इ.स. पाचव्या ते 17व्या शतकातील 22 ताम्रपट आणि दहा शिलालेखांचा शोध घेत जतन, वाचन, पुनर्वाचन करणाऱ्या पुराभिलेख अभ्यासक डॉ. श्रीनंद बापट यांच्याविषयी...
भारतीय संस्कृतीतील अमूल्य पुरातन ठेवा आज आपल्यासाठी उपलब्ध आहे, तो पुराभिलेखांच्या स्वरूपात. शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्र, स्तंभ, वीरगळ किंवा एखादा कागद अशा कोणत्याही माध्यमातून पुरातन गोष्टींची माहिती देणारा अभिलेख म्हणजेच ‘पुराभिलेख.’ हे लेख वाचून मजकूर जाणून घेणे; त्या कागदाचा किंवा दगडाचा काळ ठरवणे, या कार्यामुळेच आपल्याला आपल्या संस्कृतीचे ज्ञान होते.
हे पुराभिलेख, हस्तलेख जतन करणाऱ्या आणि त्यावर संशोधन करणाऱ्या विविध संस्था देशभरात कार्यरत असून, अलीकडेच त्यांच्या ‘डिजिटायझेशन’चे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. या कामात काही नामांकित संस्थांतील तज्ज्ञ कार्यरत असून, पैकी एक उल्लेखनीय नाव म्हणजेच पुण्याच्या ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’तील वरिष्ठ संशोधक डॉ. श्रीनंद बापट.
श्रीनंद यांची भाषेबद्दलची आकलन क्षमता ही दैवी देणच म्हणावी लागेल. त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाषाप्रेमी आहे. श्रीनंद यांचे आजोबा संस्कृतचे जाणकार होते. त्यांची आई संस्कृतची शिक्षिका होती. त्यांचे वडील बँकेत काम करत असले, तरी त्यांनाही संस्कृतची रुची होती. त्यांनी श्रीनंद यांच्याकडून, ‘भगवद्गीते’चे काही अध्याय तोंडपाठही करून घेतले होते. श्रीनंद यांच्यावर बालपणापासूनच संस्कृतचे संस्कार होत असताना, त्यांना ‘ज्ञानप्रबोधिनी’ शाळेत इयत्ता पाचवीपासून संस्कृत शिकायची संधी मिळाली.
शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत श्रीनंद यांनी स्वतःची संस्कृतची आवड ओळखली होती; पण तरीही ते संस्कृतपेक्षा इतिहास विषयाकडे अधिक आकर्षित होत होते. इतिहासातील जुने संदर्भ, घटना नव्याने जाणून घेण्याचे काम ते उत्सुकतेने करत. त्याचसोबत, इतिहास हा प्रत्यक्ष पाहून त्याचा अभ्यास करण्याकडेच त्यांचा कल असतो. आपली आवड जपत इतिहासाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी, फर्ग्युसन महाविद्यालयातून ‘इतिहास’ विषयात पदवी संपादित केली. त्यानंतर ज्ञालाला पूर्णत्व देण्यासाठी डेक्कन कॉलेजमधून ‘पुरातत्त्व’ विषयातील पदव्युत्तर पदवीही मिळवली. त्या अभ्यासक्रमातील ‘ब्राह्मी’, ‘कन्नड’, ‘मोडी’ इत्यादी लिपी आणि प्राकृत, संस्कृत इत्यादी भाषा ते विशेष रस घेऊन शिकले.
श्रीनंद यांनी इतिहासाची आवड जपततानाच, संस्कृतलाही विशेष प्राधान्य दिले. त्यांनी ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तून संस्कृतच्या ‘कोविद’, ‘विशारद’ आणि ‘पारंगत’, म्हणजे सामान्य भाषेत सांगायचे, तर बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. याच काळात त्यांनी उत्तम गुणांनी ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ मिळवत, पुन्हा ‘टिमवि’तच ‘पीएचडी’साठी प्रवेश घेतला. पदव्युत्तर पदवीवेळी व्याकरणाचा अभ्यास केल्यामुळे, त्यांनी ‘पीएचडी’साठी ‘पाणिनीय व्याकरण ग्रंथांमध्ये मिळणारे सांस्कृतिक संदर्भ’ हाच विषय निवडला.
