भारत शक्तिशाली राष्ट्र होईल, पण तो संहारक होणार नाही!

भारताचा दृष्टिकोन आक्रमक नसून राष्ट्रभावावर आधारित! अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन रवींद्र साठे लिखित राष्ट्रभाव पुस्तक प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न

    17-Apr-2026   
Total Views |
ravindra sathey book publication
 
मुंबई :(Rashtriya Swayamsevak Sangh ideology)"आपण राष्ट्र शक्तिशाली व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. मात्र त्या संदर्भात अनेकदा अन्याय करणाऱ्या राष्ट्रांशी तुलना केली जाते. त्या राष्ट्रांची संकल्पना आक्रमक आणि संहारक स्वरूपाची होती. भारत शक्तिशाली राष्ट्र होईल, पण तो संहारक किंवा विध्वंसक होणार नाही. भारताचा दृष्टिकोन आक्रमक नसून, राष्ट्रभाव आणि समन्वयावर आधारित आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
 
मिहाना पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रभाव’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता वसंत स्मृती, दादासाहेब फाळके मार्ग, दादर (पूर्व) येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे लिखित या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, कांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर, पद्मश्री दादा इदाते आदी मान्यवर उपस्थित होते. (Rashtriya Swayamsevak Sangh ideology)
 
श्री अरविंद, स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर आधारित राष्ट्रचिंतनाचा पुनर्विचार आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे मत याप्रसंगी भैय्याजींनी व्यक्त केले. राष्ट्रनिर्माण नव्हे तर राष्ट्र पुनर्निर्माण हीच भारताची खरी वाटचाल असल्याचा विचार यामध्ये अधोरेखित करण्यात आला.
 
उपस्थितांना संबोधत भैय्याजी म्हणाले की, “हे राष्ट्र मृत्यूवर विजय प्राप्त केलेलं राष्ट्र आहे” असे श्री अरविंद यांचे एक वाक्य आहे. ज्यातून भारताच्या चिरंतनत्वाचा उल्लेख केलाय. त्याच धर्तीवर स्वामी विवेकानंद यांनी “आम्ही अमृत पुत्र आहोत” असे सांगत भारतीयांच्या आध्यात्मिक शक्तीवर विश्वास व्यक्त केला. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी “अनादी मी, अनंत मी, अवध्य मी भला” या शब्दांत याच भावनेला वेगळ्या शैलीत अभिव्यक्त केले. या तिन्ही महापुरुषांच्या विचारांचा गाभा लेखक रवींद्र साठे यांनी त्यांच्या पुस्तकातून स्पष्ट केला आहे. या विचारांनुसार भारत हे राष्ट्र कधी निर्माण झाले असा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते सदैव अस्तित्वात होते आणि कालानुरूप विकसित होत गेले आहे.(Rashtriya Swayamsevak Sangh ideology)
 
पुढे ते म्हणाले, आपण राष्ट्रनिर्माणाची भाषा करत नाही, तर राष्ट्र पुनर्निमाणाची भाषा करतो. अनेकदा विचारले जाते हिंदू राष्ट्र केव्हा होणार? मुळात ते आहेच! ते नव्हतं असा एकही कालखंड नाही. डॉ.हेडगेवार म्हणतात हे तर्काने नव्हे तर अनुभूतीने समजण्याची गोष्ट आहे. भारताच्या मूलभूत चिंतनात राष्ट्र ही तयार करण्याची वस्तू नसून ती सतत विकसित होणारी सजीव रचना आहे.(Rashtriya Swayamsevak Sangh ideology)
 
कार्यक्रमादरम्यान भैय्याजींनी धर्माच्या चार आयामांवर विचार करण्याची गरज अधोरेखित केली; उपासना, आचारधर्म, समाजधर्म आणि राष्ट्रधर्म. उपासना धर्म व्यक्तीला आध्यात्मिक आधार देतो, तर आचारधर्म व्यक्तीची शुद्धता आणि नैतिकता जपतो. समाजधर्म सामूहिकतेचा संस्कार घडवतो आणि राष्ट्रधर्म व्यक्तीला व्यापक राष्ट्रीय कर्तव्याशी जोडतो. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला की, सर्वजण नागरिक होऊ शकतात; मात्र सर्वांमध्ये राष्ट्रभाव जागृत होईलच असे नाही. राष्ट्रभाव ही अंतर्मनातून निर्माण होणारी जाणीव आहे.
 
 
आमदार अतुल भातखळकर यावेळी म्हणाले, केवळ एका पुस्तकात अशा विषयाची गवसणी घालणं सोपं काम नव्हतं. राष्ट्रवादाचे संपूर्ण आयाम या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडतील. सांस्कृतिक, सामाजिक, पाश्चिमात्य, इ. अशा बहुआयामी विषयांना यशस्वीरित्या स्पर्श लेखकाने केलाय. पहिल्या लेखापासूनच याची प्रचिती येईल. संघाने ज्या ज्या गोष्टी शिकवल्या त्याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल. ज्ञानयुक्त कार्य काय असते याचे प्रतिबिंब म्हणजे हे पुस्तक आहे. आपला राष्ट्रवाद संस्कृती, विचारांच्या आधारावर तयार झालाय. पाश्चिमात्य राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यामध्ये किती तफावत आहे, हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. बऱ्याच उदाहरणांमधून ते लक्षात येईल.
 
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम याप्रसंगी म्हणाले, देश आणि राष्ट्र या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. देशाला भौगोलिक सीमा आहेत परतू राष्ट्र ही एक भावना आहे. गेल्या कित्येक वर्षांची परंपरा, संस्कृती, धर्म, जीवनपद्धती याची ती भावना आहे. या भावनेचा भाव म्हणजे राष्ट्रभाव. गेल्या १०० वर्षात ज्याप्रकारे संघाने हा राष्ट्रभाव जतन करण्याचे काम केलं, त्यामुळे तो आज जिवंत आहे. आज तो या पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचला आहे.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रवींद्र साठे म्हणाले, माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन भैय्याजी यांच्या हस्ते होत आहे ही माझ्यासाठी जितकी आनंदाची तितकी भावनिक गोष्ट आहे. लेखन करणे हा माझा पिंड नाही. वैचारिक प्रगल्भता रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये काम करताना येत गेली. वाचन वाढलं. आज १०० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेत. ज. द. जोगळेकर, अशोकराव मोडक, विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या राष्ट्रवादाच्या पुस्तकांमुळे प्रभाव पडत गेला. यांच्या सहवासात राहिल्याने लेखन हा माझा स्वभाव बनला. पुस्तकाच्या निमित्ताने खरा राष्ट्रवाद काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रभाव पुस्तकातून केलाय. भारताचा राष्ट्रवाद सर्व समावेशक आहे, तो प्रत्येक सामान्य नागरिकात जागृत होणे गरजेचे आहे. त्याबाबत चर्चा लोकांमध्ये व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे.
 
कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने झाली. (Rashtriya Swayamsevak Sangh ideology)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक