विश्वमोहनवीणा

    19-Apr-2026
Total Views |

आशाताईंना ‌‘विश्वमोहनवीणा‌’ हे विशेषण शोभून दिसते. केवळ मराठीच नव्हे, तर समस्त भारतीयांच्या मनात गेली सात दशकं ही वीणा झंकारत आहे. त्यांनी गायलेली सर्व शैलींमधली अनेकदा अशक्य कोटीतली वाटणारी विविध संगीतकारांनी सजवलेली गाणी हा कधीही न संपणारा खजिना आहे. त्यांना वाहिलेली ही स्वरसुमनांजली...

आशा भोसले नावाचं स्वरचैतन्य हरपलं... ‌‘जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च|‌’ हे गीतावचन आयुष्याची मर्यादा समजावून देतं, हे मान्य. पण, तरीही लतादीदी, आशाताई ही अशी व्यक्तिमत्त्वं की, त्यांच्या पुढे ‌‘होत्या‌’ हा शब्द वापरताना कायम अवघड जाणार आहे. लतादीदी आपल्यातून निघून गेल्याला तीन वर्षे होऊन गेली. तरीही, ‌‘प्रभुकुंज‌’वरून जाताना नजर त्यांच्या खोलीकडे वळतेच. किंबहुना, अलीकडे आशाताई लोअर परळच्या आपल्या ‌‘कॅसा ग्रॅण्ड‌’ या आलिशान इमारतीत राहात होत्या. तरीही, ‌‘प्रभुकुंज‌’ आलं की, लता आणि आशा या दोन्ही दैवतांना मनोमन हात जोडायचे, ही अनेक वर्षांची सवय होती. चैतन्याने रसरसलेली बाग उजाड व्हावी, तसं झालंय. आता ‌‘लता‌’ नावाची ‌‘सरस्वती‌’ नाही आणि व. पु. म्हणतात तशी ‌‘आशा‌’ नावाची ‌‘सरस्वतीची वीणा‌’ही नाही. अगदी अलीकडच्या कार्यक्रमात त्यांनी आपण चित्रपट संगीतक्षेत्रातली ‌‘लास्ट एम्परर-अखेरची सम्राज्ञी‌’ असल्याची आठवण रसिकांना करून दिली. त्यावेळी त्यांचं वावरणं असं होतं की, त्यांनीच गायलेलं गाणं साकार होऊन रसिकांसमोर उभं राहिलं.

अम्बर की इक पाक सुराही|
बादल का इक जाम उठाकर|
घूँट चाँदनी पी हे मैंने|
बात कुफ्रकी की है मैंने॥
(कुफ्र-बंडखोरी)

केवळ गायनातच नव्हे, तर आयुष्य पेलतानाही त्यांनी बंडखोरी केली. आपल्या हृदयाचा आवाज ऐकणाऱ्या आशाताई त्यांच्या याच ‌‘तजल्ली‌’च्या बळावर नक्की शंभरी गाठणार, असा रसिकांना विश्वास होता. म्हणूनच, अधिक धक्का बसला. त्याच कार्यक्रमात त्या जे म्हणाल्या, त्याचा हा मराठी स्वैर अनुवाद करते. त्या म्हणाल्या, “हृदयातल्या स्वरांतून मी माझी गाणी गुंफते. माझं नावच आशा आणि आशा चिरंतन असते. मग मी एवढ्यात थांबणं अशक्य आहे. स्वरांवर प्रेम, गाण्यांवर प्रेम, आयुष्यावर प्रेम, जीव लावणं ही माझी जीवन जगण्याची ऊम आहे. कठीण काळात संगीतानेच मला आधार दिला. प्रत्येक गोष्ट मनःपूर्वक केलीत की, पश्चात्ताप कशाचा? गाण्यात चैतन्य आणणं, सूरांशी एकनिष्ठ राहणं, मंचावर चालत, बोलत, नाचत रसिकांना रिझवणं हेच मला आवडतं.”

