मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाला वेग

देशातील सर्वात मोठ्या पुनर्विकास आराखड्याचे अनावरण मोतिलालनगरमध्ये साकारणार "१५ मिनिटांचे शहर" पुनर्विकासात 1600 चौरस फुटांचे घर मिळणार मोफत

Total Views |
motilalnagar redevelopement
 
मुंबई: (Motilal Nagar Redevelopment Project) गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचा बहुप्रतीक्षित मास्टर प्लॅन अखेर सार्वजनिक करण्यात आला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवार, दि.१७ एप्रिल रोजी स्थानिकांसमोर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पाची अंमलबजावणी म्हाडा आणि बांधकाम व विकास संस्था म्हणून अदानी समूहामार्फत केली जाणार आहे.
 
यावेळी बोलताना संजीव जयस्वाल म्हणाले की, “मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक प्रकल्प आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सुसज्ज आणि सुनियोजित हक्काचा निवारा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीतून या प्रकल्पाला गती व दिशा मिळाली आहे.”(Motilal Nagar Redevelopment Project)
 
तसेच, “सर्व पात्र रहिवासी, व्यावसायिक आणि झोपडपट्टीधारकांचे इन-सिटू पुनर्वसन करण्यात येईल. पुनर्वसन हाच आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे,” असे जयस्वाल यांनी सांगितले. पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातून घेतलेल्या धड्यांनुसार ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.
 
जमिनीची मालकी कोणाकडे ?
 
हा प्रकल्प सुमारे १४३ एकर क्षेत्रावर पसरलेला असून 3700 हुन अधिक नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पाद्वारे म्हाडाला १० लाख चौ.मीटरपेक्षा अधिक विकास क्षमता (पुनर्वसन व म्हाडा गृहनिर्माण साठा) मिळणार आहे, तर १७ लाख चौ. मीटरपेक्षा अधिक विकास जमीन अदाणी रिअॅल्टीकडे जाणार आहे. तथापि, संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, प्रकल्पाच्या संपूर्ण कालावधीत जमिनीची मालकी म्हाडाकडेच राहणार आहे. सी अँड डिए मॉडेलअंतर्गत विकसकाला कोणताही मालकी हक्क मिळणार नाही. तसेच, जमीन गहाण ठेवता किंवा त्यावर कर्ज घेता येणार नाही. प्रकल्पाचा १००% खर्च सी अँड डिए संस्था उचलणार असून विकसकाला केवळ विक्री घटकातून उत्पन्न मिळवण्याची मुभा असेल.
 
“१५ मिनिटांचे शहर"
 
“१५ मिनिटांचे शहर” म्हणून मोतिलालनगर आपली नवी ओळख निर्माण करणार आहे. या वसाहतीतील विविध सुविधा जसे शाळा, दवाखाने, हॉस्पिटल, बाजारपेठ, व्यावसायिक संकुले, हिरवळीने नटलेली उद्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विश्रांती क्षेत्रे, खेळाचे मैदाने, जॉगिंग पार्क, सायकल ट्रॅक, सांस्कृतिक सभागृह, जिमखाना अशा सर्व सुविधा प्रकल्पाच्या १५ मिनिटांच्या अंतरावर नागरिकांना उपलब्ध होतील. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ७ वर्षांच्या आत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.(Motilal Nagar Redevelopment Project)
 
 
रहिवाशांसाठी फायदे
 
- ३,७०२ पात्र रहिवाशांना प्रत्येकी १६०० चौ. फूटांची घरे (विनामूल्य)
- ३२८ पात्र व्यावसायिकांना प्रत्येकी ९८७ चौ. फूट क्षेत्रफळाचे युनिट्स
- १६०० झोपडीधारकांना एसआरएअंतर्गत ३०० चौ. फूटांची घरे
- काही गृहनिर्माण साठा म्हाडाकडे राखीव
 
हरित आणि आधुनिक सुविधा
 
- १५ एकर विकसित हरित क्षेत्र
- बहुमजली पार्किंग
- सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP)
- पावसाचे पाणी साठवण
- सौरऊर्जा वापर
- सीसीटीव्ही आधारित स्मार्ट सुरक्षा
- अग्निसुरक्षा व्यवस्था
 
कालावधी आणि गुंतवणूक
 
हा प्रकल्प १० ते १५ वर्षांत तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकूण गुंतवणूक सुमारे १ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असून हा देशातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे.(Motilal Nagar Redevelopment Project)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.