सध्या अमेरिका-इराणदरम्यान युद्धविराम असला, तरी हा संघर्ष संपुष्टात यावा, म्हणून वाटाघाटीही सुरू आहेत. अशातच इराणला नमवण्यासाठी मागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही संपूर्ण संस्कृतीच नष्ट करण्याची विध्वंसक भाषा केली. अशा या इराणला इस्लामपूर्व समृद्ध अशा पर्शियन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. तेव्हा काल संपन्न झालेल्या ‘जागतिक वारसा दिना’निमित्ताने इराणमधील याच पर्शियन संस्कृतीच्या इतिहासाची पाने उलगडणारा हा लेख...
इस्लामपूर्व पर्शियन संस्कृती ही मानव इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि समृद्ध संस्कृतींपैकी एक मानली जाते. प्राचीन पर्शिया (आजचा इराण) हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या आशिया, युरोप आणि आफ्रिका यांच्या संगमावर असल्यामुळे येथे विविध संस्कृतींचा प्रभाव पडला आणि त्यातून एक अद्वितीय सांस्कृतिक परंपरा विकसित झाली. इस्लामपूर्व काळात पर्शियाने केवळ राजकीय शक्तीच नव्हे; तर धर्म, कला, साहित्य, प्रशासन आणि सामाजिक जीवनातही उल्लेखनीय प्रगती साधली होती.
जसे गुप्त-वाकाटक राज्यांच्या कालखंडास ‘भारताचा सुवर्णकाळ’ म्हणतात, तसेच ‘आकेमेनिड’ साम्राज्याच्या काळात पर्शियन संस्कृतीने उच्चांक गाठल्याचे आढळून येते. ‘सायरस द ग्रेट’ नावाच्या राज्यकर्त्याने इसवी सन पूर्व सहाव्या शतकात ‘आकेमेनिड’ साम्राज्याची स्थापना केली. ‘सायरस द ग्रेट’ आणि पुढे ‘डेरियस प्रथम’ यांच्या कारकिदत ‘आकेमेनिड’ साम्राज्यात भूमध्य समुद्रापासून ते सिंधू नदीपर्यंतचा प्रदेश समाविष्ट होता. ‘सायरस द ग्रेट’ला जगातील ‘पहिला मानवी हक्कांचा पुरस्कर्ता’ असेही म्हणतात. त्यांच्या कारकिदतील ‘सायरस सिलेंडर’ नावाच्या वृत्तचित्तीच्या आकाराच्या मातीच्या भांड्यावर ‘क्युनिफॉर्म’ लिपीत सायरस याने अवलंबलेल्या उदारमतवादी धोरणांचा उल्लेख आढळून येतो. यामध्ये स्थानिक लोकांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर करणे आणि त्यांना त्याच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देणे, तसेच निर्वासितांना त्यांच्या मूळ भूमीत परत जाण्याची परवानगी देणे इत्यादींचा समावेश होतो. डेरियस प्रथम याने भारतातील प्रांत जिंकले असल्याचे सांगतो, त्यात तो एका प्रांतास ‘हिंदुश’ असे संबोधतो. हा प्रांत आजचा सिंधू नदीच्या खोऱ्यातील प्रदेश असण्याची दाट शक्यता आहे. ‘आकेमेनिड’ राजांच्या कारकिदत पर्शियन सैन्यात भारतीय सैनिकांचा भरणा असल्याचे आढळून येते. उदा. इतिहासकार हिरोडोटस त्याच्या ‘हिस्ट्रीस्’ नावाच्या पुस्तकात ‘क्झरक्सिस’ राजाच्या ग्रीकवरील आक्रमणात भारतीय पायदळ आणि घोडदळाच्या तुकड्या असल्याचे नमूद करतो. अंतर्गत कलह आणि बाह्य आक्रमणे यांच्यामुळे साम्राज्य कमकुवत झाले. या दुफळीचा फायदा घेऊन सिकंदरने पर्शिया जिंकून घेतला आणि ‘आकेमेनिड’ साम्राज्याचा अंत झाला. ‘आकेमेनिड’ साम्राज्याच्या अस्तानंतर साधारण काही शतके पर्शियावर पार्थियन राज्यांचे वर्चस्व होते.
