॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 20॥

    16-Apr-2026
Total Views |
 
Saundarya Lahari Verse 14 meaning
 
क्षितौ षट्पञ्चाशद्-द्विसमधिक-पञ्चाश-दुदके
हुतशे द्वाषष्टि-श्चतुरधिक-
पञ्चाश-दनिले|
दिवि द्विः षट् त्रिंशन्‌‍ मनसि च चतुःषष्टिरिति ये
मयूखा-स्तेषा-मप्युपरि तव
पादाम्बुज-युगम्‌‍॥14॥
 
शंकराचार्य विरचित ‌‘सौंदर्यलहरी‌’ हा केवळ स्तोत्रसंग्रह नसून तो श्रीविद्या, कुंडलिनी योग आणि वैश्विक गणिताचा एक अद्भुत संगम आहे. 14व्या लोकामध्ये देवीच्या तेजाचे, तिच्या विस्तीर्ण व्याप्तीचे आणि मानवी शरीरातील सहा चक्रांमध्ये विभागलेल्या तिच्या ऊर्जात्मक किरणांचे जे वर्णन केले आहे, ते विज्ञानालाही थक्क करणारे आहे. हा लोक साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण यात कालचक्राचा आणि देहाचा एकमेकांशी असलेला सूक्ष्म संबंध स्पष्ट करण्यात आला आहे. या लोकाच्या माध्यमातून ऊर्जा आणि प्रकाशकिरण या पातळीवर, आचार्य पिंडी ते ब्रह्मांडी सिद्धांताची पुष्टी करतात.
 
या लोकाची सुरुवात ‌‘क्षितौ‌’ या शब्दाने होते, ज्याचा अर्थ पृथ्वी असा आहे. तंत्रशास्त्रानुसार, आपले शरीर हे ब्रह्मांडाची एक लहान प्रतिकृती आहे. जे ब्रह्मांडात आहे, तेच या पिंडात (शरीरात) आहे. या तत्त्वानुसार, देवीची शक्ती आपल्या शरीरातील सहा चक्रांमध्ये विखुरलेली आहे. लोकात ज्या संख्या दिल्या आहेत, 56, 52, 62, 54, 72 आणि 64. त्यांची एकूण बेरीज 360 येते. हे 360 अंक अत्यंत सूचक आहेत. कारण हिंदू कालविज्ञानानुसार एका वर्षात 360 दिवस (सावन दिवस) मानले जातात. म्हणजेच, भगवती केवळ शरीरातील चक्रांचेच नव्हे, तर संपूर्ण काळाचेही नियंत्रण करते. हे 360 किरण म्हणजे प्रकाशाचे किंवा ऊर्जेचे असे अंश असून, जे आपल्या अस्तित्वाच्या वेगवेगळ्या थरांना प्रकाशित करतात.
 
‌‘क्षिति‌’ म्हणजे पृथ्वी तत्त्व, जे आपल्या शरीरातील सर्वांत खालच्या, म्हणजेच मूलाधार चक्राशी संबंधित आहे. या चक्रामध्ये देवीचे 56 (षट्पञ्चाशत्‌‍) किरण आहेत. पृथ्वी तत्त्व हे जडत्व आणि आधाराचे प्रतीक आहे. मानवी जीवनाचा भौतिक पाया आणि शारीरिक अस्तित्व या 56 किरणांवर अवलंबून असते.
 
यानंतर ‌‘द्विसमधिक-पञ्चाश-दुदके‌’ या पदाद्वारे जल तत्त्वाचे वर्णन केले आहे. उदक म्हणजे पाणी आणि ‌‘द्विसमधिक-पञ्चाश‌’ म्हणजे 50 अधिक दोन, म्हणजेच 52. हे जल तत्त्वाचे केंद्र स्वाधिष्ठान चक्रात आहे. आपल्या शरीरातील रक्ताभिसरण, प्रजनन शक्ती आणि भावनांचा ओघ या 52 किरणांच्या प्रभावाखाली असतो.
 
तिसऱ्या स्थानी अग्नी तत्त्वाचे वर्णन येते. ‌‘हुताशे द्वाषष्टि‌’. ‌‘हुताश‌’ म्हणजे अग्नी आणि ‌‘द्वाषष्टि‌’ म्हणजे 62. हे किरण नाभीपाशी असलेल्या मणिपूर चक्रात स्थित असतात. अग्नी हा परिवर्तनाचे प्रतीक आहे. अन्नाचे पचन करून त्याचे ऊर्जेत रूपांतर करणे आणि व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ करणे, हेच या 62 किरणांचे कार्य आहे.
 