‘पीएचडी’ पूर्ण झाल्यावर त्यांचे कौशल्य पाहून, लगेचच त्यांना ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’त हस्तलिखित पोथ्यांच्या विभागात काम करण्याची संधी मिळाली. संस्थेत अभ्यासाला येणाऱ्या संशोधकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत, त्यांना मदत करण्याचे काम डॉ. श्रीनंद यांच्याकडे होते. गेली 25 वर्षे ते तेथेच काम करत असून, संस्थेत संग्रही असलेल्या पोथ्यांमधील मजकूर आणि त्याच्या संशोधनातून आतापर्यंत मिळालेली माहिती डॉ. श्रीनंद सहज सांगू शकतात. डॉ. श्रीनंद यांची प्रतिभा जाणून ‘भांडारकर’ संस्थेने, त्यांच्यावर निबंधकपदाचीही जबाबदारी सोपवली आहे. त्याचसोबत ते संस्थेच्या ‘ॲनल्स’ या वार्षिकांकाचे कार्यकारी संपादक म्हणूनही कामकाज पाहतात.
‘भांडारकर’मधील विविध संशोधन प्रकल्पांत योगदान देण्याची संधी मिळाली. त्यांच्या टीमने ‘कदंब’ घराण्याचे 580 शिलालेख आणि ताम्रपटांचा संग्रह करण्याचे काम, ‘इन्फोसिस’च्या सहयोगाने पूर्ण केले. तसेच, ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालया’च्या अनुदानातून ‘मल्लपुराण’नामक कुस्तीबद्दल माहिती देणारे हस्तलिखित, ‘पत्रप्रशस्ती’ हे पत्रव्यवहार कसा करावा याबद्दल मार्गदर्शनपर ग्रंथ आणि आजघडीला संस्थेत उपलब्ध असलेले सर्वांत जुन्या कागदावरील हस्तलिखित ‘चिकित्सासारसंग्रह’ वाचून, ‘डिजिटाईज’ करून त्याचे इंग्रजी भाषांतरही त्यांनी आणि त्यांच्या टीमने केले.
आपले ज्ञान केवळ आपल्यापुरते मर्यादित न ठेवता, डॉ. श्रीनंद हे ‘टिमवि’मध्ये अध्यापन करत पुढील पिढी घडवण्याचे कार्य करत आहेत. त्यांचे ‘पर्युषणा-कल्पसूत्र’नामक सचित्र हस्तलिखितांचे भाषांतर करणारे पुस्तकही वाचकांसाठी उपलब्ध आहे.
पुराभिलेख, हस्तलिखितांच्या अभ्यासामुळे आपल्याला इतिहासातील घटनांबद्दल अधिकाधिक स्पष्टता येते. पुलकेशी-दुसरा आणि सम्राट हर्षवर्धन यांच्या सातव्या शतकातील लढाईचा काळ, डॉ. श्रीनंद यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने अभ्यास करून निश्चित केला. हा अभ्यास भारतीय इतिहासासाठी खूप मोठी देणगी ठरली. डॉ. श्रीनंद यांना त्यांच्या कार्यासाठी ‘इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स’च्या पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आहे आहे. हस्तलिखित किंवा कोरीव लेख वाचायला घेताना आपण कसला शोध घेतोय, हे लक्ष्य निश्चित नसते. पूर्णपणे अंधारात उडी मारत, जे दिसेल ते वाचून, नंतर त्यावर अनुमान बांधण्याचे कसब हे ‘शक्तिः दुर्दम्येच्छाशक्त्याः आगच्छति’ या वाक्याची आठवण करून देणारे असेच!
- ओवी लेले
9869345753