लोकसेवेचा ‘वारली’ चित्रकार

    17-Apr-2026
Total Views |
Hareshwar Nathu Vanga
 
वनवासी कल्याणासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्‍या पालघरच्या एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाचा संघर्ष आणि प्रेरणादायी यशोगाथा...
 
न त्वहं कामये राज्यं
न स्वर्गं नापुनर्भवम्|
कामये दुःखतप्तानां
प्राणिनामार्तिनाशनम्॥
 
अर्थात, मला राज्याची इच्छा नाही, स्वर्गाची अपेक्षा नाही आणि मोक्षाचीही ओढ नाही. माझी एकच इच्छा आहे की, जे दु:खात होरपळत आहेत, अशा पीडित प्राण्यांच्या वेदनांचे शमन व्हावे.
 
पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागात अनेक समाजसेवक निमूटपणे काम करत असतात. मात्र, कलेच्या माध्यमातून आपली समृद्ध संस्कृती जपत आणि रुग्णसेवेतून माणुसकीची ज्योत तेवत ठेवणारे असेच एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे हरेश्वर नथू वनगा.
१९८० सालापासून वनवासी कल्याण प्रकल्प, तलासरी येथे शिक्षण घेत असताना सुरू झालेला त्यांचा हा सेवाप्रवास आज एका वटवृक्षात रूपांतरित झाला आहे.
 
वरील श्लोकाप्रमाणे आपले जीवन जगणार्‍या हरेश्वर वनगा यांनी ‘आपला आदिवासी बांधव शिकला; तरच पुढची पिढी घडेल,’ हा विचार मांडत, डहाणू तालुयातील दुर्गम पाड्यांतील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पाटी-पेन्सिल देऊन आपल्या कार्याचा ‘श्रीगणेशा’ केला. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी उच्चशिक्षणासाठी मदतीचा हात मिळवून दिला. केवळ स्वतःचे घर न पाहता, समाजातील प्रत्येक मूल सुशिक्षित व्हावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य अखंडपणे समर्पित केले.
 
एकेकाळी आदिवासी समाजात दवाखान्यांबाबतही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज पसरलेले होते. अशा काळात वनगा यांनी रुग्णांना केवळ रुग्णालयात दाखल केले नाही, तर त्यांच्या जेवणाची सोय स्वतःच्या घरातून केली. त्यांच्या पत्नी विमल वनगा यांनी मायेने डबे बनवून दिले, तर हरेश्वर यांनी स्वतः अनेकदा रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवले. कित्येक रुग्णांना मुंबईसारख्या महानगरात नेऊन मोठ्या आजारांवर उपचार मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
 
आदिवासी समाजात विवाह-संस्कारापासून वंचित राहिलेल्या जोडप्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हरेश्वर नथू वनगा यांनी कै. माधवराव काणे आणि कै. आप्पा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समूह लग्न’ सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली. एकाच खानदानातील आजोबा, मुलगा, नातू आणि पणतू अशा चार पिढ्यांचे लग्न एकाच मांडवात लावून देण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग त्यांच्यामुळेच घडला. ‘माझ्या अंगाला हळद लावली ती या वनग्याने,’ असे म्हणत आनंदाश्रू ढाळणार्‍या त्या आजोबांच्या आठवणीमुळे आजही त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवतात.
 
हरेश्वर वनगा हे केवळ समाजसेवक नाहीत, तर एक निष्णात ‘वारली चित्रकार’ आहेत. दूरदर्शनच्या ‘रंगा येई वो’ कार्यक्रमात त्यांनी आपला कलाविष्कार सादर केला. विशेष म्हणजे, राष्ट्रपती भवनातील त्यांच्या कलेचा अनुभव ‘एबीपी माझा’वर प्रसारित झाला असून, त्यांच्या कुंचल्याने वारली चित्रकलेला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
 
विविध भूलथापांना बळी पडून धर्मांतरण केलेल्या आदिवासी बांधवांना पुन्हा आपल्या सनातन हिंदू धर्मात आणण्यासाठी वनगा अहोरात्र कष्ट घेत आहेत. जानेवारीमध्येच त्यांनी स्वबळावर विधिवत विधी करून ५००हून अधिक कुटुंबांना स्वगृही (हिंदू धर्मात) परत आणले. "जोपर्यंत माझा शेवटचा बांधव हिंदुत्वाच्या मुख्य प्रवाहात येत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही,” असा स्वाभिमानी निर्धार ते व्यक्त करतात.
 
समाजातील ‘मुलगाच हवा’ हा दबाव झुगारून वनगा दाम्पत्याने आपल्या दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केले. मोठी मुलगी चित्रगंधा ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मधून पदवी घेऊन आज वडाळा येथील जे. के. अ‍ॅकेडमीत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, तर धाकटी मुलगी धनश्री डॉटर होऊन रुग्णसेवा करत आहे. त्यांच्या या यशात पत्नी विमल यांचा मोठा वाटा असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
 
त्यांच्या निःस्पृह सेवेची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदिवासी सेवक पुरस्कार’, ‘माधवराव काणे स्मृती पुरस्कार’, ‘योगी श्री. अरविंद पुरस्कार’ आणि ‘रामभाऊ शिरके गुरुजी सन्मानचिन्ह’ अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पायाला भिंगरी लावल्यासारखे समाजकल्याण आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणार्‍या हरेश्वर वनगा यांच्या या अथक परिश्रमांना आणि त्यांच्या आदिवासी ऋणानुबंधांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे भावी वाटचालीसाठी उत्तुंग शुभेच्छा!