‘मुंबईची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय लोकल रेल्वेसेवा आता मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर आहे. रोजच्या गर्दीत जीव धोयात घालून प्रवास करणार्या लाखो मुंबईकरांच्या सेवेत आता लवकरच स्वयंचलित दरवाज्यांची विना वातानुकूलित लोकल दाखल होईल. नवीन रचनेची चेन्नईच्या ‘इंटिग्रल कोच फॅटरी’त तयार करण्यात आलेली ही लोकल नुकतीच कुर्ला कारशेड येथे चाचणीसाठी दाखल झाली. त्यानिमित्ताने मुंबईकरांना उत्सुकता आणि काहीशी धाकधूकही असलेली ही स्वयंचलित दरवाज्यांची विना वातानुकूलित लोकल नेमकी कशी आहे, ते आम्ही कुर्ला कारशेडमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतले.
मुंबई... प्रचंड वेग, अफाट गर्दी आणि अखंड धावपळीचं महाशहर! लोकल ट्रेन ही तर या शहराची जीवनवाहिनी. आज तब्बल १७३ वर्षांचा प्रवास पूर्ण करत भारतीय रेल्वे एका नव्या वळणावर उभी आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत लोकलच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला जात आहे.
दि. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणेदरम्यान धावलेल्या पहिल्या वाफेच्या रेल्वेगाडीने भारताच्या आधुनिक वाहतुकीची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळातील धुरकट इंजिनापासून आजच्या अत्याधुनिक, वेगवान आणि तंत्रज्ञानसंपन्न रेल्वेपर्यंतचा प्रवास हा केवळ तांत्रिक उत्क्रांतीचा नाही, तर देशाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचा आरसा आहे. मात्र, या प्रगतीच्या वाटचालीत मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांची रोजची झुंज हे एक कटू वास्तव कायम राहिले आहे.
गर्दी, गती आणि धोयाची सवय
मुंबई लोकल म्हणजे, फक्त प्रवासाचे साधन नाही, तर ती लाखो लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी या उपनगरीय सेवेतून प्रवास करतात. पण, या गर्दीमुळे निर्माण होणार्या धोयांची जाणीवही तितकीच तीव्र आहे. लोकलच्या दरवाज्यामध्ये उभे राहणे, लटकून प्रवास करणे, धावत्या गाडीत चढणे हे सर्व जणू मुंबईकरांसाठी सामान्य झाले आहे. पण, याच सवयी अनेकदा जीवघेण्या ठरतात. दि. ९ जून २०२५ रोजी मुंब्रा येथे घडलेली घटना याच वास्तवाची जाणीव करून देणारी होती. अतिगर्दीमुळे पाच प्रवाशांचा डब्याच्या दारातून पडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण रेल्वे प्रशासनाला हादरवून सोडले. याच पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्ड यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
नवीन प्रयोग : बंद दरवाज्यांची विना वातानुकूलित लोकल
मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित नवीन ‘ईएमयू रेक’ विकसित करण्यात आला आहे. या लोकलचे वैशिष्ट्य म्हणजे, ही भारतातील पहिली विना वातानुकूलित असूनही स्वयंचलित दरवाजे बंद होणारी लोकल आहे. ही लोकल ‘इंटिग्रल कोच फॅटरी, चेन्नई’ येथे तयार करण्यात आली आहे आणि सध्या कुर्ला कारशेड येथे चाचणीसाठी दाखल आहे. ही लोकल केवळ एक नवीन रेक नाही, तर मुंबई लोकलच्या संस्कृतीत बदल घडवण्याचा प्रयत्न आहे.
जुनी लोकल विरुद्ध नवी लोकल : बदल नेमका काय?
