वर्तमानाचे रंगसेतू

    18-Apr-2026   
Total Views |

मुंबईच्या जहांगीर कलादालन येथे 'To be Continued...' या विशेष चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 7 या कालावधीमध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. परंपरा आणि प्रयोगशीलता यांच्या संगमातून साकारलेल्या या प्रदर्शनामध्ये प्रस्थापित कलाकारांच्या कलाकृती उपलब्ध आहेतच; मात्र आपल्या भोवतालावर भाष्य करू पाहणाऱ्या नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतीसुद्धा इथे पाहायला मिळतात. 55 चित्रे आणि 15 शिल्पकृती यांच्या संयोगातून असा हा अभिव्यक्तीचा सर्वस्पश जागर... कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी तर आहेच, मात्र त्याचबरोबर कलेतील अस्सलतेचा शोध घेणाऱ्या रसिकांनीदेखील हे कलासंचित चुकवू नये, असेच...

माणसाच्या जीवनाला परिपूर्ण करणारा घटक म्हणजे कला. कुठलीही कला असो, त्यातील कार्यकौशल्य कितीही छोटं किंवा मोठं असो, त्याची पूर्तता करीत असताना कर्त्याच्या मनामध्ये जे समाधान उमलते, त्याची तुलना इतर कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. कुठलीही कला जितकी माणसाच्या अंतरंगाला जगासमोर प्रकट करणारी असते, तितकीच वर्तमानाकडे बघण्यासाठी नवी दृष्टी देणारीसुद्धा असते. प्रत्येक कलाकृती येन-केन-प्रकारेण आपल्या भोवतालावर भाष्य करते. त्याचबरोबर ती कलाकृती इतिहासाकडे बघण्याची आणि भविष्य घडवण्याची दृष्टी आपल्याला सातत्याने देत असते. ‌‘जहांगीर आर्ट गॅलरी‌’ येथे ‌‘टैला आर्ट गॅलरी‌’द्वारे साकारण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचे नाव आहे, ‌‘To be Continued...‌’ कला जर प्रवाही असेल, तरच ती जिवंत राहते, जनमानसांत टिकून राहते. नेमका हाच जिवंतपणा आपण इथे अनुभवतो.

सभोवताली भिंतीवरील चित्रं सर्वप्रथम आपल्याला आर्कषून घेतात. अंतरा श्रीवास्तव यांच्या अमूर्त शैलीतील चित्रांमधून संत कबीरांची वाणी हळूहळू उलगडत जाते. त्यांच्या चित्रांमध्ये कबीरासोबतच अवतरणारे डोळे म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीचे प्रतीक आहे. आपल्या अंतरंगातून भगवंताच्या जवळ गेलेल्या माणसाला ही अलौकिक दृष्टी प्राप्त होते, याचीच या चित्रामधून आपल्याला प्रचिती येते. प्रख्यात चित्रकार नीरज शर्मा आपल्या चित्रांच्या माध्यमातून लोकसंगीत, वाद्य आणि स्त्री-पुरुष एकत्वाचा विचार मांडतात. प्रेमाचा हाच धागा पुढे करत, आपल्या भेटीला येतात श्रीकृष्ण आणि राधा. सुसांत सरकार यांनी आपल्या कुंचल्यातून एकमेकांच्या भावविश्वात पूर्णपणे स्वतःला ज्यांनी पूर्णपणे सामावून घेतले आहे, असे श्रीकृष्ण आणि राधा तयार केले आहेत. एकीकडे ही भव्य चित्रं असताना दुसऱ्या बाजूला अमिता गोस्वामी आपल्या चित्रांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींवर भाष्य करतात.

मुंबईच्या दीपिका शाह यांनी ‌‘थ्रीडी कॅनव्हास‌’चा केलेला अभिनव प्रयोग, तर डोळ्यांचे पारणं फेडणारा आहे. सीतापूर बीचसमोर पसरलेला अथांग समुद्र आणि वर आकाशात पसरलेला निळा रंग यांच्या संगमातून एक वेगळेच विश्व त्यांनी आपल्या कॅनव्हासवर साकारल्याचे आपल्याला बघायला मिळते. डॉ. मायरा सुमन यांची ‌‘द फ्लाय‌’ ही चित्रसंपदा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या चित्रांमध्ये सजीवसृष्टीमध्ये वावरणाऱ्या एका माशीची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. या चित्रांमध्ये नेमकं आहे तरी काय? काही माकडं, श्वान, एका माशीकडे बघत आहेत. बघणाऱ्याला वाटत राहतं की, या चित्रांचा केंद्रबिंदू म्हणजे हे प्राणीविश्व; केवळ तोवर, जोवर आपलं लक्ष्य त्या माशीकडे जात नाही! एकदा का आपण त्या माशीला बघितलं की चित्राचा आशय आपल्या लक्षात येतो.