आशाताईंना ‌‘विश्वमोहनवीणा‌’ हे विशेषण शोभून दिसते. केवळ मराठीच नव्हे, तर समस्त भारतीयांच्या मनात गेली सात दशकं ही वीणा झंकारत आहे. त्यांनी गायलेली सर्व शैलींमधली अनेकदा अशक्य कोटीतली वाटणारी विविध संगीतकारांनी सजवलेली गाणी हा कधीही न संपणारा खजिना आहे. वयाच्या नव्वदीतही आपलं श्रेष्ठत्व विजिगीषू वृत्ती, अदम्य उत्साह आाणि स्वरांचा डौल टिकवणारी ही गायिका म्हणजे विधात्याचा चमत्कारच होता. (पुन्हा मन कचरलं. ‌‘होता‌’ असं लिहिवेना...) वसंतात फुललेल्या मोगऱ्यासारखा गोड दळदार सूर, हवेच्या स्वच्छंदी झुळकीसारखा मातीला स्पर्श करून क्षणात आभाळाला भिडणारा! ‌‘तरुण आहे रात्र अजुनी‌’मधली ‌‘बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा‌’ यातली अफाट तानेतली चपळ वीज, ‌‘पूर्व दिशेला अरुणरथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर‌’ या गाण्यातली हरएक तान, हरकत जणू ‌‘सप्त सूरांनी उजळे अंबर‌’ असा अद्भुत अनुभव प्रत्येक श्रवणात येणारा, ‌‘आगे भी जाने न तू‌’ या गाण्यातला क्षणवाद-इहवाद, ‌‘पिया तू अब तो आजा‌’मधला श्वासाचा खेळ आणि ‌‘आ...आ...आजा‌’चं अशक्य आवाहन, ‌‘आइये मेहरबाँ‌’ किंवा ‌‘ये हैं रेशमी जुल्फों का अंधेरा‌’मधला नखरा आणि नशिली अदा, ‌‘दिल चीज क्या हैं‌’मधली खानदानी नजाकत, ‌‘छोड दो आँचल‌’, ‌‘हाल कैसा हैं जनाब‌’ यांसारख्या गाण्यांतला लोभस अवखळपणा, ‌‘ये रात ये मौसम‌’मधला चांदणझूला, ‌‘अबके बरस भेजो भैयाको बाबुल‌’मधली अति विनवणी, ‌‘दम मारो दम‌’मधली बेफिक्र बंडखोरी, ‌‘भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले‌’ यातलं अपार सोसलेपण, ‌‘ऋतु हिरवा‌’मधला सासूरवाशीण पहिलटकरणीची उळघाळ, बावरलेपण आणि एकलेपणा, ‌‘गेले द्यायचे राहून‌’मधलं शब्दशब्दांतून जाणवणारं कवीचं अति दुःख, ‌‘फिरूनी नवी जन्मेन मी‌’मधल्या स्वप्नील आशावादाच्या हिरव्या खुणा, ‌‘पांडुरंग कांती‌’मधला खोळबुंथी पांघरून भक्तीचा खेळ खेळणारा गोपाळ, ‌‘पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे‌’ ऐकताना जगण्याचं उदास ओझं वाहून श्रमलेला सूर, ‌‘झिणीझिणी वाजे बीन‌’ तशी आशाताईंच्या गाण्यातली ‌‘अनुदिन चीज नवीन‌’... किती गाणी आठवावीत! जीवनाचे सारे रंग आपल्या स्वराभिनयातून जिवंत करताना आशाताई अलख निरंजन वाजविणाऱ्या जगन्नियंत्यासारख्या सहजपणात प्रवीण वाटतात. मी त्यांना प्रथम प्रत्यक्ष पाहिलं, तेव्हा त्यांनीच गायलेलं गाणं ओठांवर आलं-

चांदणे शिंपीत जाशी चालतां तू चंचले|
ओंजळीं उधळीत मोतीं हासरी ताराफुलें॥

शाळकरी वयात, अल्प समजेच्या काळात या गाण्यातून मला एक निळावंती भेटली होती. पायात मंजीर (पैंजण) ल्यायलेली, आकाशगंगेला करीची मेखला करणारी, ताराफुलं मोत्यासारखी उधळणारी! त्यावेळी राजा बढे, हंसध्वनी, हृदयनाथ मंगेशकर वगैरे अप्रुपाचे विषय नव्हते. पण, गायिकेच्या आवाजातील तेजाने मला पुरतं ताब्यात घेतलं होतं. आजही ते अंकितपण तसंच आहे.

पार्ले टिळक विद्यालयाच्या पटांगणावर उभारलेल्या सुसज्ज मंचावर ‌‘आशा भोसले संगीत संध्ये‌’च्या निमित्ताने त्यांची-माझी प्रत्यक्ष भेट होणार होती. कुणीतरी म्हणालं, “आशाताई आल्या हं!” आळसावलेल्या मंचावर एकदम चैतन्य शिंपडल्यागत झालं. पण, त्या दिसेनात. एवढ्यात आलेल्या मंद सुगंधाने, “मी म्हणे गोपाळ आला गे माऽऽऽये”चा संदेश दिला. पाठोपाठ रेशमी वस्त्राची सळसळ झाली आणि त्या दिसल्या. ‌‘प्रसन्नवदने सुवासिनी कुणी‌’ या त्यांनीच गायलेल्या भूपाळीतून थेट अवतराव्या तशा! हिऱ्यांच्या लखलखत्या कुंड्या, खरंखुरं वाटणारं खोटं फूल, केसाचं मंगेशकरी दाट वळण आणि चेहऱ्यावर ‌‘चांदण शिंपीत‌’ जाणारं चंचलेच हसू!

