मुंबई : (BEST Employee Allowance)कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना अखेर भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळताच भाजपा आणि शिंदे गटाच्या महायुती सरकारने सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांना कोरोना भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
माहितीनुसार, बेस्टचे एकूण ९,०७७ कर्मचारी कोरोना काळात नागरिकांची सेवा करत होते. या भत्त्यासाठी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ लढा दिला असून न्यायालयातही धाव घेतली होती. सत्तांतरानंतर भाजपा-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने या कर्मचाऱ्यांच्या सेवेला मान्यता देत भत्ता देण्याचा निर्णय घेतला. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, काहीजण केवळ मतांसाठी मराठी अस्मितेचा वापर करतात, मात्र सत्तेत असताना त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला नाही. महायुती सरकारने मात्र सत्तेत येताच कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील सेवेचा भत्ता देण्याचा निर्णय घेतला.
बेस्ट प्रशासनाने जनरल विभागातील ४२० कर्मचाऱ्यांसह वीज व अभियांत्रिकी विभागातील एकूण ९,०७७ कर्मचाऱ्यांना सुमारे २९ कोटी २२ लाख ३८ हजार ७१७ रुपयांचा भत्ता(BEST Employee Allowance) वितरित केला आहे.
या निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.(BEST Employee Allowance)