आहे का?- असा सारांश) हे सांगितले जात नाही. उलट, या सर्वांना रामभक्ती-कृष्णभक्ती-विठ्ठलभक्ती आवडल्याने आपल्या मूळ धर्मात ते परत आले आहेत, हे सत्य आहे. दुसरी गोष्ट आपला देव, देश आणि धर्म या विषयांवर संत कधीही तडजोड करत नाहीत आणि तडजोड करणाऱ्यांना ते झापल्याशिवाय राहात नाहीत. आपल्या समोर एवढे देव, एवढे संत-महात्मे असताना त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे सोडून दर्गा, कबरींना देव मानणाऱ्यांना तुकाराम महाराज म्हणतात-

संतां नाहीं मान| देव मानी मुसलमान॥1॥
ऐसे पोटाचे मारिले| देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥ घाली लोटांगण| वंदी नीचाचे चरण॥2॥
तुका म्हणे धर्म| न कळे माजल्याचा भ्रम ॥3॥

आपल्या स्वार्थापोटी संतांऐवजी मुसलमानाला देव मानणाऱ्यांना तुकोबाराय म्हणतात, अशा माजलेल्या लोकांना धर्म आणि अधर्म काहीच कळत नाही. कारण, ते अज्ञानामध्ये जगत असतात. यापेक्षा आता अजून काय धर्माबद्दल स्पष्ट भूमिका हवी? सर्वांप्रति आमचा ममत्वभाव आहे; पण आमच्या धर्माचे अस्तित्व राखूनच, हाच संतांचा स्पष्ट संकेत आहे.

वारकरी संतांनी ‌‘वेद‌’ नाकारले?: हासुद्धा अत्यंत हास्यास्पद दावा आहे. ‌‘ज्ञानेश्वरी‌’ची सुरुवातच ज्ञानोबाराय ‌‘ॐ नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या॥‌’ (वेदाने प्रतिपादन केलेला परमात्मा) असे म्हणतात. तर, ‌‘वेद मार्गे मुनी गेले| त्याची मार्गे चालीलो॥‌’ हेसुद्धा अभंगातून मांडले जाते आणि याही उपर कोणी वेदांची निंदा करताना दिसला तर, ‌‘वेद निंदी तो चांडाळ|‌’ असा उल्लेख करतात.

राजकीयदृष्टीने मतभेद : वारकरी संप्रदायातील काही लोक आपापल्या व्यक्तिगत आवडीनुसार, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उघड समर्थक झाले आहेत. तर, वारकरी विचार जो समाजाला दिशा देणारा आहे, तो स्वीकारण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत असतील; तर समाजाच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, वारकरी संप्रदायाला कोणीही पक्षीय शिक्का मारण्याचे कारण नाही. राजकीय पक्ष संबंध हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत विचार. फक्त संप्रदायाला गालबोट लागेल असे वर्तन राजकीय लोकांसोबत राहून कोणी करू नये, ही अपेक्षा योग्यच. मात्र, एखादा राजकीय पक्ष किंवा नेता आपल्यातील वैरभाव साधण्यासाठी वारकरी संप्रदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करेल, तर तो त्यांचा दोष. आमच्यात खोट नाही. त्यांच्या पक्षामध्येही अनेक आस्तिक लोक असतील आणि ते त्यांच्या स्वार्थासाठी किंवा राजकारणाचा भाग म्हणून नेत्यासोबत असतील, त्याला आमची हरकत नाही. मात्र, अशा लोकांंनी आपल्या नेत्याच्या व्यक्तिगत प्रेमापोटी तत्त्वज्ञानासंदर्भात आम्हाला उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नये. सर्वसामान्य वारकरी कोणाही जीवाच्या व्यक्तिगत प्रेमापोटी तत्त्वज्ञान वेशीला टांगत नाही.

वरील विवेचनावरून एक गोष्ट लक्षात घ्यावी-
नाही आम्ही विष्णुदास| करीत आस कोणाची॥
का हे नष्ट करिती निंदा| नेणो सदा आमुची॥


आम्ही कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा केलेली नसताना, दुष्ट प्रवृत्ती सदासर्वदा आमच्याविषयी गरळ ओकत असतील, तर तो स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेईल, हे नक्की!

‌‘जे खळांची व्यंकटी सांडो | सत्कम रती वाढो...॥
रामकृष्ण हरी!


- रामकृष्ण हनुमंत महाराज वीर
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)