Citylink Bus Service : सिटिलिंक बस सेवेच्या गैरव्यवस्थेविरोधात अभाविपरिषदेचे महापौरांना निवेदन

१५ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

    19-Apr-2026   
Total Views |
himgauri nashik mahanagarpalika mahapaur
 
मुंबई :(Citylink Bus Service) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नाशिक महानगर यांच्या वतीने शुक्रवारी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना सिटिलिंक बस सेवेतील गंभीर त्रुटींबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. शहरातील हजारो विद्यार्थ्यांना दररोज प्रवास करताना होत असलेल्या गैरसोयी व अन्यायकारक बसभाड्याच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ठोस भूमिका मांडण्यात आली.
 
अभाविपने विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की, नाशिकमधील सिटिलिंक बस सेवा(Citylink Bus Service) ही राज्यातील इतर महानगरांच्या तुलनेत अधिक महाग असून सुविधांच्या बाबतीत अत्यंत अपुरी आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
 
अभाविपने प्रशासनाकडे विविध मागण्या मांडत बस सेवेत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या वेळेत बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, सर्व बस वेळापत्रकानुसार धावाव्यात आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ‘स्टुडंट स्पेशल’ बस सेवा सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रमुख महाविद्यालयांच्या मार्गांवर थेट बस सेवा सुरू करावी, विद्यार्थ्यांसाठी बस भाड्यात सवलत द्यावी किंवा विशेष पास योजना लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक थांब्यावर बस थांबविणे बंधनकारक करावे आणि सर्व बसमध्ये QR कोडद्वारे ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात नमूद आहे.(Citylink Bus Service)
 
 
याशिवाय चालक आणि वाहक यांनी विद्यार्थ्यांशी नम्र वर्तन करावे, बस सेवा बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना द्यावी, तसेच विद्यार्थ्यांसाठी भाडे मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अभाविपच्या मते, कमी अंतरासाठी १० रुपये आणि जास्त अंतरासाठी २० रुपयांपेक्षा अधिक भाडे आकारू नये. विद्यार्थ्यांसाठी मासिक पास दरही ठरविण्याची मागणी करण्यात आली असून, दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये, इयत्ता ११वी-१२वीसाठी ३०० रुपये आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये इतका दर असावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
 
प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे यांनी सांगितले की, “परिवहन सेवा ही नफा कमावण्याचे साधन नसून ती एक मूलभूत नागरी सुविधा आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या या समस्या प्रशासनाने गांभीर्याने घेऊन १५ दिवसात सोडवाव्यात. अन्यथा, अभाविप विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन करेल.” यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे, विभाग संघटन मंत्री डॉ.गोविंद देशपांडे, महानगर टीएसवीके संयोजक देवेंद्र देशमुख, कॉलेज रोड नगर सहमंत्री मृणाल देव, गंगापूर रोड नगर मंत्री अक्षय गुंजाळ, आडगाव म्हसरूळ नगरमंत्री कुणाल कोरे, सिडको नगर मंत्री वरुण माळी, सहमंत्री वज्रेश शुक्ला व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.(Citylink Bus Service)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक