Chandrashekhar Bawankule : परतवाडा प्रकरणात पीडित मुली आणि नागरिकांनी समोर यावे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

सर्व बाजूंनी तपास सुरु

    19-Apr-2026   
Total Views |
chandrakant bawankule paratwada case
 
अमरावती : (Chandrashekhar Bawankule) परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी अमरावती भागात असलेल्या पीडित मुलींनी आरोपींविरोधात साक्ष देण्यासाठी पुढे यावे. त्यांचे नाव पुढे येणार नाही, याची सरकार काळजी घेईल. नागरिकांकडे काही पुरावे असल्यास त्यांनी एसआयटीला द्यावे, असे आवाहन महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले.
 
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा परिसरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेत सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "परतवाडा प्रकरणाची पूर्ण माहिती जाणून घेतली असून यात एकूण ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, ७ मोबाईल, एक लॅपटॉप, हार्डडिस्क आणि टॅब ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण उपकरणे फॉरेन्सिक तपासणीकरिता पाठवली आहेत. लवकरच फॉरेन्सिक रिपोर्ट येणार असून त्यात अधिक माहिती मिळेल."
 
हेही वाचा :  Hindu Janajagruti Samiti : पुण्यात हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन; 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणी सखोल चौकशीची मागणी
 
"आज नागपूरमधून एक १५ वर्षीय पीडितेचा तपास सुरु असून त्यांची साक्ष नोंदवली जात आहे. मोबाईलवर व्हायरल झालेल्या या प्रकरणानंतर पोलिसांनी स्वत:हून दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. यात कुणीही स्वत: गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस स्थानकात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी याची खबरदारी घेत वेबसाईट्स किंवा समाज माध्यमांवर प्रसारित झालेले व्हिडीओ थांबवण्याचे काम केले. या प्रकरणाची एसआयटीमार्फत योग्य दिशेने चौकशी सुरु आहे. याबाबतचा संपूर्ण आढावा पोलिसांनी मला दिला. या घटनेत कुणीही सुटणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. देशभरात जिथे जिथे आरोपी असतील तिथून त्यांचा शोध लावण्यात येईल. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून सर्व बाजूंनी तपास सुरु आहे," असेही त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
 
पोलिसांचे वक्तव्य अधिकृत समजावे
 
या घटनेवरून सुरु असलेल्या राजकीय नेत्यांच्या वादावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "खा. अनिल बोंडे, नवनीत राणा किंवा प्यारे खान यांनी बोलताना समाजात तणाव निर्माण होईल, असे वक्तव्य न करता त्यांच्याकडे असलेले पुरावे पोलिसांना द्यावे. या संवेदनशील प्रकरणात राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांवर न जाता पोलिसांनी केलेले वक्तव्य अधिकृत समजावे."(Chandrashekhar Bawankule)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....