जगातील सुमारे 90 टक्के व्यापार आजही समुद्रमार्गे होतो आणि त्या प्रवाहाला चालना देणारी भव्य जहाजे तयार करण्याचे काम जगभरात अत्यंत कुशलतेने केले जाते. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वांत मोठ्या जहाजबांधणी यार्डची माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते. दक्षिण कोरियातील उल्सान शहरात वसलेले ‘ह्युंदाई हेवी इंडस्ट्री’ हे केवळ एक औद्योगिक केंद्र नाही, तर आधुनिक जहाजबांधणीच्या क्षमतेचे उल्लेखनीय उदाहरण ठरते. जागतिक समुद्री व्यापाराच्या नव्या पर्वाची सुरुवात हरित तंत्रज्ञानातून होत असताना, ‘ह्युंदाई हेवी इंडस्ट्री’ने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आपल्या विशाल शिपयार्डमध्ये कंपनीने जगातील पहिले अमोनिया-चलित जहाज तयार करून त्याचा नामकरण समारंभ नुकताच पार पडला. पारंपरिक जहाजबांधणी कौशल्य आणि अत्याधुनिक पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यांचा संगम साधत कंपनीने समुद्री उद्योगाला नवी दिशा दिली आहे.
बेल्जियममधील शहरांवरून ‘अँटवर्पेन’ आणि ‘अर्लोन’ ही या दोन जहाजांची नावे. ही जहाजे 46 हजार घनमीटर क्षमतेची, मध्यम आकाराची गॅस वाहतूक करणारी जहाजे असून, ती बेल्जियमसाठी तयार करण्यात आली आहेत. प्रत्येकी 190 मीटर लांबी, 30.4 मीटर रुंदी आणि 18.8 मीटर उंची असलेली ही जहाजे आकाराने भव्य आणि तंत्रज्ञानाने अत्याधुनिक आहेत. यांसह विविध शाश्वत उपाययोजना आणि नियंत्रण सुविधांमुळे ही जहाजे केवळ आधुनिकच नाहीत, तर पर्यावरणपूरक आणि अत्यंत सुरक्षितही ठरतात. ‘उल्सान’ हा जहाजबांधणी तळ पृथ्वीवरील सर्वात मोठे ‘शिपयार्ड’ म्हणून ओळखला जातो. हा विशाल प्रकल्प समुद्रावरील जागतिक व्यापाराचा अदृश्य; पण अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. येथे उभ्या असलेल्या विशाल क्रेन्स, दूरवर पसरलेले ‘ड्राय डॉक्स’ आणि हजारो कामगारांच्या समन्वयातून उभे राहणारे महाकाय जहाज, हे सर्व पाहताना मानवी कल्पकतेची व्याप्ती किती मोठी असू शकते, याची जाणीव होते. ‘एचएचआय’ अत्यंत कुशलतेने ही कामगिरी पार पाडते आहे. 2014 मध्ये जगातील सर्वांत मोठ्या कंटेनर जहाजांपैकी एक ग्लोब याच ठिकाणी बांधले गेले होते. 2014 मध्ये वितरणाच्या वेळी हे जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज होते, ज्याची क्षमता 19 हजार, 100 ‘टीईयू’पेक्षा जास्त होती.
आशिया-युरोप मार्गावर कार्यक्षमतेसाठी ते विशेषतः डिझाईन करण्यात आले होते. या महाकाय जहाजनिर्मितीमुळे ‘एचएचआय’ची जागतिक स्तरावरील क्षमता अधोरेखित झाली. मात्र, या यशामागे केवळ आकाराची भव्यता नाही, तर सातत्याने होत असलेली तांत्रिक प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे. या ‘शिपयार्ड’मध्ये पारंपरिक जहाजबांधणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम दिसून येतो. एका बाजूला अजूनही हजारो टन स्टीलच्या प्लेट्स अचूकपणे बसवण्याचे काम अनुभवी तंत्रज्ञ करत असतात, तर दुसऱ्या बाजूला ‘रोबोटिक्स’ आणि ‘ऑटोमेशन’ने या प्रक्रियेला वेग आणि अचूकता दिली आहे.
विशेषतः वेल्डिंगसारख्या सूक्ष्म आणि जोखमीच्या कामांमध्ये रोबोट्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे मानवी चुका कमी होतात, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षिततेचे मानकही उंचावते. या प्रकल्पातील संशोधन आणि विकास विभागात सतत नवकल्पनांचा शोध सुरू असतो. जहाजाच्या ‘प्रोपेलर’पासून ते इंधन कार्यक्षमतेपर्यंत प्रत्येक घटक अधिक कार्यक्षम कसा होईल, यावर संशोधन केले जाते. अनेक सूक्ष्म बदलांमुळे इंधनाची बचत होते, जहाजाची कार्यक्षमता वाढते आणि पर्यावरणीय परिणामही कमी होतो.
अमोनियासारख्या कार्बनमुक्त इंधनावर चालणाऱ्या जहाजांची निर्मिती, उत्सर्जन कमी करणाऱ्या प्रणालींचा वापर आणि ऊर्जा कार्यक्षम डिझाईन या सर्वांमधून कंपनीने भविष्यातील जहाजबांधणीची दिशा निश्चित केली आहे. ही केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर जागतिक हवामानबदलाच्या समस्येला दिलेले उत्तरही आहे. आज जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केवळ भव्यता पुरेशी नाही, तर सातत्याने नवकल्पना साकारणे आवश्यक आहे. संशोधनातून पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, त्याने जहाजबांधणीच्या क्षेत्रात एक नवा मापदंड निर्माण केला जात आहे. भविष्यातील समुद्री व्यापार अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दिशेने ‘ह्युंदाई’चे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.