India Revives Iran Oil Imports : इराणकडून भारताची ४० लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात

सात वर्षांनी इराणकडून आयात

    16-Apr-2026
Total Views |
India Revives Iran Oil Imports

मुंबई : (India Revives Iran Oil Imports) जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्क़ळीत झाली असताना, भारताने इराणकडून तब्बल सात वर्षांनी कच्चे तेल आयात केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीबाबत अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने ४० लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात केली आहे.(India Revives Iran Oil Imports)
 
२०१८ पूर्वी भारत हा कच्च्या तेलाची आयात करणारा इराणचा सर्वात मोठा ग्राहक होता. त्यावेळी भारत दररोज सुमारे ५.१८ लाख लीटर तेलाची अयात इराणकडून करत असे, जी भारताच्या एकूण आयातीच्या ११.५ टक्क्यांच्या आसपास होती. मात्र, २०१९ मध्ये अमेरिकेने इराणकडून तेलखरेदी करण्यावर बंधने लादल्याने, भारतानेही इराणकडून होणारी आयात थांबवली होती. त्यानंतर भारताने इतर पुरवठादारांकडून तेलखरेदी वाढवण्यावर जोर दिला होता.(India Revives Iran Oil Imports)
 
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ३० दिवसांची मर्यादित सवलत जाहीर केली आहे. या सवलतीमध्ये पूर्ण सूट दिली नसल्याने इराणबरोबर नव्याने करार करणे शक्य होणार नाही. तरीही, या सवलतीअंतर्गत आधीच समुद्रामध्ये असलेले तेलखरेदी करणे शक्य होणार आहे. अमेरिकेच्या या सवलतीमुळे इराणी तेलावरील अमेरिकेचे निर्बंध शिथील झाले आहेत. अमेरिकेने दिलेली सवलत दि. १९ एप्रिल रोजी संपणार असून, त्यापूर्वी भारताने याच गोष्टीचा लाभ घेत अधिकाधिक इराणी तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून ४० लाख बॅरल तेल घेऊन दोन जहाजे भारताच्या समुद्र किनार्‍यावर दाखल झाली आहेत. यामध्ये एक जहाज भारताच्या पश्चिमेकडील गुजरातच्या सिका बंदरात दाखल झाले असून, दुसरे पूर्वेकडील ओडिशाच्या पारादीप बंदरामध्ये दाखल झाले आहे. एका अहवालानुसार, सध्या १७ भारतीय जहाजे होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये असून, त्यापैकी सात जहाजे भारतीय बंदरांमध्ये दाखल झाली आहेत. भारतातील तेलशुद्धीकरण कंपन्यांनीदेखील या जगतिक संकटकाळामध्ये ४० दिवसांपेक्षा अधिकचा तेलसाठी करुन ठेवला असून, इराणकडून झालेल्या खरेदीमुळे त्यात भर पडणार आहे.(India Revives Iran Oil Imports)
 
रशियाकडील तेलखरेदीमध्येही भारताने केली वाढ...
 
अमेरिकेच्या विरोधानंतरही देशाची इंधन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताने रशियाकडून इंधनाची आयात वाढवली असून, अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून एका आठवड्यात सुमारे ३० दशलक्ष तेलाची आयात केली आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाकडून प्रतिदिन एक दशलक्ष बॅरल होत असलेली भारताची आयात, मार्च अखेरीपर्यंत १.९ दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचली होती.(India Revives Iran Oil Imports)