Bhimjyot:“बाबासाहेबांच्या विचारांमुळेच समतेचा प्रकाश देशभर पोहोचला” : रविंद्र चव्हाण

    18-Apr-2026   
Total Views |
 
Bhimjyot
 
नागपूर (Bhimjyot):भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच देशात समता, न्याय आणि आत्मसन्मानाचा प्रकाश पोहोचला असून त्यांच्या कार्यातूनच वंचित समाजाला नवी दिशा मिळाली, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘भारतीय भीमज्योत’ या अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमातून ‘भारताची भीमज्योत’ या दीक्षाभूमी ते चैत्यभूमी यात्रेचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले. (Bhimjyot)
 
शिक्षण, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजरचना उभी करण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या विचारांचा प्रसार हा काळाची गरज असून प्रत्येकाने त्या दिशेने कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकराव मेंढे, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश प्रभारी माधवीताई नाईक, भाजपा नागपूर जिल्हाध्यक्ष दयाशंकर तिवारी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विश्वजित गायकवाड, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सचिव अर्चनाताई डेहनकर, अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष सुभाष पारधी, महाराष्ट्र अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, प्रदेश सचिव सुधीर जांभूळकर, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष महेंद्र प्रधान यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
 
या अभिवादन सोहळ्यात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच ‘भारताची भीमज्योत’ या यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. (Bhimjyot)
 
दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी ही यात्रा सामाजिक समतेचा संदेश देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.(Bhimjyot)
 

सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.