dombivli - जाड चोचीच्या वटवट्याची डोंबिवलीतून दुर्मीळ नोंद; मंगोलियाच्या परतीच्या प्रवासात खाडीत थांबा

    16-Apr-2026
Total Views |
Thick-billed Warbler in dombivli




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
महाराष्ट्रात दुर्मीळ प्रवासी स्थलांतरित पाहुणा पक्षी असलेल्या जाड चोचीच्या वटवट्या पक्ष्याचे दर्शन डोंबिवलीत घडत आहे. कोपर खाडीमधून या पक्ष्याची नोंद पक्षीनिरीक्षकांनी केली आहे. (Thick-billed Warbler in dombivli) मंगोलियामधून स्थलांतर करून येणाऱ्या या पक्ष्याच्या महाराष्ट्रातून अगदी तुरळकच नोंदी असून सध्या तो परतीच्या प्रवासात डोंबिवलीत थांबल्याची शक्यता आहे. (Thick-billed Warbler in dombivli )
 
डोंबिवलीतील कोपर खाडीच्या पाणथळ क्षेत्रात जाड चोचीचा वटवट्या पक्षी आरामासाठी थांबला आहे. याची नोंद पक्षी अभ्यासक डाॅ. राजू कसंबे यांनी केली आहे. हा पक्षी लांब पल्ल्याचा प्रवासी असून तो दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतो. दक्षिण सायबेरिया ते पश्चिम मंगोलिया आणि ईशान्य चीन हा पक्षी प्रजनन करतो. प्रजननानंतर आॅगस्ट महिन्यात हे पक्षी मंगोलिया आणि पूर्व चीनमधून दक्षिणेकडे प्रवास सुरू करतात. सप्टेंबर महिन्यात हे पक्षी भारतात आणि दक्षिण नेपाळमध्ये दाखल होतात. त्यानंतर दक्षिण भारतात जातात. यामधील काही पक्षी हे थायलंड आणि इतर आग्नेय आशियाई देशांमध्ये नोव्हेंबरच्या शेवटी पोहोचतात. पूर्ण हिवाळा ते दक्षिण भारत, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंडमधील दाट झाडीत किंवा नद्यांच्या काठी असलेल्या झुडपांमध्ये घालवतात. एप्रिलच्या अखेरीस पुन्हा उत्तरेकडे जायला निघतात आणि मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला आपल्या प्रजननाच्या जागी पोहोचतात. महाराष्ट्रात हा पक्षी प्रवासी स्थलांतरित पक्षी असल्याने ऑक्टोबर ते एप्रिल या काळात दिसतो. दक्षिण भारतातून परत जाताना एप्रिल महिन्यात ते काही काळ महाराष्ट्रातील किनारपट्टीवर थांबतात. म्हणूनच त्याचे दर्शन सध्या डोंबिवलीतील खाडी क्षेत्रात होत आहे.
 
 
 
जाड चोचीचा वटवट्या हा बुलबुलच्या आकाराचा मोठा वटवट्या पक्षी आहे. ज्याची शेपटी लांब आहे. दिसायला क्लॅमरस बोरू वटवट्यासारखाच (Clamorous Reed Warbler) दिसत असल्यामुळे त्याला ओळखणे कठीण जाते. तरी काही विशिष्ट गोष्टींमुळे तो वेगळा ओळखता येतो: याची चोच जाड, आखूड आणि टोकाला थोडी बोथट असते. खालच्या चोचेचा भाग (lower mandible) फिक्कट गुलाबी किंवा पिवळसर असतो. डोळ्यावर कोणतीही रेघ (eyebrow/supercilium) नसते, ज्यामुळे याचा चेहरा अगदी 'कोरा' वाटतो. गडद रंगाचे डोळे कोऱ्या चेहऱ्यावर उठून दिसतात. यापूर्वी महाराष्ट्रामधून या पक्ष्याची नोंद मुंबई, वसई किल्ला, पुणे, यवतमाळ येथून झाली आहे.
 
 
हा पक्षी सध्या मंगोलियाच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघाला असून डोंबिवलीत तो थांबला आहे. याठिकाणी तो खाद्य खाऊन आपले थोडे वजन वाढवून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघेल. - डाॅ. राजू कसंबे, पक्षी अभ्यासक