मविआत फार आलबेल नाही : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; विधानपरिषदेसाठी एकमत होईल अशी परिस्थिती नाही

    17-Apr-2026   
Total Views |

Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) विधानपरिषदेत कोणता उमेदवार द्यायचा हे महाविकास आघाडीने ठरवायचे आहे. पण त्यांनी कोणताही उमेदवार दिला तरी, मविआत फार आलबेल नाही. त्यांच्याकडे आताची स्थिती संशयीत आहे, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)म्हणाले की, "राज्यसभेसाठी शरद पवार यांना उमेदवारी दिली ती आम्ही मान्य केली. आताही ते चांगला निर्णय घेतील तर, निवडणूक बिनविरोध होईल. अन्यथा घोडा मैदान समोर आहे. कधी कधी एखाद्या नावावर एकमत होऊ शकते. त्यांचे एकमत होईल अशी परिस्थिती नाही. त्यांना महाविकास आघाडीत फूट पाडायची असल्यास ते निर्णय करतील."
 
परवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष
 
"परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणावर आमचे रोज लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांचे आणि अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझेही या प्रकरणाच्या चौकशीकडे लक्ष आहे. चौकशी समिती योग्य पद्धतीने तपास करत असून कुणीही अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाणे योग्य नाही. अशी चौकशी सुरु असताना कुणीही मुस्लीम मुली किंवा हिंदू मुली असल्याबद्दलची वक्तव्ये करू नये. यात कोण कोण आहे हे अंतिम तपासात कळेलच. पण आज संभ्रम तयार करणे आणि चौकशीवर परिणाम होईल, असे वक्तव्य करणे योग्य नाही. या प्रकरणात मिळालेले मोबाईल फॉरेन्सिककडे गेले असून तीन दिवसांत त्याचा अहवाल येईल. त्यानंतर यात खरे काय आहे ते कळेल," असेही ते म्हणाले.(Chandrashekhar Bawankule)
 
 
खरात प्रकरणात एसआयटीचा तपास सुरु
 
"अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपास करत आहे. याप्रकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले आहे. त्यामुळे सत्ताधारी, विरोधी, अधिकारी, राजकीय, सामाजिक यातील कोणतेही लोक असले तरी ते सुटणार नाहीत. त्यांच्यावर योग्य कारवाई होईल."
 
शक्तीपीठ महामार्गासाठी ९० टक्के शेतकरी मान्य
 
"अवकाळी पावसाचे संपूर्ण सर्वेक्षण सुरु असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नियमाप्रमाणे, सर्वांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पूर्ण यंत्रणा कामाला लागली असून या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यातील ९० टक्के शेतकरी मान्य झाले आहेत. १० टक्के शेतकऱ्यांना आम्ही समजावू. जबरदस्ती करून कुठलाही विकास करणार नाही. शेतकऱ्यांच्या मताप्रमाणे वागू. परंतू, या प्रकल्पाचा पुढच्या पीढीला काय फायदा आहे? यासह लोकांना पूर्ण वस्तुस्थिती समजली की, त्यांचा संभ्रम दूर होतो. शक्तीपीठ महामार्गाबद्दल राजू शेट्टींचे म्हणणे ऐकून त्यांचाही संभ्रम दूर करू," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....