त्यानंतर वायू तत्त्वाचा उल्लेख ‌‘चतुरधिक-पञ्चाश-दनिले‌’ असा येतो. अनिल म्हणजे वायू आणि ‌‘चतुरधिक-पञ्चाश‌’ म्हणजे 50 अधिक चार, म्हणजेच 54. हे अनाहत चक्र (हृदय चक्र) आहे. वायू हा गतीचा आणि प्राणाचा कारक आहे. आपल्या श्वसनसंस्थेवर आणि प्रेमाच्या भावनांवर या 54 किरणांचा अंमल असतो.
 
पाचव्या स्थानी आकाश तत्त्वाचे वर्णन ‌‘दिवि द्विः षट् त्रिंशन्‌‍‌’ असे केले आहे. ‌‘दिवि‌’ म्हणजे आकाश किंवा स्वर्ग आणि ‌‘द्विः षट् त्रिंशन्‌‍‌’ म्हणजे 36ची दुप्पट, म्हणजेच 72. हे विशुद्धी चक्र (कंठ चक्र) आहे. आकाश हे सर्वव्यापी आणि पोकळीचे प्रतीक आहे. 72 ही संख्या तंत्रशास्त्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाते; कारण मानवी शरीरातील 72 हजार नाड्यांचे मूळ केंद्र या संख्येशी जोडलेले आहे. शेवटी, मन तत्त्वाचा उल्लेख येतो. ‌‘मनसि च चतुःषष्टिरिति|‌’ मनाचे स्थान आज्ञा चक्र (भ्रूमध्य) असून येथे 64 (चतुःषष्टि) किरण असतात. या 64 किरणांना ‌‘चौसष्ट कला‌’ असेही संबोधले जाते. बुद्धी, विवेक आणि आंतरिक प्रज्ञा यांचे नियंत्रण या 64 किरणांद्वारे होते.
 
लोकाचा सर्वांत महत्त्वाचा भाग उत्तरार्धात येतो. ‌‘ये मयूखास्तेषामप्युपरि तव पादाम्बुजयुगम्‌‍|‌’ शंकराचार्य म्हणतात की, हे जे 360 किरण आहेत, ते तर केवळ तुझ्या शक्तीचे अंश आहेत, जे चक्रांमध्ये विभागलेले आहेत. परंतु, हे देवी! तुझे ‌‘पादाम्बुज-युगम्‌‍‌’ म्हणजेच तुझी चरणकमले या सर्व किरणांच्या आणि चक्रांच्या ‌‘अम्युपरि‌’ (पलीकडे) आहेत.
 
जेव्हा साधक कुंडलिनी जागृत करून या सहा चक्रांच्या पलीकडे जातो, तेव्हा त्याला सहस्रार चक्राचा अनुभव येतो. सहस्रार हे सातवे चक्र असून ते या भौतिक आणि मानसिक सृष्टीच्या सीमेबाहेर आहे. हे स्थान ‌‘चंद्रमंडळ‌’ म्हणून ओळखले जाते, जिथे केवळ अमृत आणि परमानंदाचा वर्षाव होतो. 360 किरणांचे गणित हे ‌‘काळाचे‌’ प्रतीक आहे, परंतु सहस्रार हे ‌‘कालातीत‌’ आहे. शंकराचार्य सूचवतात की, जोपर्यंत आपण या चक्रांच्या गणितात अडकलेले आहोत, तोपर्यंत आपण संसाराच्या आणि काळाच्या फेऱ्यात आहोत. परंतु, जेव्हा आपण देवीच्या चरणांचे ध्यान करतो, तेव्हा आपण या 360 किरणांच्या मर्यादा ओलांडून मोक्षाप्रत पोहोचतो.
 
या लोकाचे विस्तृत विलेषण केल्यास असे लक्षात येते की, मानवी शरीर ही एक ऊर्जायंत्रणा आहे. 56 (मूलाधार) + 52 (स्वाधिष्ठान) + 62 (मणिपूर) + 54 (अनाहत) + 72 (विशुद्धी) + 64 (आज्ञा) या सर्वांची बेरीज 360 येते, जे पूर्ण वर्तुळ किंवा पूर्ण वर्षाचे प्रतीक आहे. हे किरण भगवतीच्या प्रकाशाचे ‌‘मयूख‌’ (अंश) आहेत. साधनेचा मुख्य उद्देश हा आहे की, या विखुरलेल्या किरणांना एकाग्र करून ऊर्ध्वगामी बनवणे आणि त्या परम शिव-शक्तीच्या मिलन स्थानी, म्हणजेच सहस्रारात विलीन होणे.
 
