Asiatic Society of Mumbai : 'एशियाटिक' संदर्भात मध्यम मार्ग काढावा; मुंबई उच्च न्यायालयाची सूचना

    17-Apr-2026   
Total Views |
ashiatic
 
मुंबई :(Asiatic Society of Mumbai) निवडणूकीतील मतदारयाद्यांच्या गोंधळामुळे चर्चेत आलेल्या एशियाटिक सोसायटीच्या निवडणूकीला आता आणखी एक वेगळं वळण लाभलं आहे. गुरुवार दि. १६ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायलयाच्या न्यायमूर्ति दुभाष यांच्या एकलपीठापुढे सुनावणी पार पडली. या प्रसंगी राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी सविस्तर बाजू मांडली. त्यावेळी सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने व्यवहारिक दृष्टीकोन बाळगण्याची आणि मध्यम मार्ग काढण्याची सूचना उच्च न्यायालयाने संबंधितांना केली. न्यायालयाची सूचना मान्य करुन संबंधितांनी धर्मादाय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीकडून नव्या सदस्यांची पडताळणी करण्याचे आणि मतदार यादी निश्चित करण्याचे आणि त्यानंतर निवडणूक घेण्याचे स्पष्ट केले. राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांकडून यास सहमती दर्शवल्यानंतर त्याबाबत शुक्रवारी उच्च न्यायालयाकडून आदेश जारी करण्यात येईल.
 
दि. १४ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या एशियाटिक सोसायटीच्या(Asiatic Society of Mumbai) निवडणूकीला धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली. त्याचबरोबर, वैध व पात्र मतदारांची यादी तयार करण्यासह सोसायटीच्या दैनंदिन कामकाजासाठी समिती नेमण्यात आली होती. त्याचबरोबर, मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे स्पष्ट केले होते. धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात केतकर गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून सदर आदेश स्थगित करण्यात आला होता. हा आदेश नैसर्गिक न्याय तत्तवांचे उल्लंघन करत असल्याचे सकृतदर्शनी निरीक्षण सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले व धर्मादाय आयुक्तांना याचिकेत उपस्थित मुद्दयावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.(Asiatic Society of Mumbai)
 
 
या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सोसायटीच्या पडताळणी समितीची मुदत आधीच संपली आहे. त्यामुळे, नव्या सभासदांची पडताळणी करण्याचा अधिकार या समितीला नाही, असे धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेल्या अहवालातून उघड झाले. त्यामुळे, निवडणुकीला स्थगिती देण्यात आली, असे राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले.सोसायटीच्या व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याची शासनदरबारी दखल घेण्यात आली होती व चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल धर्मादाय आयुक्तांनी निवडणुकीला स्थगिती आदेश देताना प्रामुख्याने विचारात घेतल्याचे महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले.(Asiatic Society of Mumbai)
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.