साधारणतः इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात अर्दशिर प्रथम यांनी शेवटचा पार्थियन शासक अर्तबनूस याचा पराभव करून ‘सासानिड’ साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. ‘सासानिड’ साम्राज्य हे इस्लामपूर्व पर्शियातील शेवटचे महान साम्राज्य. अर्दशिर प्रथमचा पुत्र शपूर पहिला याने साम्राज्याचा विस्तार केला. शपूर प्रथम हा अत्यंत कुशल आणि शूर लढवय्या होता, त्याने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर गोर्डियन तिसरा यास युद्धभूमीवर यमसदनी धाडले, त्यानंतर आलेल्या ‘फिलिप द अरब’ नावाच्या रोमन सम्राटास मानहानिकारक तह करण्यास भाग पाडले. त्याच्या पश्चात आलेल्या वलेरियन यास युद्धात हरवले आणि कैद करून घेतले. अशाप्रकारे शपूर प्रथमने एकूण तीन रोमन सम्राटांना नामोहरम केले होते. वलेरियनने पत्करलेल्या शरणागतीचे चित्रण ‘नक्ष-ए-रुस्तम’ येथे दिसून येते. शपूर प्रथमच्या नंतर आलेल्या सर्व शासकांना सातत्याने बाह्य आक्रमणांचा सामना करावा लागला. यामध्ये प्रमुख्याने रोमन आणि त्यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे ‘बायझंटाईन’ साम्राज्य यांचा समावेश होतो. सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे साम्राज्य आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या कमकुवत झाले. अखेरीस, इसवी सनाच्या सातव्या शतकात अरब मुस्लीम सैन्यांनी ‘सासानिड’ साम्राज्यावर आक्रमण केले. या आक्रमणांमुळे ‘सासानिड’ साम्राज्याचा अंत झाला.
इस्लामपूर्व पर्शियन संस्कृतीत ‘झोराष्ट्रियन धर्म’ याला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. या धर्माची स्थापना झरतृष्ट यांनी केली होती. ‘अवेस्ता’ हा झोराष्ट्रियन धर्माचा प्रमुख ग्रंथ होता, ज्यात धार्मिक स्तोत्रे, नियम आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश होता. झोराष्ट्रियन धर्म हा एकेश्वरवादी स्वरूपाचा होता आणि त्यात सत्य (अहुरा माझ्दा) आणि असत्य (अंग्रा मैन्यू) यांच्यातील संघर्षावर भर दिला गेला. या धर्मात नैतिकतेला खूप महत्त्व होते- चांगले विचार, चांगली वाणी आणि चांगली कृती ही त्याची मूलभूत तत्त्वे होती. या धर्मात अग्नीला पवित्र मानले जाते. झोराष्ट्रियन धर्माच्या धर्मस्थानास ‘अग्निमंदिर’ असे म्हणतात. या अग्निमंदिरात अग्नीची पूजा केली जात असे.
कला आणि वास्तुकलेच्या क्षेत्रात इस्लामपूर्व पर्शिया अत्यंत प्रगत होता. भव्य राजवाडे, स्तंभयुक्त इमारती, आणि उत्कृष्ट कोरीवकाम हे त्याचे वैशिष्ट्य. ‘पर्सेपोलिस’ हे ‘आकेमेनिड’ साम्राज्याचे भव्य राजधानी शहर होते, जे आजही त्या काळातील वैभवाची साक्ष देते. येथील शिल्पकलेत विविध प्रांतांतील लोक आणि त्यांच्या संस्कृतींचे चित्रण केलेले आढळते. यावरून पर्शियन साम्राज्याची बहुसांस्कृतिक रचना स्पष्ट होते.
भाषा आणि साहित्याच्या दृष्टीनेही पर्शियन संस्कृती समृद्ध होती. जुनी पर्शियन भाषा आणि ‘अवेस्ता’मधील भाषा यांचा वापर धार्मिक आणि प्रशासकीय कार्यासाठी केला जात असे. ‘क्युनिफॉर्म’ लिपीचा वापर करून शिलालेख लिहिले जात असत, ज्यामुळे त्या काळातील इतिहास आणि प्रशासनाची माहिती मिळते. प्रशासन आणि शासन पद्धतीच्या बाबतीत पर्शियन साम्राज्य अत्यंत संघटित होते. ‘महाराजाधिराज (शाहनूशाह)’ हा सर्वोच्च शासक असत. परंतु, त्याचे संपूर्ण साम्राज्य प्रांतांमध्ये विभागले होते, ज्यांना ‘सॅट्रपी’ अथवा ‘क्षत्रपी’ असे म्हणत. प्रत्येक प्रांतावर एक ‘सॅट्रप’ किंवा ‘क्षत्रप’ नियुक्त केला जात असे. ही प्रणाली अत्यंत कार्यक्षम होती आणि त्यामुळे विशाल साम्राज्याचे सुयोग्य व्यवस्थापन शक्य झाले. याशिवाय, पर्शियनांनी विकसित केलेली रस्ते व्यवस्था आणि टपाल सेवा ही त्या काळातील अत्याधुनिक मानली जाते. ‘रॉयल रोड’ ही प्रसिद्ध मार्गव्यवस्था होती, ज्यामुळे व्यापार आणि संवाद सुलभ झाला.
