Movie Review: मंजुलिकेची आठवण, पण जादू गायब! : ‌‘भूत बंगला‌’

    18-Apr-2026
Total Views |

‘भूत बंगला‌’ या चित्रपटाची सुरुवात मंगलपूर नावाच्या शापित गावापासून होते. या गावात लग्न करणे धोकादायक मानले जाते. कारण, ‌‘वधुसुर‌’ नावाचा राक्षस म्हणे नववधूला उचलून नेतो, अशी समजूत. अर्जुन आचार्य (अक्षय कुमार) हा लंडनमध्ये आपल्या वडिलांसोबत आणि बहीण मीरासोबत राहात असतो. संपूर्ण आचार्य कुटुंब अनेक वर्षांपूव तिकडेच स्थायिक झालेलं असतं. मीराचं लग्न ठरतं, तेव्हाच त्यांना समजतं की, त्यांच्या आजोबांनी 500 कोटींची संपत्ती आणि मंगलपूरमधील भलीमोठी हवेली मीराच्या नावे केली आहे. यानंतर अर्जुन उत्सुकतेपोटी भारतात येतो आणि या हवेलीच्या प्रेमातच पडतो. आपल्या बहिणीचं लग्न याच पूर्वजांच्या हवेलीत करण्याचा त्याचा मानस असतो. मात्र, लग्नाची तारीख जवळ येत असताना हवेलीत चित्रविचित्र आणि भयावह घटना घडू लागतात. या सगळ्यात अर्जुनसमोर अनेक जुनी रहस्ये उलगडत जातात. त्याला कळतं की, वधुसुराच्या अमरत्वासाठी मीराच त्याच्या निशाण्यावर आहे. कथा पुढे याच प्रश्नाभोवती फिरते, अर्जुन आपल्या बहिणीला आणि मंगलपूर गावाला या संकटातून वाचवू शकेल का? हे सगळं तुम्हाला चित्रपटातच पाहावं लागेल. पण, याचदरम्यान अनेक गमतीजमती आणि तुफान कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसवते.

2007 साली आलेल्या ‌‘भूल भुलय्या‌’मधील वेगवान कथा, जुन्या समजुती आणि नव्या अंधश्रद्धांचा संगम, अक्षय कुमारचा भन्नाट विनोदी अंदाज आणि विद्या बालन हिने साकारलेली ‌‘मंजुलिका‌’ ही व्यक्तिरेखा या सगळ्यामुळे तो चित्रपट आजही आठवणीत राहतो. काही गोष्टी विस्कळीत असल्या, तरी त्या चित्रपटातील चित्रविचित्र प्रसंग आणि पात्रांची ऊर्जा एकत्र येऊन एक खास अनुभव देत होती. मात्र, जवळपास दोन दशकांनंतर आलेला ‌‘भूत बंगला‌’ हा चित्रपट त्याच आठवणी जाग्या करतो. नव्याने फार काही त्यात आढळत नाही. राजपाल यादव, परेश रावल आणि असरानी यांसारखे काही जुने कलाकार परतले असले, तरी चित्रपटात ‌‘हॉरर‌’चा भाग जास्त आणि ‌‘कॉमेडी‌’ कमी जाणवते. उत्तरार्धात कथा थोडी सावरते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. काही ठिकाणी हलकीशी मजा येते. विशेषतः, राजपाल यादवच्या प्रवेशानंतर किंवा असरानींच्या काही प्रसंगांमध्ये. परेश रावलचा लग्नसोहळ्याचा प्लॅनर पैशांची अफरा-तफर करत फिरताना दिसतो. पण, अनेक महत्त्वाची पात्रं अचानक आणि उशिरा येतात, ज्यामुळे कथा अधिकच विस्कळीत वाटते.