पारंपरिक लोकलमध्ये दरवाजे कायम उघडे असतात. त्यामुळे प्रवाशांना चढ-उतार करणे सोपे जाते, पण त्याचवेळी सुरक्षिततेचा गंभीर प्रश्नही निर्माण होतो. नवीन लोकलमध्ये मात्र दरवाजे स्वयंचलितपणे बंद होतात. ट्रेन सुरू असताना दरवाजे पूर्णपणे कुलूपबंद राहतात. अगदी मेट्रोप्रमाणे. यामुळे दरवाज्यामध्ये उभं राहण्याची किंवा लटकण्याची शयता कमी होते. हे बदल साधे वाटले, तरी त्यांचा परिणाम विशेषतः अपघातांच्या संख्येवर मोठा असू शकतो.
आकडेवारी काय सांगते?
- जानेवारी २०१४ ते मे २०२५ या कालावधीत एकूण ६ हजार ७६० प्रवाशांचा मृत्यू (डब्यातून पडून), तर १४ हजार २५७ प्रवासी जखमी झाले. हे सर्व अपघात प्रामुख्याने ओपन-डोअर विना वातानुकूलित लोकलमध्ये घडले आहेत. याउलट, स्वयंचलित दरवाजे असलेल्या वातानुकूलित लोकलमध्ये अशा प्रकारचे मृत्यू जवळपास शून्य आहेत. म्हणूनच रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे, सुरक्षितता आणि किफायतशीर प्रवास यांचा समतोल साधणारी विना वातानुकूलित बंद दरवाज्यांची लोकल!
नवीन लोकलची वैशिष्ट्ये
नव्या लोकलचे केवळ दरवाजे नव्हे, तर संपूर्ण प्रणाली अद्ययावत आहे. या नवीन लोकलमध्ये एकूण १२ डबे असून तिची क्षमता ५ हजार, ६९८ प्रवाशांची आहे. त्यांपैकी १ हजार, ३ आसन व्यवस्था आणि ४ हजार, ६९५ उभे प्रवासी अशी रचना आहे.
पण या ट्रेनची खरी ताकद तिच्या सुविधांमध्ये आहे.
स्वयंचलित दरवाजे - अपघात रोखण्यासाठी
लोवर्स (Louvers) - दरवाजे बंद असतानाही हवा खेळती ठेवण्यासाठी
व्हेस्टिब्यूल कनेटिव्हिटी - सर्व डबे एकमेकांना जोडलेले; गर्दीचे समान वितरण
रूफ-माऊंटेड व्हेंटिलेशन सिस्टम
प्रतितास दहा हजार युबिक मीटर ताजी हवा
या सर्व सुविधांमुळे बंद दरवाज्यांमुळे होणार्या संभाव्य त्रासावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
बंद दाराच्या लोकलमुळे समाजमाध्यमात उपस्थित होणारे प्रश्न
- गर्दीच्या वेळी प्रवासी वेळेत चढ-उतार करू शकतील का?
- दरवाजे बंद होण्याच्या वेळेमुळे गोंधळ निर्माण होईल का?
- वातानुकूलन यंत्रणा नसताना बंद दरवाज्यांमुळे डब्यातील उष्णता वाढेल का?
- सर्वांत महत्त्वाचे, प्रवासी त्यांच्या सवयी बदलतील का?
मध्य रेल्वे प्रशासनाची भूमिका
बंद दरवाज्यांच्या लोकलची संकल्पना ‘आयसीएफ’द्वारे डिसेंबर २०२५ मध्ये मांडण्यात आली होती आणि साधारण तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यात आले. या लोकलच्या माध्यमातून तीन महत्त्वाच्या गोष्टी या लोकलमध्ये देण्यात आलेल्या आहेत. यातील सगळ्यांत पहिली गोष्ट म्हणजे, स्वयंचलित दरवाजा बंद होणारी सिस्टम, ज्यामुळे दुर्घटनांना आपण आळा घालू शकतो.
यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्वयंचलित दरवाजांमध्ये ‘लोवर’ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ‘लोवर्स’च्या माध्यमातून डब्यातून हवा खेळती राहते. याशिवाय, या लोकलमध्ये ‘व्हेस्टिब्यूल’ची सोय आहे. यामुळे एका डब्यातील गर्दीचे विभाजन सर्व डब्यांमध्ये सम प्रमाणात होईल. कुठल्याही एका डब्यामध्ये जास्त गर्दी राहणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘रूफ-माऊंटेड व्हेंटिलेशन सिस्टिम’ देण्यात आली आहे. या माध्यमातून प्रतितास दहा हजार युबिक मीटर इतकी ताजी हवा ट्रेनच्या डब्यामध्ये पोहोचू शकते. यामुळे ऑसिजनचे प्रमाण वातावरणाच्या ऑसिजनच्या प्रमाणात ठेवण्यात येते. तरी, अद्याप ही लोकल सध्या प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आलेली नाही.
बदलाची सुरुवात की अंतिम उपाय?
ही लोकल म्हणजे केवळ एक नवीन ट्रेन नाही, तर एक प्रयोग आहे. सुरक्षिततेच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. पण, हे यशस्वी होण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही. त्यासाठी आवश्यक आहे, प्रवाशांची शिस्त, योग्य नियोजन आणि अधिक गाड्यांची उपलब्धता.
‘गेमचेंजर’ की आणखीएक प्रयोग?
रेल्वेतून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार संयुक्तरित्या उपाययोजना आखण्यावर भर देत आहे. यामध्ये अत्याधुनिक रेक हे मोठे पाऊल म्हणावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सातत्याने बैठक घेत उपनगरीय रेल्वेसेवा सुधारण्यावर भर दिला. मुंबई लोकल ही शहराची नाडी आहे आणि या नाडीत बदल घडवणे सोपे नाही. बंद दरवाज्यांची विना वातानुकूलित लोकल हा एक धाडसी प्रयोग आहे. ती अपघात कमी करण्यात यशस्वी होईल का की गर्दीच्या वास्तवात नवीन अडचणी निर्माण करेल, याचे उत्तर येणारा काळच देईल. पण, एक गोष्ट निश्चित आहे, हा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईच्या प्रवासाला सुरक्षित, सुसंस्कृत आणि आधुनिक बनवण्याचा हा प्रयत्न नक्कीच एका नव्या युगाची सुरुवात ठरू शकतो.
चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नवीन लोकल मुंबईकरांच्या सेवेत
सध्या या रेकवर आवश्यक तांत्रिक तपासण्या सुरू आहेत. ही लोकल सेवेत आणण्यापूर्वी ‘आरडीएसओ’कडून सविस्तर चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या वेगवेगळ्या गतींवर आणि विविध मार्गांवर केल्या जातील, ज्यामधून ट्रेनची कार्यक्षमता आणि सुरक्षितता तपासली जाईल. सध्या या रेकमध्ये कोणतीही मोठी तांत्रिक अडचण नसली, तरी काही सूक्ष्म सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी ऑसिजन पातळीचे निरीक्षण, वायुविजन व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार आहे. या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ते बदल करूनच ही लोकल अंतिमतः सेवेत दाखल होईल. सर्वांगीण चाचण्या आणि सुधारणा पूर्ण केल्यानंतरच ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत
दाखल केली जाईल.
- डॉ. स्वप्नील नीला,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
लोकलमधून पडून होणारे मृत्यू थांबतील
‘मुंबई रेल प्रवासी संघा’तर्फे अनेक वर्षे केलेली मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य केल्याबद्दल प्रशासनाचे मी सर्वप्रथम आभार मानतो. या निर्णयामुळे चालत्या रेल्वेमधून पडून होणारे मृत्यू कमी होतील. पण, याबरोबरच रेल्वे प्रशासनाने आता महत्त्वाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, फलाटांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मेट्रोप्रमाणे ऑटोमॅटिक तिकीट दाखवून प्रवेश आणि ‘सीबीटीसी’सारखी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा राबविणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.
- सिद्धेश देसाई,
सचिव, मुंबई रेल्वे प्रवासी संघटना