Ritu tawade birthday : रितू तावडे यांचा अनाथ मुला-मुलींशी आत्मीय संवाद; शालेय साहित्याचे वितरण
19-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Ritu tawade birthday) मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त औपचारिकतेपलीकडे जाऊन माणुसकीचा स्नेहस्पर्श जपत ‘दी चिल्ड्रेन्स एड सोसायटी’ संचलित बालकल्याण नगरी (मानखुर्द) आणि चेंबूर चिल्ड्रन्स होम येथे अनाथ मुला-मुलींसमवेत वेळ व्यतित करून त्यांना स्नेहभोजन दिले तसेच शालेय उपयोगी बॅगचे वितरण केले.
याप्रसंगी रितू तावडे यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींशी अत्यंत आपुलकीने संवाद साधत त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या बळावर आपण स्वप्ने साकार करू शकतो. या सुधार गृह आणि अनाथ आश्रम यातील प्रत्येक मुलगा, मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक म्हणून घडावी, हीच अपेक्षा आहे. शासन आणि महानगरपालिका त्यांच्या पाठीशी कायम उभे आहे, असे सांगून महापौरांनी सर्व मुला-मुलींशी संवाद साधला.(Ritu tawade birthday)
या कार्यक्रमास ‘दी चिल्ड्रेन्स एड सोसायटी’चे उपमुख्य अधिकारी सतीश बनसोडे, बालकल्याण नगरीच्या प्रशासका रेणुका जाधव, चेंबूर चिल्ड्रन होमचे अधीक्षक तुषार भिलावेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मानखुर्द) चे प्राचार्य स्वप्निल घाटे तसेच संस्थेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.