हातात लिस्ट नाही, गाण्याचा क्रम ठावूक नाही, कार्यक्रमात असलेली उत्फुल्लतेची अपेक्षा, मग बालपणापासून परिचयाच्या असलेल्या ‌‘आशा‌’नामक ग्रंथाला मनोमन आवाहन केलं आणि छोट्याशा खिडकीतून भलं थोरलं आभाळ दिसावं, तसं झालं. “मी गाऊन जिथून सोडीन, तिथून तुम्ही संवादाचा धागा पकडायचा,” हा निवेदनातला पहिला धडा त्यांच्या या वाक्यातून मी शिकले. पुढे 1993 साठी ‌‘स्वरमाला‌’ या दिवाळी अंकासाठी या स्वरऐश्वर्येची विस्तृत मुलाखत घेण्याची संधी मिळाली. निमित्त होतं, त्यांच्या षष्ट्यब्दीपूतचं. सोबत ‌‘चंद्रलेखा‌’चे मोहन वाघ होते. ते आशाताईंचे खास फोटो काढणार होते. मग काय, गप्पांच्या फुल-टू मूडमध्ये असलेल्या आशाताईंनी आपला जीवनपट, संघर्ष अगदी प्रांजळपणे समोर ठेवला. तेव्हा नको तेवढं बोलणारी समाजमाध्यमं अस्तित्वात नव्हती. मुलाखत घेताना त्यांचा स्पष्टवक्ता आणि तितकाच हळवा स्वभाव, दिलखुलास जीवनवृत्ती, सौंदर्यासक्ती, वाटेत येणाऱ्या संकटांचा बाऊ न करता त्यांच्याशी निर्धाराने दोन हात करण्याची विजिगीषू वृत्ती, पदोपदी डोकावणारी त्यांच्यातली आई, सुगृहिणी या साऱ्यांचा निखळ अनुभव घेऊन, मी त्यादिवशी ‌‘प्रभुकुंज‌’मधून बाहेर पडले होते. त्या कालावधीत मोहन वाघ यांनी त्यांचे अप्रतिम फोटोही काढले. तेव्हा वाटत राहिलं की, ‌‘आशा भोसले‌’ नावाच्या उत्फुल्ल खळखळत्या झऱ्याला मर्यादा घालणारे काठच नाहीत. त्यावेळच्या साठीच्या गझलात कविवर्य सुरेश भट लिहिते झाले,

हा कंठ तुझा अलबेला|
हा रंग तुझा मतवाला|
तलवार तुझ्या गीतांची
बिजली सम तळपत राहो॥

नव्वदीतही हा सूर अलबेला राहिला. चैतन्य अबाधित राहिलं. संपूर्ण पूर्वतयारीनिशी सांभाळली जाणारी उत्स्फूर्तता हा त्यांच्या मंचीय कार्यक्रमांचा आत्मा असतो, याचं भान त्यांच्यासोबत केलेल्या काही कार्यक्रमांनी मला दिलं, हे माझं भाग्य! कलावंत जीवनाला कडकडून भेटलं पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक क्षणाशी त्याची गळामिठी जितकी उत्कट, तितकी त्याची कला अधिक चैतन्यदायी, रसरशीत, अधिक उत्कट. आशाताईंच्या लोभस, धारदार अक्षत आवाजाने व प्रत्येक गीतातल्या अप्रतिम स्वराभिनयाने त्यांनी गायलेलं प्रत्येक गीत श्रेष्ठ ठरलं.

