डासांची उत्पत्ती रोखणा-या 'मुव्ही ट्रॅप’ या अभिनव उत्पादनाचा शुभारंभ

मलेरिया डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव नियंत्रित होण्यास मदत होणार

    18-Apr-2026
Total Views |
Movie Trap, Society for Mumbai Incubation Lab to Entrepreneurship (SMILE) Council
 
मुंबई:(Movie Trap) महानगरपालिकेच्या अखत्यारितील "सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल"च्या माध्यमातून बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध स्टार्टअप उद्योगांना बळ देण्याचे कार्य अभिनंदनीय आहे, असे उद्गार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी काढले. ते आज 'मुव्हीट्रॅप' या डास निर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या उत्पादनाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
 
या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शास्त्रज्ञ प्रा. ए. पी. दाश, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, प्राध्यापक सुशांता कुमार घोष, दिल्ली स्थित ‘आय. सी. डी. एच. आय.’ या संस्थेचे सल्लागार डॉ. रजनी कांत, महानगरपालिकेच्या व्यवसाय विकास कक्षाच्या डॉ. शशी बाला, नायर रुग्णालयातील 'प्रिव्हेंटिव्ह व सोशल मेडिसिन' विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर रुजुता हाडये, महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी रितेश मरापे, 'मुव्ही ट्रॅप' या स्टार्टअप संस्थेचे प्रसाद फडके आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.(Movie Trap)
 
 
'मुव्ही ट्रॅप' या सापळ्याचे उत्पादन करणारी ‘स्टार्ट अप’ संस्था ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील "सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल" चा भाग आहे. याबाबत अधिक माहिती देताना शशी बाला यांनी कळविले आहे की, महानगरपालिका क्षेत्रातील मलेरिया नियंत्रणाकरिता ‘इको बायो ट्रॅप’ या नवउद्यमींचा चा समावेश यापूर्वीच करण्यात आला होता. त्याच कंपनी द्वारे आता 'मुव्ही ट्रॅप' या अभिनव उत्पादनाची निर्मिती करण्यात आली आहे. हे उत्पादन प्रामुख्याने घरामध्ये वापरण्यासाठी तयार करण्यात आले असून यामुळे डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध होऊ शकतो. (Movie Trap)
 
'मुव्ही ट्रॅप' कसे काम करते?
 
‘मुव्ही ट्रॅप’ (Movie Trap)संबंधित संस्थेद्वारे या कार्यक्रमादरम्यान देण्यात आलेल्या माहितीनुसार ‘मुव्ही ट्रॅप’ मध्ये निर्धारित प्रमाणात पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक यांचे मिश्रण असणारी एक छोटी पिशवी टाकायचे असते. डासांची मादी पाण्यात अंडी घालते, ही बाब लक्षात घेऊन पाणी व सॅचेट टाकलेले मुव्ही ट्रॅप डासांचा प्रादुर्भाव असणा-या ठिकाणी ठेवले जाते. ज्यानंतर पाण्यातील ऍट्रॅक्टंटमुळे डासाची मादी या पाण्याकडे आकर्षित होते व पाण्यात अंडी घालते. तर पाण्यात असणारे सौम्य स्वरुपाचे कीटकनाशक डासांची अंडी नष्ट करते. अशाप्रकारे डासांची अंडीच नष्ट झाल्यामुळे डासांच्या भविष्यातील प्रजोत्पादनास प्रतिबंध होतो व पर्यायाने डासांपासून पसरणा-या आजारांना देखील प्रतिबंध होतो.(Movie Trap)
 
‘मुव्ही ट्रॅप’ मध्ये असलेले पाणी हे साधारणपणे ४ आठवडे साठवून ठेवता येते. याचाच अर्थ हा सापळा ४ आठवडे कार्यरत असतो. या सापळ्यात वापरण्यात आलेली ऍट्रॅक्टंट व कीटकनाशक ही माणसासाठी सुरक्षित आहेत. त्याचबरोबर डास प्रतिबंधासाठी वापरण्यात येणा-या इतर यंत्रांप्रमाणे या सापळ्यास वीज देखील लागत नाही.(Movie Trap)