त्रिविक्रम मंदिर, तेर: विटांमध्ये कोरलेला इतिहास...

    19-Apr-2026
Total Views |

मराठवाड्यातील लेण्यांचा, मंदिरांचा विचार केला की, अजिंठा-वेरूळ, घृष्णेश्वराचे ज्योतिर्लिंग असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण, मराठवाड्यात अशीही काही पुरातन, ऐतिहासिक स्थळे आहेत, जी तुलनेने काहीशी अपरिचित. त्यांपैकीच एक म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर. ‌‘रोमन‌’ साम्राज्याशी संबंधांच्या पाऊलखुणांपासून ते प्रगत नगर-नियोजनापर्यंत तेरचा समृद्ध इतिहास. याच तेरमधील त्रिविक्रम मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही, तर ते महाराष्ट्रातील सर्वात जुने उभे स्थापत्य स्मारक म्हणूनही ओळखले जाते. आजच्या लेखात अशा या ऐतिहासिक तेरनगरीची सांस्कृतिक भ्रमंती...

मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात असलेले तेर हे गाव आज शांत, साध्या जीवनाचे प्रतीक वाटते. परंतु, या शांततेखाली एक अफाट, बहुस्तरीय इतिहास दडलेला आहे- ज्याचे थर उकलत गेले की, माणसाला स्वतःच्या सांस्कृतिक खोलीची जाणीव होते. ‌‘तगर‌’ किंवा ‌‘तगरपूर‌’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्राचीन नगरीचे उल्लेख इसवी सनाच्या पहिल्या शतकातील ‌‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी‌’ या ग्रंथात आढळतात, जो एका अज्ञात ग्रीक व्यापाऱ्याने लिहिलेला भूगोल आणि व्यापार-मार्गदर्शिकेचा अमूल्य दस्तावेज आहे. त्यात तगरचा उल्लेख मलमल, सामान्य वस्त्रे आणि स्थानिक मालाचे प्रमुख निर्यात केंद्र म्हणून येतो. ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमी यानेही दुसऱ्या शतकात या नगरीचे अक्षांश-रेखांश नोंदवले, म्हणजे तगर केवळ भारतीय नकाशावरच नव्हे, तर ‌‘रोमन‌’ साम्राज्याच्या व्यापारी दृष्टिक्षेपात असणारे शहर होते.

पुरातत्त्व उत्खननांनी या दाव्यांना पुरावे दिले आहेत. 1958 मध्ये के. एन. दीक्षित यांनी केलेल्या पहिल्या उत्खननापासून ते 2014-15 मध्ये ‌‘महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालया‌’ने केलेल्या ताज्या उत्खननापर्यंत, तेरच्या मातीने अनेक रहस्ये उघड केली आहेत. तर्णा नदीच्या काठावरील या भूमीत सहा ते सात मीटर खोलीचे पुरातत्त्वीय थर आढळले असून, ते अडीच किलोमीटरपर्यंत पसरलेले आहेत. येथे सापडलेली रोमन नाण्यांची मालिका, रोमन शैलीतील दिवे, मातीच्या मूत आणि मातीच्या पात्रांवरील लाल-चकाकी असलेले आलेप, अर्धमौल्यवान दगडांचे मणी हे सर्व या नगरीचे आंतरराष्ट्रीय व्यापारी जाळे सिद्ध करतात. इतकेच नव्हे, तर उत्खननात रोमन व्यापारी किंवा त्यांच्याशी नित्य संबंध असलेल्या स्थानिकांच्या वसाहतीचे अवशेषही सापडले आहेत. पुराच्या पाण्यापासून संरक्षणासाठी भक्कम दगडी पायावर बांधलेली घरे, हे त्या काळातील प्रगत नगर-नियोजनाचे द्योतक.

या व्यापारी वैभवाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले त्रिविक्रम मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही, ते महाराष्ट्रातील सर्वात जुने उभे स्थापत्य स्मारक मानले जाते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) ने ते ‌‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक‌’ म्हणून संरक्षित केले आहे. या मंदिराचे बांधकाम ‌‘सातवाहन‌’ काळात, इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात झाल्याचे मानले जाते. म्हणजे, ज्या काळात रोम आणि भारत यांच्यातील व्यापार शिखरावर होता, त्याच काळात तगरमध्ये हे मंदिर उभे राहिले. हा योगायोग नसून त्या संपन्न नगरीच्या सांस्कृतिक आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

त्रिविक्रम मंदिराचे सर्वात वेधक वैशिष्ट्य म्हणजे, त्याची ‌‘अप्सिडल‌’ (अर्धवर्तुळाकार) योजना. भारतीय मंदिर स्थापत्यात हा आराखडा अत्यंत दुमळ आहे. गर्भगृहाचा मागील भाग अर्धवर्तुळाकार असून, त्यावरचे छप्परही त्याच वक्रतेचे अनुसरण करते, ज्याला शास्त्रीय भाषेत ‌‘वॅगन-व्हॉल्टेड रूफ‌’ असे म्हणतात. या संपूर्ण रचनेला ‌‘गजपृष्ठ‌’ म्हणतात. बसलेल्या हत्तीच्या पाठीप्रमाणे दिसणारा हा आकार भारतीय स्थापत्यात एक विशिष्ट तांत्रिक आणि सौंदर्यशास्त्रीय संकल्पना आहे.

