विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर

maharashtra vidhan parishad election 2026 : १२ मे रोजी मतदान आणि मतमोजणी

    17-Apr-2026   
Total Views |

vidhan parishad nivadnuk
 
मुंबई :(maharashtra vidhan parishad election 2026)महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १२ मे रोजी या ९ जागांसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होईल.
 
दि. १३ मे रोजी विधानपरिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यात उद्धव ठाकरे (शिवसेना-उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार), राजेश राठोड (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप), दादाराव केचे (भाजप), रणजितसिंह मोहिते पाटील (भाजप), संजय केनेकर (भाजप) यांचा समावेश आहे.
 
या निवडणूकीत संख्याबळानुसार, महायुतीकडे ८ तर, महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येण्याची शक्यता आहे. त्यात मविआतर्फे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाणार की, काँग्रेस एका जागेसाठी अडून बसेल, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे या एका जागेसाठी मविआत संघर्ष होण्याचीही शक्यता आहे.(vidhan parishad nivadnuk)
 
 
एका जागेसाठी होणार पोटनिवडणूक
 
यासोबतच विधानपरिषद सदस्या असलेल्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरही १२ मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या रिक्त झालेल्या जागेचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत आहे. दरम्यान, येत्या १२ मे रोजी विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी नियमित तर, एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे.

...असा असेल निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे - २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - ३० एप्रिल २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी - २ मे २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - ४ मे २०२६
मतदानाची तारीख - १२ मे २०२६
मतदानाची वेळ - सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी - १२ मे २०२६ (सायंकाळी ५ वाजता)(vidhan parishad nivadnuk)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....