सामाजिक जीवनात पर्शियन समाज विविध स्तरांमध्ये विभागलेला होता. परंतु, त्यात काही प्रमाणात सामाजिक गतिशीलता होती. शेतकरी, कारागीर, व्यापारी आणि सैनिक हे समाजाचे प्रमुख घटक होते. स्त्रियांना मानाचे स्थान होते आणि काही स्त्रिया प्रशासनातही कार्यरत होत्या. कुटुंबसंस्था मजबूत होती आणि नैतिक मूल्यांना महत्त्व दिले जात असे. आर्थिकदृष्ट्या पर्शियन साम्राज्य समृद्ध होते. शेती, व्यापार आणि हस्तकला हे अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार होते. ‘रेशीम’ मार्गाच्या माध्यमातून पर्शियाने चीन, भारत आणि युरोप यांच्याशी व्यापार केला. सोने, चांदी, कापड, मसाले आणि इतर वस्तूंची देवाणघेवाण होत असे. पर्शियन नाण्यांची प्रणालीही विकसित होती, ज्यामुळे व्यापार सुलभ झाला.
इस्लामपूर्व काळात प्राचीन पर्शिया (आजचा इराण) आणि प्राचीन भारत यांच्यात अत्यंत घनिष्ठ, बहुआयामी आणि दीर्घकालीन संबंध होते. भाषिक दृष्टीनेही पर्शिया आणि भारत यांच्यात निकट संबंध होते. जुनी पर्शियन भाषा आणि संस्कृत या दोन्ही भाषा एकाच भाषापरिवारातील असल्यामुळे त्यांच्यात अनेक शब्दसाम्य आणि व्याकरणिक समानता आढळते. या भाषिक नात्यामुळे साहित्य, धार्मिक ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचा परस्पर प्रभाव वाढला. याव्यतिरिक्त धार्मिक आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही या दोन संस्कृतींमध्ये अनेक साम्य आढळतात. झोराष्ट्रियन धर्म आणि वैदिक हिंदू धर्म यांच्यातील साम्य विशेषतः उल्लेखनीय आहे. दोन्ही धर्मांमध्ये अग्नीला पवित्र मानले जाते.
भारत आणि पर्शियामध्ये स्थलमार्गाने आणि जलमार्गाने मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. नुकतेच ‘घारापुरी’ बेटावरील उत्खननात दीड हजार वर्षांपूवचे पर्शियन भांड्यांचे मिळालेले अवशेष याचा पाठपुरावा करतात. भारतातून मसाले, सुती व रेशमी कापड, मौल्यवान रत्ने आणि हस्तकला वस्तू पर्शियात निर्यात केल्या जात; तर पर्शियातून धातू, उत्कृष्ट शस्त्रे आणि घोडे भारतात आयात होत. रेशीममार्गामुळे चीन, पर्शिया आणि भारत यांच्यातील व्यापार अधिक सुलभ झाला. शेवटी, इस्लामपूर्व पर्शिया आणि भारत यांच्यातील संबंध हे सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय स्तरांवर खोलवर रुजलेले होते. या संबंधांमुळे दोन्ही संस्कृती अधिक समृद्ध झाल्या आणि त्यांच्या विकासाला चालना मिळाली.
शेवटी, इस्लामपूर्व पर्शियन संस्कृतीचा अंत अरब मुस्लीम आक्रमणांमुळे झाला. इस्लामच्या आगमनानंतर पर्शियात मोठे सांस्कृतिक आणि धार्मिक बदल घडले. तरीही, इस्लामपूर्व पर्शियन संस्कृतीचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा झाला नाही. तिचे अनेक घटक इस्लामी पर्शियन संस्कृतीत समाविष्ट झाले. एकूणच, इस्लामपूर्व पर्शियन संस्कृती ही अत्यंत समृद्ध, प्रगत आणि प्रभावशाली होती. तिच्या राजकीय व्यवस्थेपासून ते धर्म, कला, साहित्य आणि सामाजिक जीवनापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाची प्रगती दिसून येते. या संस्कृतीने मानव इतिहासाला दिलेले योगदान अमूल्य आहे आणि आजही तिचा अभ्यास इतिहासकार आणि संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरतो.
- रघुनाथ बोकील
(लेखक प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग, साठये महाविद्यालय (स्वायत्त) येथे कार्यरत आहेत.)