अंदमानमधील श्रीविजयपुरम (पोर्टब्लेअर) येथे नुकतेच 49वे ‘नागरी लिपी’ संमेलन संपन्न झाले. श्रीविजयपुरमसारख्या दूरस्थ सागरी टोकावर ‘नागरी लिपी’चे राष्ट्रीय संमेलन घडणे, हीच एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. त्यानिमित्ताने या संमेलनाचे अंतरंग उलगडणारा हा लेख...
अंदमान-निकोबारच्या निळ्याशार सागरकिनारी वसलेल्या श्रीविजयपुरम येथे दि. 28 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान पार पडलेले 49वे ‘अखिल भारतीय नागरी लिपी संमेलन’ हे एक भारतीय भाषिक-सांस्कृतिक एकात्मतेचा बहुपेडी बौद्धिक उत्सव ठरले. देशाच्या मुख्य भूभागापासून भौगोलिकदृष्ट्या सुमारे एक हजार, 400 किमी दूरवर असलेल्या या बेटांची राजधानी श्रीविजयपुरम (जुने नाव ‘पोर्ट ब्लेअर’) येथे ‘नागरी लिपी’चे राष्ट्रीय संमेलन घडणे, हीच एक समुद्र, सीमा आणि अंतर ओलांडून घडणारी आणि लोकांना जोडणारी एक प्रभावी सांस्कृतिक घटना आहे. इतक्या दूरवर केवळ एका लिपीसंबंधाने होत असलेल्या या संमेलनास उपस्थित राहायचा योग हा एक सदैव आठवणीत राहील, असाच ठरला.
‘भारतरत्न’ विनोबा भावे नेहमी सांगत असत की, ‘भारताची एकात्मता हिंदी भाषेपेक्षाही देवनागरी लिपी कितीतरी अधिकपटीने साधू शकेल.’ त्यांच्याच प्रेरणेने 1951 मध्ये नवी दिल्ली येथे स्थापन झालेली ‘नागरी लिपी परिषद’ आणि श्रीविजयपुरम्मधील ‘हिंदी साहित्य कला परिषद’ व ‘जवाहरलाल नेहरू राजकीय महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. शिक्षण मंत्रालयाच्या ‘केंद्रीय हिंदी संचालनालया’च्या सहकार्यामुळे या उपक्रमाला शासकीय अधिष्ठान व महत्त्वही लाभले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक आणि साहित्यिकांच्या उपस्थितीमुळे परिषद खऱ्या अर्थाने ‘अखिल भारतीय’ ठरली.
‘नागरी लिपी’ ही केवळ लेखनपद्धतीच नव्हे, एक सांस्कृतिक अधिष्ठान आहे आणि विविधतेतून एकात्मता साधण्याची तिची शक्ती ही तिच्या ‘उच्चारानुसार लिहिणे’ या स्वरूपात दिसून येते. जगभरात ज्या अत्यंत मोजक्या लिपींची वर्णमाला मौखिक उच्चारानुसार म्हणजे ‘ध्वन्यात्मक’ आहे, अशा एका हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या लिपींमध्ये ‘देवनागरी’चा अजूनही पहिला क्रमांक लागतो.
मराठी संस्कृतीत ‘देवनागरी लिपी’ हा शब्द रूढ झालेला असला, तरी तिकडे उत्तर भारतात सर्वसाधारणपणे ‘नागरी लिपी’ असे संबोधण्याचा प्रघात पडला आहे. ‘नागरी लिपी’चा विचार करताना आपण तिला बहुधा हिंदी, मराठी, संस्कृतशी जोडतो. परंतु, तिचा व्याप त्याहूनही व्यापक आहे. ‘नेपाळी’, ‘कोकणी’, ‘भोजपुरी’, ‘राजस्थानी’, ‘मैथिली’, ‘मागधी’सह इतर अनेक भाषा व बोलींचे लेखनही ‘नागरी’त होते. ऐतिहासिकदृष्ट्या पाहता, ‘ब्राह्मी’पासून विकसित होत आलेली ही लिपी भारतीय ज्ञानपरंपरेचे एक महत्त्वाचे माध्यम ठरली आहे. शिलालेख, धर्मग्रंथ, साहित्य आणि आधुनिक ज्ञानसंपदा या सर्वांचा एक सातत्यपूर्ण प्रवाह ‘देवनागरी’तून दिसतो. ‘देवनागरी’ ही केवळ भारतातीलच नव्हे, तर दक्षिण आशियातील एक 'Bridge Script' ‘सेतू-लिपी’ बनली आहे. तिच्या शास्त्रीय स्वरूपामुळे आणि उच्चारांच्या अचूकतेमुळे अनेक आदिवासी आणि अल्पसंख्याक भाषांनीही ही लिपी स्वीकारली आहे. याबरोबरच विनोबांनीही प्रचलित देवनागरीत सुधारणा सुचवून तिला ‘लोकनागरी’ असेही म्हटले होते.