चित्रांबरोबरच, शिल्पकलेचे बहारदार नमुने आपल्याला इथे बघायला मिळतात. घोड्यांवर स्वार झालेले डरबी असो किंवा खिडकीतून बाहेरच्या विश्वाकडे डोकावणारी मुलगी. या छोट्या छोट्या शिल्पांमधून आपल्या भोवतालाचे दर्शन आपल्याला घडत जाते. त्याचबरोबर एक महत्त्वाचे शिल्प जे साकारण्यात आलेले आहे, ते म्हणजे, ‌‘When God is Replaced.‌’ प्रख्यात इटालियन चित्रकार मायकेल एन्जेलो याच्या ‌‘Creation Of Adam‌’ या चित्रावर आधारित हे शिल्प अत्यंत बोलकं. वास्तविक, मूळ चित्रामध्ये डाव्या बाजूला जमिनीवर पहुडलेला ॲडम, जो दिसायला सुदृढ असला, तरी त्याच्या हालचालीत उत्साह नाही. कारण, त्याच्यात अजून जीव (प्राण) फुंकला गेलेला नाही. उजव्या बाजूला ईश्वर आपल्या देवदूतांसह वेगाने त्याच्याकडे येताना दिसतात. या चित्राचा सर्वांत गाजलेला भाग म्हणजे, दोघांचे एकमेकांकडे वळलेले हात. ईश्वराचे बोट आणि ॲडमचे बोट एकमेकांना अगदी स्पर्श करणार, इतक्या जवळ आहेत; पण त्यांच्यात थोडीशी फट आहे. हा ‌’स्पर्श‌’ होण्यापूवचा क्षण मानवी जीवनाची सुरुवात, बुद्धीची देणगी आणि ईश्वरी शक्तीचे मानवाकडे होणारे संक्रमण दर्शवतो. दुसऱ्या बाजूला प्रदर्शनामध्ये जे शिल्प साकारले आहे, त्याच्या दोन्ही बाजू पोकळ आहेत. यामध्ये कोणीही हात घालू शकतो. मानवी सत्तेने स्वतःला ‌‘ईश्वरी सत्ता‌’ समजून बसणे आणि नियंत्रण करणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेऊन ठेवणे, यावर हे शिल्प अत्यंत कुशलतेने भाष्य करते. अलीकडच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येशू ख्रिस्ताच्या पोशाखात असल्याचा ‌‘एआय‌’निर्मित फोटो सगळीकडे व्हायरल झाला. त्यामुळे एका अथ सध्याच्या वातावरणाशी सुसंगत अशीच कलाकृती या प्रदर्शनात साकारण्यात आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कलेचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा!

चित्रकार जसजसा मोठा होत जातो, तसंतसा तो आपल्या चित्रप्रदर्शनासंबंधित एका विशिष्ट चौकटीत विचार करतो. आपल्या चित्रांचे प्रदर्शन कुठे आणि कसे व्हावे, यासंदर्भात त्यांचे स्वतःचे काही आडाखे असतात. बरेचदा नवीन चित्रकार जो संधीच्या शोधात असतो, त्यालादेखील मार्गदर्शनाची गरज असते. अशावेळी या दोन पिढ्यांना जोडण्याचे काम झाले पाहिजे. मागच्या काही वर्षांपासून माझ्या ‌‘टैला आर्ट गॅलरी‌’च्या माध्यमातून मी हे काम करत आहे. कलेचा हा जो समृद्ध वारसा आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा, असं मला वाटतं. 30 वर्षांहून अधिक काळ चित्रकलेच्या जगात वावरणारे कलाकारांची कामं या प्रदर्शनात आहेत आणि दुसऱ्या बाजूला नवीन प्रयोग करू पाहणाऱ्या भोपाळच्या ईशा पटेलसारख्या तरुणीच्या कलाकृतींनादेखील इथे स्थान आहे. ज्यावेळी विविध कलाकृती एका छताखाली येतात, त्यावेळी विचारांचं आदान-प्रदान होतं. ज्येष्ठ कलाकारांची पिढी, नव्या पिढीला मार्गदर्शन करते. हा संवाद सतत सुरू राहायला हवा, असं मला वाटतं.

- रितू चोप्रा, क्युरेटर, संस्थापक,
टैला आर्ट गॅलरी


मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.