'ईस्ट तुर्कीस्तान नॅशनल मूव्हमेंट’ ही संघटना चीनपासून फुटून ‘पूर्व तुर्कीस्तान’ निर्माण व्हावा, यासाठी कार्यरत होती. चीनने दमनकारी षड्यंत्राने या संघटनेला दाबून टाकले. अनेक दशकांपूर्वीच या संघटनेचे अस्तित्वच नष्ट झाले, असे चीनला वाटत असतानाच, कालपरवाच या संघटनेने तिचा ८१वा स्थापना दिन साजरा केला. ‘दडपशाहीला न घाबरता सामना करू, आमचे प्राचीन स्थान परत मिळवू,’ असे म्हणत या संघटनेने चीनच्या कम्युनिस्ट सरकारला आव्हान दिले आहे. त्यामुळे विस्तारवादासाठी कोणत्याही स्तरावर अनैतिक डावपेच खेळणारा चीन, अंतर्गत स्तरावर अस्वस्थ झाला आहे.
चीनच्या कम्युनिस्ट सरकारने अंतर्गत कलहाच्या, विरोधातील बंडाळीच्या अनेक चळवळी, संस्था यांची विल्हेवाट लावली. विरोधातला एकही सूर बाहेर पडू नये, यासाठी प्रचंड क्रूर कारवाया केल्या. महिला असोत की, विद्यार्थी, कलाकार की पत्रकार; चीनला विरोध करणारे चीनमध्ये सुखासुखी जगू शकले नाहीत. नव्हे, चीनने त्यांचा खात्मा केला. इतकेच काय, चीनला विरोध करणारे अगदी अमेरिका आणि युरोपमध्ये असले; तर त्यांचीसुद्धा माहिती मिळवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे कारनामे यापूर्वी चीनने केले. चीनमध्ये सगळे ‘ऑल गुड’ आहे. शांती, समृद्धी आणि समाधान आहे; हे चित्र चीन सातत्याने उभे करत असतो. पण, तरीही चीनच्या कम्युनिस्टशासित कठोर सत्ताकाळाच्या भिंतीतून चीनचे सत्य बाहेर येतच असते.
त्यापैकी एक सत्य म्हणजे, चीनचे कम्युनिस्ट शासन जरी धर्मबिर्म न मानता, केवळ शासनधारी आहे असे म्हणत असले; तरीसुद्धा चीनमध्ये चिनी प्राचीन संस्कृती कशी राबवली जाईल, त्यासाठी हे शासन काम करते. याचे मुख्य बळी आहेत, चीनमधले बौद्धधर्मीय आणि उघूर मुसलमान. चीन या दोन्ही धर्मियांवर सातत्याने संवर्धनाच्या नावावर निर्बंध लादत असतो. संरक्षणाच्या नावाखाली या दोन्ही धर्मियांना प्रशासनाच्या अधिपत्याखाली ठेवण्याचा प्रयत्न चीन करतो. चीनने तिथल्या प्रसार-प्रचार माध्यमांनाही चांगलेच ताब्यात ठेवले आहे. मात्र, इतके प्रयत्न करूनही चीनला ‘ईस्ट तुर्कीस्तान नॅशनल मूव्हमेंट संघटने’ने आव्हान दिले आहे.
काही शतकांपूर्वी तुर्कीस्तानमध्ये उघूर समाजाचे लोक राहायचे. त्यांच्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव होता. त्यावेळी ‘सिल्क रूट’च्या मार्गाने या प्रांताची भरभराट झाली. नवव्या शतकामध्ये इथे इस्लामचे आक्रमण झाले आणि उघूरांवर इस्लाम लादला गेला. पुढे चीनच्या ‘मांचू’ साम्राज्याने त्यांच्यावर जवळजवळ एक शतक राज्य केले. पण, इथल्या उघूरांनी ४२ वेळा ‘मांचू’ साम्राज्याविरोधात विद्रोह केला. १८६४ मध्ये त्यांनी ‘मांचू’ साम्राज्य परतवून लावले, पुढे १८८४ साली ‘मांचू’ने पुन्हा उघूरांना पराभूत करुन पूर्व तुर्कीस्तानावर विजय मिळवला. पूर्व तुर्कीस्तानाचे नामकरण ‘शिनजियांग’ म्हणजे ‘नवा सुभा’ असे केले. पुढे दुसर्या महायुद्धाच्या काळात जगभरात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. त्याकाळात उघूर आणि तुर्कांनी राजकीय प्रतिनिधित्वासाठी ‘ईस्ट तुर्कीस्तान रिपब्लिक’ स्थापन केले आणि पुढे १९४५ साली ‘ईस्ट तुर्कीस्तान नॅशनल आर्मी’ स्थापन केली. उघूर आणि तुर्कांना त्यांचा हक्क मिळावा, त्यासाठी चीनपासून वेगळे व्हावे, असे या संघटनेचे लक्ष्य!
मात्र, दि. २२ डिसेंबर १९४९ रोजी चीनने ‘ईस्ट तुर्कीस्तान रिपब्लिक’ला भंग केले आणि ‘नॅशनल आर्मी’ला चिनी सैन्यात सामील केले. तेव्हापासून चीनला वाटत होते की, उघूर आणि तुर्कांच्या विद्रोहाचा-विरोधाचा बीमोड झाला. पण, नुकताच या संघटनेने त्यांचा ८१वा स्थापना दिन साजरा करून चीनला धक्का दिला आहे. कितीही दडपशाही केली, दमणकारी यंत्रणा राबवली, तरी आम्ही जिवंत आहोत आणि पूर्व तुर्कीस्तान पुन्हा एकदा निर्माण करू, असा आशावाद या संघटनेने व्यक्त केला आहे. सध्या जगभरात युद्धाचे वारे आहे. अशातच, चीनसुद्धा दादा आहोत, या भूमिकेतून वावरत असतो. हे सगळे करत असताना भारताशीही चीनची भूमिका दुटप्पीच आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये ‘ईस्ट तुर्कीस्तान नॅशनल मूव्हमेंट’ने उघूर आणि तुर्की मुस्लिमांच्या वांशिक आणि सांस्कृतिक अस्मिता जागवल्या आहेत. इतिहास साक्षी आहे की, अस्मितेचा वारसा आणि अस्तित्वाची गरज माणसाला इतिहास घडवायला लावते. आज ना उद्या चीनमध्ये उघूर आणि तुर्की वेगळ्या ‘पूर्व तुर्कीस्तान’ निर्मितीचा इतिहास रचतील का?
९५९४९६९६३८