चित्रपटातील काही गोष्टी तुम्हाला पूर्वीच्या चित्रपटातील कॉमेडीइतका आनंद अजिबात देऊ शकत नाहीत. त्याला कारणंही तशीच आहेत; ते म्हणजे, अक्षय कुमार आता पूर्वीपेक्षा वयस्क दिसतो आणि इतर पात्रांशी त्याचा मेळ बसत नाही. तसेच इतर कलाकारही पूर्वीच्या तुलनेत वयस्क झालेले आहेत, त्यात तबू, परेश रावल आणि राजपालसुद्धा. पण तरीही दिवंगत अभिनेते असरानी आणि राजपाल त्या पात्रांमध्ये उठून दिसतात. वामिका गब्बी हिचा रोमँटिक ट्रॅकही जबरदस्तीचा आणि कृत्रिम वाटतो. विशेष म्हणजे, गरज नसतानाही काही पात्रे वाढवली असल्याची जाणीव होते. अक्षय कुमारचे ‌‘कॉमिक टायमिंग‌’ ही त्यांची जमेची बाजू मानली जाते, पण या चित्रपटात ते कृत्रिम आणि जबरदस्तीचे वाटते. त्यांच्या अभिनयात ती सहजता दिसत नाही. तबू, मिथिला पालकर आणि जिशू सेनगुप्ता यांसारख्या कलाकारांचा सहभागही मर्यादित आणि अपूर्ण वाटतो. त्यांच्या भूमिका आणखी खुलवता नक्कीच आल्या असत्या.

हास्यप्रधान प्रसंग अनेक ठिकाणी खळखळून हसवतात. मात्र, ते आणखी प्रभावी असायला हवे होते. काही ठिकाणी जुनाट विनोदांचा आधार घेतला आहे, जे आजच्या प्रेक्षकांना फार रुचत नाहीत; मात्र मागच्या पिढीतील प्रेक्षक त्याचा आनंद घेताना दिसले. मूळ ‌‘भूल भुलय्या‌’मध्ये अंधश्रद्धांवर आधुनिक दृष्टिकोन होता, तर इथे तोच मुद्दा थकलेला आणि निरर्थक वाटतो. चित्रपटाच्या उत्तरार्धात तबू दिसते आणि काही क्षणांसाठी चित्रपटाला ऊर्जा मिळते. पण, काही काळानंतर रहस्य आणि भूत यांचा खराब ‌‘व्हीएफएक्स‌’शी सामना होतो, ज्यात तुम्ही घाबरत तर अजिबातच नाही, पण, कॉमेडीसुद्धा पाहायला मिळत नाही, ज्यामुळे जुने पांढऱ्या साडीतले भूत आणि हवेलीतील रहस्य यांचीच आठवण येते. चित्रपटाचं संगीत हा त्याचा सर्वांत कमकुवत भाग. ‌‘भूल भुलय्या‌’मधील गाणी आजही लोकांच्या लक्षात आहेत, पण ‌‘भूत बंगला‌’मधील एकही गाणं लक्षात राहील, असं नाही. एखादं तरी धमाल गाणं असायला हवं होतं.

एकंदरीत, ‌‘भूत बंगला‌’ हा चित्रपट ‌‘भूल भुलय्या‌’ची आठवण करून देतो, पण त्या स्तराचं मनोरंजन देण्यात अपयशी ठरतो. कमकुवत पटकथा, संगीत आणि सामान्य अभिनय यामुळे हा चित्रपट प्रभावी ठरत नाही. ‌‘मंजुलिका‌’सारख्या दमदार व्यक्तिरेखेची उणीव सतत जाणवत राहते. जर तुम्हाला हलकी-फुलकी हॉरर-कॉमेडी आणि सहकुटुंब सहपरिवार विशेषतः 2000च्या दरम्यानच्या चित्रपटांची आवड असेल, तर हा चित्रपट एकदा पाहू शकता.

दिग्दर्शन : प्रियदर्शन
कलाकार : अक्षय कुमार, स्व. गोवर्धन असरानी, वामिका गब्बी, तबू, परेश रावल, राजपाल यादव, मिथिला पालकर
निर्मिती : बालाजी टेलिफिल्म्स
रेटिंग : ३

- अपर्णा कड