या परिषदेच्या उद्घाटन सत्रात ‘पूर्वांचल विद्यापीठा’चे माजी कुलगुरू व ‘नागरी परिषदे’चे अध्यक्ष डॉ. प्रेमचंद पातंजल यांनी ‘नागरी लिपी’ला ‘राष्ट्रीय संवादाची आधाररेषा’ म्हटले, तर परिषदेचे महामंत्री आणि ‘नागरी संवाद’ या द्वैभाषिक संपादक डॉ. हरिसिंह पाल यांनी परिषदेमागील उद्दिष्टे स्पष्ट करताना, ‘नागरी लिपी’ला केवळ लेखनपद्धती वा भाषिक साधन म्हणून न पाहता; ज्ञानपरंपरेचे पायाभूत व संरचनात्मक माध्यम म्हणून समजण्याचे आवाहन केले. कारण, लिपी ही केवळ ध्वनींचे दृश्यरूप नसून ती ज्ञानाचे वगकरण, साठवण आणि प्रसारण यांचे साधन असते.
विषयांची व्याप्ती : परंपरा, विविधता, एकात्मता आणि तंत्रज्ञान
परिषदेत चर्चिले गेलेले विषय लक्षवेधी होते. ‘राष्ट्रीय एकता में नागरी लिपि की भूमिका’ या सत्रात उभे राहिलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे होते. ‘राष्ट्रीय एकता’ यासंदर्भात मांडले गेलेले मुद्दे विशेष उल्लेखनीय होते. विविध भारतीय भाषांना समान अभिव्यक्तीचे व्यासपीठ ‘नागरी लिपी’ देऊ शकते का? भारतासारख्या बहुभाषिक देशात एकाच लिपीचा वापर संवाद-सुलभता वाढवू शकतो का? की, तो भाषिक वैविध्याला बाधा आणू शकतो? या प्रश्नांवर परिषदेतील चर्चांनी एक संतुलित दृष्टिकोन मांडला की, ‘नागरी लिपी’कडे ‘सर्वसाधारणीकरणाचे माध्यम’ म्हणून न पाहता, ‘परस्परसंवादाचे सुलभ माध्यम’ देणारी एक शक्ती किंवा सोय म्हणूनही पाहावे. या चर्चांमध्ये मतभेदही प्रकर्षाने दिसले. पण, तेच तर अकादमिक संवादाचे सौंदर्य! ‘नागरी लिपी’ ही ‘एक राष्ट्र, एक भाषा’ अशा मर्यादित चौकटीत बसवण्याऐवजी ‘अनेक भाषांचा संवाद मंच’ म्हणून पाहण्याची भूमिका अधिक ठळकपणे समोर आली.
‘राष्ट्रीय एकता में नागरी लिपि की भूमिका’, ‘भारतीय ज्ञानपरंपरा में नागरी लिपि का स्थान’, ‘सूचना प्रौद्योगिकी एवं नागरी लिपि’, ‘नागरी लिपि विमर्श’ इत्यादी विषयांमधून ‘नागरी लिपी’चा अभ्यास आंतरविद्याशाखीय म्हणजे ’interdisciplinary' पातळीवर करण्याचा प्रयत्न दिसून आला.