शंकराचार्यांची ही शब्दरचना अत्यंत वैज्ञानिक आहे. त्यांनी केवळ अंकांच्या माध्यमातून संपूर्ण सृष्टीचे तत्त्वज्ञान मांडले आहे. ‌‘पादाम्बुज-युगम्‌‍‌’ या शब्दात त्यांनी शरणागतीचा भाव व्यक्त केला आहे. कितीही ज्ञान प्राप्त केले किंवा चक्रांचा अभ्यास केला, तरी जोपर्यंत आईच्या चरणांपाशी (पलीकडच्या सत्यापाशी) आपण पोहोचत नाही, तोपर्यंत पूर्णत्व प्राप्त होत नाही. हा लोक साधकाला आपल्या शरीरातील सुप्त शक्तीची जाणीव करून देतो आणि त्याचवेळी अहंकाराचा त्याग करून, त्या वैश्विक शक्तीला शरण जाण्याची प्रेरणा देतो. या प्रकारे, ‌‘सौंदर्यलहरी‌’चा हा 14वा लोक मानवी देहाचे देवत्वात रूपांतर करण्याचा एक परिपूर्ण मार्गदर्शक ठरतो.
 
आदि शंकराचार्य येथे भगवतीला ‌‘कालातीत‌’ शक्ती म्हणून प्रस्थापित करतात. लोकात उल्लेखिलेल्या 360 किरणांचा संबंध थेट कालचक्राशी आहे. सूर्य आणि चंद्राच्या गतीवर आधारित एका संवत्सरात (वर्षात) 360 दिवस असतात आणि मानवी शरीरातील सहा चक्रांमधील किरणांची एकूण बेरीजही 360 येते. आपले शरीर हे काळाच्या बंधनात अडकलेले आहे. जोपर्यंत आपली चेतना या सहा चक्रांमध्ये भ्रमण करत असते, तोपर्यंत आपण जन्म-मृत्यू, सुख-दुःख आणि वेळेच्या मर्यादेत जखडलेले असतो.
 
मानवी पाठीच्या कण्यात असलेल्या सुषुम्ना नाडीमध्ये ही षट्चक्रे गुंफलेली असतात. साधक जेव्हा ध्यान आणि मंत्रशक्तीने आपली सुप्त कुण्डलिनी शक्ती जागृत करतो, तेव्हा ती या प्रत्येक चक्रातील किरणांना आत्मसात करत वर जाते. मूलाधारातील 56 किरणांपासून सुरू झालेला हा प्रवास, आज्ञा चक्रातील 64 किरणांपर्यंत पोहोचतो, तेव्हा साधकाला पूर्ण मानसिक स्पष्टता आणि सिद्धी प्राप्त होतात. परंतु, खरी आध्यात्मिक तृप्ती किंवा मोक्ष हा या सहा चक्रांच्या आत नाही, तर त्यांच्या ‌‘उपरि‌’ म्हणजेच पलीकडे आहे. देवीचे चरणकमल या 360 किरणांच्या वर, म्हणजेच सहस्रार चक्रात आहेत. सहस्रार हे सातवे चक्र नसून ते एक असे शून्य किंवा अनंत स्थान आहे, जिथे द्वैत संपते. तेथे पोहोचल्यावर साधक काळाच्या (360 किरण) पलीकडे जातो आणि त्याला अमृताचा अनुभव येतो.
 
गूढ अर्थाचा विचार करता, हे 360 किरण म्हणजे संसार आहेत आणि देवीचे चरण म्हणजे कैवल्य किंवा मुक्ती आहेत. लोकातील आकड्यांची रचना अशी केली आहे की, ती साधकाला क्रमाने स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेते. पृथ्वी (जडत्व)कडून मनाकडे (सूक्ष्मत्व) आणि शेवटी मनाच्याही पलीकडे असलेल्या परा-शक्तीकडे हा प्रवास होतो. भगवतीचे पाय सहस्रारात असणे याचा अर्थ असा की, ती संपूर्ण सृष्टीला आपल्या चरणांशी धारण करते, पण स्वतः त्यापासून अलिप्त राहते. हे चरणकमल ‌‘चंद्रमंडळा‌’त स्थित आहेत, असे तंत्रशास्त्र सांगते, जिथून सतत चैतन्याचा वर्षाव होत असतो. (क्रमश:)
 
- सुजीत भोगले
9370043901