अत्याधुनिक स्वरूपाच्या रूग्णसेवेसाठी ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत : महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे केईएम रुग्णालय प्रशासनाला निर्देश

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे केईएम रुग्णालय प्रशासनाला निर्देश

    18-Apr-2026
Total Views |
 
ashwini bhide
 
मुंबई :(Hospital Management Information System) राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयात अत्याधुनिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधांसाठी ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ (Hospital Management Information System) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रयत्न करावेत. तसेच प्रणाली अंतर्गत उपलब्ध होणाऱया माहिती आणि डॅशबोर्डचा नियमितपणे आढावा घ्यावा. रुग्णांसाठी आरोग्य सुविधा सहज आणि तंत्रज्ञानस्नेही स्वरुपात उपलब्ध होतील याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा रुग्णांना कमी कालावधीत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘एच. एम. आय. एस.’ सेवेशी उत्तमरित्या संलग्न करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही बैठकीदरम्यान दिल्या. रुग्णालय येथील विविध वैद्यकीय कक्षांच्या ठिकाणी आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज भेट दिली. रुग्णालय पुनर्विकास, विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य सुविधांवर येणारा ताण कमी करणे यासारख्या विषयांच्या अनुषंगाने बैठकीत आढावा घेण्यात आला.
 
याप्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते.
 
पुरूष रुग्ण कक्षाच्या ठिकाणी भेट देऊन रूग्ण नोंदणी, रुग्णालयातील कक्षात देण्यात येणारे उपचार, वैद्यकीय अहवाल, रूग्णांचा तपशील आदी बाबींची ‘एच. एम. आय. एस.’ प्रणाली अंतर्गत होणारी नोंद याचाही तपशील आयुक्त भिडे यांनी जाणून घेतला. सद्यस्थितीला एचएमआयएस प्रणालीच्या अंमलबजावणीअंतर्गत येणारी आव्हानांवर मात करून ही यंत्रणा प्रभावी होण्याच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. एचआयएमएस प्रणालीअंतर्गत रुग्णाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर द्यावा, असे निर्देश दिले.(Hospital Management Information System)
 
रूग्णालय क्षमतावाढीच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत रुग्णांच्या सुविधेच्या अनुषंगाने विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, यादृष्टाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. एमआरआय, सीटी स्कॅन यासारख्या चाचण्यांसाठी मोठ्या आणि अवजड उपकरणांच्या वापरासाठी भूमिगत कक्ष निर्माण करता येतील का, याचाही आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शस्त्रक्रिया विभागाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’ पालिकेच्या माध्यमातून तसेच (सी.एस.आर.) अंतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या. (Hospital Management Information System)
 
 
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम-राहत’ योजना यासारख्या योजनांचा लाभ रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांना करून द्यावा. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या धर्तीवर इतर योजनांसाठी वैद्यकीय उपचारांसाठी शुल्क आकारणी करावी. यादृष्टीने प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना भिडे यांनी दिल्या.
 
केईएम रुग्णालयावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी येणारा ताण पाहता वैद्यकीय सुविधा नजीकच्या दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात याव्यात. केईएम रुग्णालयाने नजीकच्या दवाखान्यांच्या ठिकाणी आरोग्य सुविधांसाठीचे रुग्ण पाठवावेत, त्यामुळे प्राथमिक सेवेवर येणारा ताण कमी होईल, अशा सूचना भिडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. आरोग्य यंत्रणेमध्ये चार प्रमुख रूग्णालये आणि १६ उपनगरीय रुग्णालयांवर येणारा ताण पाहता रुग्ण हस्तांतरीत करण्यासाठी लिंकेज सिस्टिम पुनर्जिवित करावी, अशा सूचनाही आयुक्त अश्विनी भिडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. (Hospital Management Information System)