मंदिराच्या अग्रभागावर दिसणारी चैत्यकमान (chaitya-arch) ही एलोरा येथील ‌‘विश्वकर्मा‌’ लेणीतील दर्शनीय भागाशी साम्य दाखवते. बाहेरच्या भिंतींवर भारी ‌‘मोल्डिंग्ज‌’, पातळ ‌‘पिलास्टर्स‌’ आणि मूळ प्लास्टरचा थर यांनी मंदिराला एक साधी; पण गंभीर उपस्थिती दिली आहे. आतील भागात एकही खांब नाही. कारण, मंदिराचा आकार तेवढ्या आधाराशिवायही स्वयंपूर्ण आहे.

या मंदिराचे बांधकाम विटांमध्ये केलेले असणे, हे महाराष्ट्राच्या प्रदेशात विशेष उल्लेखनीय आहे. येथे उत्खननात सापडलेल्या आणखी काही ‌‘अप्सिडल‌’ संरचना, विशेषतः मंदिराजवळ सापडलेली लाकडी खांबांवर आधारित असलेली रुंद ओसरी असलेली एक विटांची ‌‘अप्सिडल‌’ रचना हे दाखवते की, तेर हे केवळ एकट्या मंदिराचे नव्हे, तर ‌‘अप्सिडल‌’ स्थापत्याच्या एका जिवंत परंपरेचे केंद्र होते. एकाच गावात अनेक ‌‘अप्सिडल‌’ रचना असणे, हे मंदिर स्थापत्याच्या उत्क्रांतीत तेरने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे साक्षीदार आहे.

बाहेरच्या सपाट छताचा मंडप सहाव्या शतकात जोडण्यात आला. चार लाकडी खांबांवर आधारलेल्या या मंडपात एक ऐतिहासिक परंपरा जपली आहे- संत नामदेव यांनी या मंदिरात कीर्तन केले होते, असे सांगितले जाते. ते उभे राहिलेली जागा आजही मंडपात दाखवली जाते. म्हणजे, हे मंदिर स्थापत्यशास्त्रापुरते मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेचाही एक भाग आहे.

याच भूमीत लज्जागौरीच्या मूत, जैन प्रतिमा आणि त्रिरत्नाची चिन्हे सापडली आहेत. उत्खनन अहवालात नमूद केल्याप्रमाणे, येथे बहुधमय स्थापत्याचे अवशेष एकत्र आढळतात. हे ‌‘सातवाहन‌’ राजांच्या धार्मिक सहिष्णुतेचे ठळक उदाहरण आहे. सांचीच्या स्तूपाला दान देणारे हेच सातवाहन राजे, त्याच भूमीत हिंदू आणि बौद्ध दोन्ही परंपरांना पोषक होते. हे वाचले की, सर्वांना आपल्यामध्ये सामावून घ्यायची हिंदू-परंपरा किती जुनी आहे, याची प्रचिती येते.

या मंदिराचे मूर्तिशास्त्रीय केंद्रबिंदू म्हणजे गर्भगृहातील त्रिविक्रमाची मूत, जी प्रारंभिक ‌‘चालुक्य‌’ काळातील असल्याचे मानले जाते. त्रिविक्रम हे विष्णूचे ते रूप आहे, ज्याने वामनावतारानंतर तीन पावलांत पृथ्वी, आकाश आणि पाताळ व्यापले. एक पाय पृथ्वीवर स्थिर, दुसरा आकाशाकडे झेपावलेला- हे शिल्प पाहणाऱ्याला एका विलक्षण अनुभवाशी जोडते. मूतच्या पायाशी राजा बळी आणि त्याची पत्नी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत, ज्या दानशूरतेच्या पराभवाची आणि मर्यादेच्या स्वीकाराची कहाणी सांगतात. तगरच्या बाजारपेठेत रोमन व्यापाऱ्याशी वस्तुविनिमय करणारा सातवाहन व्यापारी आणि या गर्भगृहात मान झुकवणारा भाविक, या दोन्ही अनुभवांना एकाच भूमीने धारण केले, हे किती अपूर्व आहे.

1993च्या किल्लारी भूकंपाने मराठवाड्याला हादरवले होते. हजारो वास्तू कोसळल्या, असंख्य जीव गेले. परंतु, त्या प्रलयातही त्रिविक्रम मंदिर अविचलपणे उभे राहिले. विटांमध्ये बांधलेल्या या सहस्रवषय संरचनेला एकही तडा गेला नाही. हे केवळ सांरचनिक बळकटीचे नव्हे, तर काही गोष्टी वेळेच्या पलीकडे असतात, या भावनेचेही प्रतीक वाटते.

आज तेर पर्यटनाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. मात्र, इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे मंदिर वेगळ्याच प्रकारे भेटते- गद नाही, गोंधळ नाही, फक्त ती अर्धवर्तुळाकार भिंत आणि तिच्या आत घुमणारा इतिहासाचा निनाद. जिथे रोमन नाणी सापडली, तिथे त्रिविक्रमाची मूत उभी आहे. जिथे बौद्ध स्तूप होते, तिथे संत नामदेवांचे कीर्तन घुमले. हे सारे एकत्र धारण करणारी ही भूमी, हीच तगरची खरी ओळख आहे.

त्रिविक्रम मंदिरासमोर उभे राहिले की, एक जाणीव होते की, इतिहास हा केवळ घडलेल्या घटनांचा क्रम नाही, तर तो एक सतत सुरू असलेला संवाद आहे. विटा बोलतात, मूत बोलतात आणि माती बोलते; फक्त ऐकण्याची तयारी हवी.

- इंद्रनील बंकापुरे
7841934774