प्रेरणादायी कार्याचा आदर्श : जोगेश्वरीतील ‘अस्मिता’ संस्थेचे कार्याध्यक्ष 'चंद्रशेखर पारखी'

    18-Apr-2026
Total Views |
 
chandrashekhar parakhi (1)
 
मुंबई : (Chandrashekhar Parkhi)जोगेश्वरी (पूर्व) येथील ‘अस्मिता सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था’ ही शिक्षणासोबत संस्कार, समाजभान आणि मूल्यांची जपणूक करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी असलेले चंद्रशेखर पारखी यांनी विविध अभिनव उपक्रमांद्वारे संस्थेला वेगळी दिशा दिली असून, त्यांच्या कार्याचा आढावा त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला.
 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत पारखी यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. पूर्वप्राथमिक विभागात ‘भरडधान्य व पौष्टिक आहार’ या संकल्पनेवर आधारित साप्ताहिक खाऊ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच ‘पाण्याची घंटा’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे.
 
संस्कार आणि मूल्यांची जपणूक करण्यासाठी पिठोरी अमावस्येनिमित्त कनिकेपासून दिवे तयार करून ‘संकल्प’ उपक्रम राबविण्यात आला. मनाचे श्लोक, रामरक्षा आणि गणपती स्तोत्र यांचे नियमित पठण करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व एकाग्रता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी त्यांच्या यशाचे तात्काळ कौतुक करून बक्षिसे देण्याची परंपरा संस्थेत रुजविण्यात आली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेस बसविण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे.
 
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ‘एक मूठ धान्य – रामखिचडी’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये दान व सहकार्याची भावना विकसित केली जात आहे. मातृदिनानिमित्त आईचे पाद्यपूजन व विद्यार्थ्यांनी तयार केलेली भेटकार्ड देण्याच्या उपक्रमातून कृतज्ञतेची भावना दृढ करण्यात आली. अनुभवाधारित शिक्षणावर भर देत विद्यार्थ्यांसाठी मुंबई मेट्रो सहल, गणेशमूर्ती कार्यशाळा भेट यांसारखे उपक्रम राबविण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची ओळख होत आहे.(Chandrashekhar Parkhi)
 
हेही वाचा :  जयंतराव सहस्रबुद्धे 'स्व' बोधचे खरे जाणकार : प्रमोद बापट
 
संस्थात्मक एकात्मता वाढवण्यासाठी सर्व घटकांचा सहभाग असलेले कार्यक्रम आयोजित करून कार्यसंस्कृती बळकट करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याची परंपरा संस्थेत रूढ झाली आहे. तसेच दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान देणे आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा २६ जानेवारीला सन्मान करणे, यांसारख्या उपक्रमांद्वारे गुणवत्तेचा गौरव केला जात आहे. संस्थेच्या स्थापनेपासून योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्याची परंपरा जपून कृतज्ञतेची भावना जिवंत ठेवण्यात आली आहे. संस्थेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यावरही विशेष भर देण्यात येतो.
 
विशेष म्हणजे, संस्थेत कुटुंबवत्सल वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी व कर्मचारी पारखी यांना ‘बाबा’ म्हणून संबोधतात. प्रसिद्धीपासून दूर राहून निःस्वार्थ सेवाभावाने कार्य करण्याची त्यांची भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. एकूणच, चंद्रशेखर पारखी यांचे कार्य शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालणारे आदर्श उदाहरण ठरत असून, त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.(Chandrashekhar Parkhi)