त्यांचं एक विधान फार महत्त्वाचं आहे, “परकाया प्रवेश हा पार्श्वगायनातला महत्त्वाचा गुण आहे. त्या-त्या गाण्याच्या मागणीनुसार, संगीतकाराच्या अपेक्षेनुसार आणि चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या स्वभावधर्मानुसार मी माझ्या आवाजाचा पोत आणि स्वरातली ‌‘कहन‌’ पेश करत गेले. स्वतःला बदलत गेले. सतत परजत राहिले. म्हणूनच, हे शक्य झालं. गाण्यासाबत अभिनयाचा वारसा मला वडिलांकडून मिळाला. अवखळ तारुण्यातलं मुसमुसतं गाणं गाताना मीही 16 वर्षांच्या मुलींसारखी अल्लड झाले. अशीच गाणी माझ्या वाट्याला अधिक आली. म्हणून तर ‌‘आपलं वय झालं,‌’ ही भावनाच मनाला शिवली नाही.” त्यामुळेच तर हंसराज बहल यांच्या ‌‘चुनरिया‌’ या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांच्या हिंदी गीतांचा प्रवास ‌‘तोरा मन दर्पण‌’ ते ‌‘खल्लास‌’, ‌‘तनहा तनहा‌’, ‌‘राधा कैसे न जले‌’ असा विविधरंगी बनला. मराठी भावचित्र गीतांची विशेषतः गदिमा, बाबूजी यांनी निर्माण केलेल्या गीतांच्या सुवर्णदालनाची त्या सदैव अनभिषिक्त सम्राज्ञी बनून राहिल्या आणि राहतील. अगदी राहवत नाही, दोन स्वरशिल्पांची आठवण करून देते. ‌‘जिवलगा कधी रे येशील तू‌’ या ‌‘सुवासिनी‌’ चित्रपटातल्या ‌‘वसंत‌’, ‌‘मल्हार‌’, ‌‘सोहनी‌’, ‌‘यमन‌’, ‌‘केदार‌’ या रागांची अजोड गुंफण करणाऱ्या गीताचं अमोघ लावण्य, ‌‘आज कुणीतरी यावे‌’मधलं विचारल्याविणं हेतू कळविणारं ‌‘मल्हारा‌’चं मनस्वीपण अशी किती उदाहरणं द्यावीत? मानवी भावनांचे एक चढ, एक रंग आपल्या जीवनात त्यांनी उधळले. इतके की, त्या रंगांच्या वैविध्याने ‌‘श्रवणाचे नेत्र‌’ दिपून जावेत.

इथेच त्यांच्या लावण्य गीतांचा परामर्श घ्यायला हवा. वसंत पवार, राम कदम, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, बाळ पळसुळे, आनंद मोडक अशा श्रेष्ठ संगीतकारांकडे ‌‘आशा भोसले‌’ हा आवाज होता, म्हणून लावणीचा ‌‘रंगमहाल‌’ उभा राहिला. ‌‘बुगडी माझी‌’मधली ‌‘हाय...‌’ची अदाकारी, (सांगत्ये ऐका - वसंत पवार, राम कदम), ‌‘कुणीतरी बोलवा दाजीबाला‌’ (देवमाणूस - गदिमा बाबूजी) मधला अवखळ धीटपणा, ‌‘बाई मी पतंग उडवीत होते‌’ (लाखात अशी देखणी - गदिमा बाबूजी)मधला जीवघेणा पतंग, ‌‘नाचू किती नाचू किती कंबर लचकली‌’ (सं. राम कदम), ‌‘तुम्ही माझे बाजीराव‌’ (वसंत पवार), ‌‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला‌’ (सं. बाळ पळसुले), ‌‘रेशमाच्या रेघांनी‌’ (शांता शेळके-आनंदघन), ‌‘नको मारूस हाक‌’ (गदिमा-दत्ता डावजेकर)‌’, ‌‘लाल पैठणी रंग माझ्या चोळीला‌’ (ना. धों. महानोर-आनंद मोडक) अशा अनंत लावण्या आशाताईंनी आपल्या स्वरातली अपूर्व ठसक्याने, नखऱ्याने, दिमाखाने, नजाकतीने गहिऱ्या रंगात रंगविल्या आहेत. या रूपगर्वितेचा तोरा रसिक कधीही विसरू शकणार नाहीत.

आशाताईंना आदरांजली वाहताना ओ. पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन या त्यांच्या जीवनात आलेल्या जादूगार प्रतिभावंतांचा उल्लेख हवाच. गायिका म्हणून त्यांच्यातल्या अष्टपैलुत्वाची, स्वरतेजाची व लवचिकतेची प्रथम जाणीव करून दिली, ती ओ. पी. नय्यर यांनी. ‌‘क्लबसॉग्ज‌’, ‌‘कॅबरे‌’, टांगा ऱ्हिदमवाली देहाती गीतं, पाश्चात्य संगीताधारित गीतं - ‌‘छम छमा छम‌’ चित्रपटापासून सुरू झालेल्या आशा-नय्यर युगात आशाताईंचा आवाज नय्यरसाहेबांच्या संगीताचं प्राणतत्त्व ठरला. चटकदार, नटखट, लयदार, तालानुरागी, नृत्यानुकूल आणि धीट स्वराभिनयाची मागणी करणाऱ्या प्रत्येक गीताला आशाताईंनी न्याय दिला. पुरेपूर! ‌‘सीआयडी‌’, ‌‘नया दौर‌’, ‌‘काश्मीर की कली‌’, ‌‘किस्मत‌’, ‌‘मेरे सनम‌’ अशा अनेक चित्रपटातील आशा-ओपी युगातली गाणी म्हणजे ‌‘विशुद्ध रोमॅण्टिसिझम!‌’