दुसरीकडे ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ या सत्रात ‘नागरी लिपी’चा ऐतिहासिक वापर आणि तिच्या माध्यमातून घडलेले ज्ञानसंवर्धन यांचा ऊहापोह झाला. ‘वेद’, ‘उपनिषदे’, भक्ती साहित्य, आधुनिक विज्ञानलेखन या सर्वांमध्ये ‘देवनागरी’ने लिपी म्हणून निभावलेली भूमिका अधोरेखित करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान आणि ‘नागरी’ : नवे आव्हान, नवी संधी
डिजिटलयुगात लिपीचा प्रश्न नव्या रूपात समोर येतो. ‘युनिकोड’ मानकीकरणामुळे ‘नागरी लिपी’ला जागतिक डिजिटल व्यासपीठ मिळाले असले, तरी तिच्या रचनात्मक गुंतागुंतीमुळे काही तांत्रिक अडचणीही निर्माण होतात. काना, मात्रा, वेलांट्या, उकार, संयुक्ताक्षरे, ओळीतील मांडणी या सर्वांचा संगणकीय प्रक्रियांवर परिणाम होतो. परिषदेत यासंदर्भात ‘मशीन ट्रान्सलेशन’, ‘स्पीच-टू-टेक्स्ट’, ‘ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन’ (OCR) यांसारख्या तंत्रज्ञानांवर चर्चा झाली. ‘नागरी लिपी’चा अभ्यास आता केवळ भाषाशास्त्रापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो संगणकीय भाषाविज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदाविज्ञान म्हणजे ‘डेटा सायन्स’ यांच्याशी घट्ट जोडला गेला आहे. त्यामुळे या क्षेत्रात संशोधनाची मोठी संधी उपलब्ध आहे.
वरील संदर्भात परिषदेत बोलताना प्रस्तुत लेखकाने ‘देवनागरी लिपी’चे प्रमाणीकरण करण्याचा पहिला प्रयत्न व उपक्रम महात्मा गांधींनी पुण्याचे तेव्हाचे प्रसिद्ध बळवंत दामोदर निजामपूरकर ऊर्फ ‘कित्तेवाले निजामपूरकर’ यांना वर्ध्याला सेवाग्राम आश्रमात बोलावून त्यांच्यामार्फत करवून घेतला होता आणि पहिले प्रमाणित अक्षरवळण (standard font) तयार केले होते, असे सांगून परिषदेने ‘देवनागरी’ची विविध अक्षरवळणेदेखील तयार करण्याच्या कामी पुढाकार घेतला, तर त्याचा उपयोग लिपीचे कित्येक सौंदर्यपूर्ण आविष्कार तयार होऊन मोठ्या प्रमाणात लोक ‘नागरी लिपी’चा वापर करण्यास उद्युक्त होतील, असे मत मांडले.
पुस्तक लोकार्पण आणि सन्मान : परंपरेचा गौरव
परिषदेच्या प्रारंभी विविध अभ्यासकांच्या पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले. हे केवळ औपचारिक नव्हते, तर नव्या अभिव्यक्तीला एक सशक्त व्यासपीठ देण्याचा प्रयत्न होता. गुवाहाटीच्या ‘कॉटन विद्यापीठा’च्या डॉ. नूरजहाँ रहमतुल्लाह यांना ‘विनोबा नागरी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. उद्घाटन सत्रात डॉ. नूरजहाँ यांनीच संस्कृतमधून दीपप्रज्वलन गीत सादर केले होते. तसेच संस्थात्मक पातळीवर ‘हिंदी साहित्य कला परिषदे’चाही सन्मान करण्यात आला. अंदमानातील तामिळ भाषक असलेल्या हिंदीच्या प्राध्यापिका डॉ. एन. लक्ष्मी प्रिया यांनी हिंदीत अनुवाद केलेल्या, मूळ बंगाली व नंतर इंग्रजीत आलेल्या ‘पश्चिम बंगाल की भाषाएं’ आणि ‘अंदमान एवं निकोबार की भाषाएं’ या ग्रंथांचेही याप्रसंगी अंदमानात लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने तिथल्या बहुभाषिकत्वाचेही दर्शन घडले.
या संमेलनामधून एक महत्त्वाचा संदेश अधोरेखित झाला, तो म्हणजे ‘नागरी लिपी’चा प्रसार हा कोणत्याही एका प्रदेशाचा विषय नसून, तो संपूर्ण देशाचा सामायिक सांस्कृतिक वारसा आहे आणि इतर भारतीय लिपींचे वैशिष्ट्य व ओळख कायम ठेवून भारतातील बहुभाषिक समाजाला एकमेकांशी अजून दृढ करणारा आहे.
