विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागृत होणार - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
कामठी येथील आयटीआयचे शहीद हेमंत करकरे असे नामकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नामकरण समारंभ , नव्या इमारतीचे लोकार्पण होणार
17-Apr-2026
Total Views |
मुंबई:( Mangal Prabhat Lodha) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या समारंभात शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण ही करण्यात येणार आहे.
"या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केले.
रविवार दि.१९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कामठी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,श्रीमती सुनेत्राताई पवार तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, " मुंबईतल्या २६/११च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले हेमंत करकरे हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख होते. त्यांचे बलिदान भारतीय विसरू शकत नाहीत."
"शहीद करकरे यांचे धैर्य, नेतृत्वगुण आणि परमोच्च देशसेवेच्या सन्मानार्थ आयटीआयचे नामकरण करण्यात येत आहे.असेही लोढा यांनी भावूक होत सांगितले.
"या नामकरणामुळे कामठी येथील आयटीआय संस्थेची ओळख अधिक प्रेरणादायी ठरणार असून, येथील विद्यार्थी करकरे यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन कौशल्य विकासासोबतच राष्ट्रसेवेची भावना जोपासतील."असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडताना थोर भारतीय विचारवंत, समाजसेवक आणि शहीदांचा योग्य सन्मान करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. या संकल्पनेला पुढे नेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागाने राज्यातील आयटीआयचे महान विभूतींच्या नावाने नामकरण करण्याचा राज्यव्यापी कार्यक्रम घेतला आहे." अशी माहिती यावेळी मंत्री लोढा ( Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.
दरम्यान, या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, या कार्यासाठी मेहनत घेणारे कौशल्य विभागाचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मंत्री लोढा यांनी आभार मानले आहेत.( Mangal Prabhat Lodha)