bmc Budgetary Expenditure : महापालिकेचा भांडवली खर्च वाढला, २०२५-२६ मध्ये ८७% अर्थसंकल्पीय निधी खर्च
18-Apr-2026
Total Views |
मुंबई :(bmc Budgetary Expenditure) बृहन्मुंबई महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात भांडवली खर्चात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. या कालावधीत पालिकेने ४३,१६२ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ३९,१५९ कोटी रुपये म्हणजेच ८७ टक्के खर्च केले असून, मागील वर्षाच्या ७७ टक्के खर्चाच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे.
आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये पालिकेने ३७,३३२ कोटी रुपयांपैकी २८,७५५ कोटी रुपये खर्च केले होते. यावरून यंदा प्रकल्पांच्या अंमलबजावणीत गती आल्याचे स्पष्ट होते.
सर्वाधिक खर्च मुंबई सीवेज डिस्पोजल प्रोजेक्ट (एमएसडीपी) वर करण्यात आला. सुमारे ३०,००० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे शहरातील जुनाट मलनिस्सारण व्यवस्था आधुनिक करण्याचे काम सुरू आहे. २०२५-२६ मध्ये या प्रकल्पावर ६,५९४ कोटी रुपये खर्च झाले असून, मूळ तरतुदीपेक्षा जास्त खर्च झाल्याने सुधारित अंदाजात निधी ७,०२९ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या अंतर्गत वरळी, बांद्रा, धारावी, वर्सोवा, मालाड, घाटकोपर आणि भांडुप येथे सात मलजल प्रक्रिया केंद्रे उभारली जात आहेत.(bmc Budgetary Expenditure)
इतर विभागांमध्ये पाणीपुरवठा विभागाने ४,८०० कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ८८ टक्के निधी खर्च केला. रस्ते विभागाने काँक्रीटीकरणासाठी ५,७९९ कोटी रुपये, पूल विभागाने ४,००४ कोटी रुपये तर पर्जन्य जलवाहिनी विभागाने १,१८१ कोटी रुपये खर्च केले.
२०२५-२६ साठी महापालिकेचा एकूण अर्थसंकल्प ७४,४२७ कोटी रुपयांचा होता, ज्यापैकी ५८ टक्के म्हणजेच ४३,१६२ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी राखीव ठेवण्यात आले होते.
मात्र, जनप्रतिनिधींनी पालिकेन नाले, पाणीपुरवठा आणि मीटरिंग यांसारख्या मूलभूत सेवांवर अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी केली आहे. कालिना येथील नगरसेविका तुलिप मिरांडा यांनी मोठ्या प्रकल्पांसोबतच दैनंदिन नागरी सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले.(bmc Budgetary Expenditure)
दरम्यान, महापालिका सांडपाणी प्रकल्पांसाठी ग्रीन बॉण्ड जारी करण्याचा विचार करत असून या प्रकल्पांची एकूण किंमत ३०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यासाठी क्रेडिट रेटिंग आणि इतर प्रक्रिया सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांत पालिकेचा अर्थसंकल्पामध्ये सातत्याने वाढत आहे. २०२६-२७ साठी ८०,९५२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रस्तावित आहे, तर २०२५-२६ मध्ये ७४,४२७ कोटी, २०२४-२५ मध्ये ६५,१८० कोटी आणि २०२३-२४ मध्ये ५२,५५३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता.(bmc Budgetary Expenditure)