अंदमान-निकोबार बेटांवर आज एक संवादी व स्नेहपूर्ण भाषिक बहुसांस्कृतिकता दिसून येते. इथे भाषिक झगडे वा कुरघोडी आजवर कधी झालेले नाहीत. याच ‘अंदमान पॅटर्न’चा उपयोग भविष्यात भारतीय मुख्य भूमीवरील बहुभाषिक महानगरांतदेखील होऊ शकेल का? हा संशोधनाचा विषय भाषाप्रेमी, लिपीप्रेमी, अभ्यासक, संशोधक आणि सरकारी भाषा संचालनालये, तसेच विविध साहित्य परिषदा वा महामंडळे यांनी जर हाती घेतला आणि सोबतच डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली, तर भाषिक प्रश्नांवरून होत असलेले महानगरांतील संघर्ष कमी होण्याच्या कामी मदत होऊ शकेल.
सेल्युलर जेल : इतिहासाच्या साक्षीने लिपीचा विचार
परिषदेतील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे, ‘सेल्युलर जेल’ येथे आयोजित ध्वनी-प्रकाश कार्यक्रम. स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य बलिदानांची साक्ष देणाऱ्या या ठिकाणी उभे राहून भाषा, लिपी आणि स्वातंत्र्य यांचे नाते नव्याने जाणवते. कारण, स्वदेशातील लिपी ही केवळ संवादाचे साधन नसते; ती स्मृती जपण्याचे, इतिहास नोंदवण्याचे आणि प्रतिकार व्यक्त करण्याचेही माध्यम असते.
सर्वभाषा कवी संमेलन : वैविध्यातील सर्जनशील ऐक्य
परिषदेच्या अखेरीस आयोजित ‘सर्वभाषा कवी संमेलन’ हे या संपूर्ण उपक्रमाचे सांस्कृतिक परिपूर्णत्व होते. हिंदी, मराठी, नेपाळी, कोकणी, तामिळ, तेलुगू अशा विविध भाषांतील कवी एकत्र आले. ‘नागरी लिपी’च्या छत्राखाली विविध भाषिक संवेदनांचा संगम घडला. हा केवळ काव्याचा कार्यक्रम नव्हता; तो भारतीय बहुभाषिकतेच्या जिवंत परंपरेचा उत्सव होता.
भविष्यातील आराखड्याकडे...
‘अखिल भारतीय नागरी लिपी परिषदे’ने हे स्पष्ट केले की, ‘देवनागरी लिपी’ ही कोणत्याही एका भाषेची मालकी नसून, ती भारतीय ज्ञानपरंपरेचा एक खुला दरवाजा आहे. तिच्या माध्यमातून संवाद, संशोधन, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना नवे आयाम मिळू शकतात.
आजच्या जागतिकीकरणाच्या आणि डिजिटल परिवर्तनाच्या युगात ‘देवनागरी लिपी’समोर आव्हाने जरूर आहेत; पण त्याहून अधिक संधीही आहेत. त्या संधींचा अभ्यासपूर्वक आणि समन्वित उपयोग करण्याची गरज आहे.
श्रीविजयपुरमसारख्या दूरस्थ सागरी टोकावर ‘नागरी लिपी’चे राष्ट्रीय संमेलन घडणे, हीच एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. हे भारताच्या सांस्कृतिक भूगोलाचे नवे रूप दाखवते. लिपी ही केवळ अक्षरांची मांडणी नसते; तर ती स्मृती, ज्ञान, इतिहास, तंत्रज्ञान आणि स्वओळख यांची गुंफणही असते, याचा पुनःप्रत्यय इथे आला.
महासागराच्या साक्षीने घुमलेली ही ‘नागरी वंदना’ आणि संमेलन हे केवळ एका परिषदेची आठवण न राहता, भारतीय भाषिक भविष्यासाठी एक विचारपूर्वक दिशा आणि भारताच्या एकात्मतेचा दुवा ठरावा, हीच अपेक्षा!
- संजय चांदेकर
(लेखक केंद्र सरकारच्या ‘भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था’ इथून निवृत्त झाले असून, ‘इंडोलॉजी’/भारतीय संस्कृती व भाषाशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
9420481413