आर. डी. बर्मन यांनी विविध संगीत प्रकारातल्या नादाकृती, तालाकृती, जगभरातील तालवाद्यं, निसर्गातले विविध ध्वनी यांचा प्रयोगशीलतेने आपल्या संगीतात वापर केला आणि अशक्यप्राय अशा या प्रयोगात त्यांच्याकडे चमत्कार होता, आशाताईंचा जादुई गळा. एकच आवाज वेगवेगळ्या पट्टीत कसा वापरावा, श्वासोच्छ्वासातून मादकता, शृंगार कसा जागवायचा, ऱ्हिदम सुरू असताना संवादफेक कशी करायची, स्वरातील बारकावे कसे वापरायचे, असे अनेक प्रयोग त्यांनी केले आणि विश्वसंगीतातही अजूबा वाटावा, अशी अद्भुत ‌‘आशाशैली‌’ निर्माण झाली, जिला काहीही अशक्य नव्हतं. जॅझ, पॉप, रॉक, बोसानोव्हा, सोप्रानो, अरेबियन आणि सोबत शास्त्रीय, उपशास्त्रीय भारतीय लोकसंगीत; सारेच संगीतप्रकार त्यांच्या गळ्याने सहजी पेलले. 1980च्या सुमारास खय्यामसाहेबांनी ‌‘उमराव जान‌’ चित्रपटासाठी अर्धा सूर खाली ठेवून त्यांच्यातील नव्या मितीची, अभिजाततेची यथार्थ जाणीव त्यांना करून दिली, तर ए. आर. रेहमानच्या ‌‘तनहा तनहा...‌’सारख्या चालींनी तारुण्याची बेभान जादू संपूर्ण दशकावर पसरली. मा. दीनानाथांची उग्रमंगल, तेजमधुर गायकी पेलणारा गळा आशाताईंचाच. ब्रिटिश पॉप गायक बॉय जॉर्ज, गुलाम अलींसोबत ‌‘मेराज-ए-गझल‌’ हा अल्बम, उस्ताद अली अकबर खाँ यांनी तानसेन यांच्या पारंपरिक बंदिशी सरोदवादन आणि आशाताईंचं गायन या मिलाफातून बनलेला ‌‘लेगसी‌’ हा अल्बम ही फक्त काही उदाहरणं आहेत. नवे प्रवाह, नवे गीतकार, नवे संगीतकार, गायक, वादक, नवे ट्रेण्ड्‌‍स, नव्या संगीतशैली यांच्याशी नित्य नवं नातं निर्माण करत त्या पुढेच जात राहिल्या. म्हणून त्या ‌‘आजच्या‌’ आणि ‌‘आपल्या‌’ वाटल्या. बाळासाहेब मंगेशकर त्यांना ‌‘चौखन्नी गायिका‌’ म्हणाले. गुलजार म्हणतात, धून आणि शब्द यांच्या इतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‌‘अंदाज-ए-बयाँ.‌’ आशाजींचा ‌‘अंदाज-ए-बयाँ‌’ केवळ अपूर्व! लतादीदी म्हणजे युगधर्माचा स्वर! त्या स्वगय स्वरातून परमात्मतत्त्वाशी एकरूप व्हावं; तर आशाताई आयुष्याच्या उद्यानांमधून, जंगलामधून, पायवाटांमधून आणि अनेकदा फुलपाखराच्या पंखावर बसून रंगरंगिली दुनिया दाखवतात. हे जीवन सुंदर आहे, हा साक्षात्कार घडवतात. बघितलंत, पुन्हा वर्तमानात बोलू लागले. आशाताई म्हणजे भारतीय भावसंगीतातली गोड श्रृंखला. त्यांच्या गीतांनी आपल्याला जणू बांधून ठेवलंय. कायमचं. म्हणूनच, त्यांना निरोप देताना साश्रू नयनांनी रसिक म्हणत होते, ‌‘अभी न जाओ छोडकर कि दिल अभी भरा नहीं‌’ आणि वास्तव समजूत घालत होतं, ‌‘ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे!‌’ अलविदा आशाताई - वंदन!

- मंगला खाडिलकर