मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार

शासन निर्णय जारी; सर्व शाळांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक

    17-Apr-2026   
Total Views |
marathi language compulsory government decision
 
मुंबई :(Marathi Language)राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत अध्यापन व अध्ययनामध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा असतानाही या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शुक्रवारी, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
दि. १ एप्रिल २०२० पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याबाबतचा अधिनियम लागू करण्यात आला. या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या अनुषंगाने प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना 'सक्षम प्राधिकारी' घोषित करण्यात आले. दरम्यान, आता या अधिनियमातील तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
 
यानुसार, मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत असल्याबद्दल तपासणी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांच्या पथकात मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त अनुभवी शिक्षकाचा समावेश करण्यात यावा. इतर मंडळांच्या शाळांमध्ये शाळा सुरु झाल्याच्या दोन महिन्यात मराठी भाषा(Marathi Language) धोरणाची अंमलबजावणी होत असल्याची पडताळणी करून शिक्षण संचालकांना त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.
 
हेही वाचा : ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन
 
एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारणार
 
तसेच यापुढे मराठी भाषा धोरणातील तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापकांना नोटीस पाठवण्यात येणार असून संबंधित शाळा व्यवस्थापनाने १५ दिवसांच्या आत विभागीय शाळा उपसंचालकांना खुलासा सादर करणे आवश्यक आहे. संबंधित शाळेने नियमांचे उल्लंघन केल्याची खात्री पटल्यावर शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही शाळेने मराठी भाषा सक्तीच्या आदेशाचे पालन न केल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल.(Marathi Language)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....